महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पोलीस उप महानिरीक्षक व पोलिस अधीक्षकांना निवेदन
नरेंद्र येरावार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेला तीन महिने उलटूनही कुंटूर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने केला आहे. याप्रकरणी तात्काळ कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील रहिवासी यांची पीडित मुलगी असून २२ जून २०२६ रोजी दुपारी मनूर ता. नायगाव येथील रहिवासी असणारा व सध्या पुणे येथे वास्तव्यास असणारे कुटुंब आणि त्या कुटुंबातील गंगाधर नागोराव शिंदे (वय अंदाजे २० वर्षे), नागोराव चंपती शिंदे रा. मनूर, जयश्री नागोराव शिंदे व माधव नागोराव शिंदे यांनी संगनमताने नोकरीचे व इतर अमिषे दाखवून मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.
सदर मुलीशी काहीही संपर्क होत नसल्याने मुलगी जीवंत आहे की नाही, याबाबत पालकांना शंका निर्माण होत आहे. या घटनेच्या अगोदर सुरुवातीला कुंटूर पोलिसांत मिसिंग केस दाखल करण्यात आली होती. या संदर्भात फिर्याद दाखल करूनही तीन महिने उलटूनही कारवाई नाही.
आपणास न्याय मिळावा यासाठी नायगाव येथील आर्य वैश्य समाजातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई यांची भेट घेऊन महासभेकडे न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. त्यानुसार महासभेच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना निवेदने देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना निवेदन देताना नंदकुमार मडगुलवार, सदानंद मेडेवार, विजयकुमार कुंचनवार, महेश धूमशेटवार, सतीश मेडेवार, सतीश लोकमनवार, गजानन चौधरी, नरेंद्र येरावार, साईनाथ मेडेवार, सूर्यकांत कवटिकवार, पवन गादेवार, कोंडीबा काचमवार, संभाजी पाटील शिंदे, आनंदराव पाटील शिंदे, पांडुरंग कोडगिरे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. तेव्हा शहाजी उमाप यांनी लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांना यासंदर्भात लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.


COMMENTS