संचमान्यतेतील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा; तांत्रिक त्रुटी २-३ दिवसांत दूर करण्याचे आश्वासन
पुणे / विशेष बातमी:
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण सहसंचालक मा. श्रीराम पानझडे साहेब यांची भेट घेऊन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील संचमान्यता तसेच प्रस्तावित २०२६-२७ च्या संचमान्यतेसंदर्भातील अडचणींवर सविस्तर सहविचार सभा घेतली.
बैठकीच्या प्रारंभी २०२५-२६ च्या संचमान्यतेत प्रॅक्टिकलच्या तुकडीतील विद्यार्थीसंख्या २० पर्यंत मर्यादित करणे आणि तासिकांचा कालावधी बदलण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर महासंघाने ठाम भूमिका मांडली. संपूर्ण संचमान्यतेचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सहसंचालकांनी स्पष्ट केले.
२०२६-२७ संचमान्यतेसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय व स्पष्टीकरणे:
१. संचमान्यता भरण्याची कालमर्यादा:
कनिष्ठ महाविद्यालयांच्या २०२६-२७ च्या संचमान्यतेची माहिती भरण्यासाठी कोणतीही स्वतंत्र अंतिम कालमर्यादा निश्चित केलेली नाही. ३० सप्टेंबर ही कालमर्यादा केवळ माध्यमिक विभागासाठी आहे. कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र विचार केला जाईल.
२. सध्या उपलब्ध विद्यार्थीसंख्या ग्राह्य:
UDISE+ पोर्टलवर सध्या उपलब्ध असलेली विद्यार्थीसंख्या भरता येईल. अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदललेली संख्या पुढील टप्प्यावर Edit/Update करता येईल.
३. विविध विषयांची सुविधा उपलब्ध होणार:
शिक्षणशास्त्र, गृहविज्ञान, डिझाईन, सहकार, भूगोल, संरक्षणशास्त्र, संगीत, तर्कशास्त्र आदी विषय UDISE+ वर उपलब्ध होण्याबाबत सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून पुढील २-३ दिवसांत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
४. संयुक्त तुकडीसाठी पर्याय:
संयुक्त तुकडीच्या नोंदीसाठी ‘Others’ किंवा ‘Composite’ Tab चा वापर करून माहिती भरावी.
५. एकाच शाखेत दोन माध्यमे असल्यास स्वतंत्र नोंद:
एकाच शाखेत दोन माध्यमे असल्यास प्रत्येक माध्यमातील विषयनिहाय विद्यार्थीसंख्या स्वतंत्रपणे विचारात घेतली जाईल.
६. तक्रारींसाठी स्वतंत्र सुविधा:
संचमान्यतेसंदर्भातील अडचणी व तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र App अथवा Helpline उपलब्ध करून देण्याची महासंघाची मागणी सहसंचालकांनी मान्य केली आहे.
७. सांगली जिल्ह्यातील UDISE क्रमांकाची समस्या:
सांगली जिल्ह्यातील सुमारे १५ कनिष्ठ महाविद्यालयांना दोन UDISE क्रमांक असल्याची अडचण दूर करून योग्य पद्धतीने संचमान्यता करण्याचे मान्य करण्यात आले.
तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांनी घाबरून जाऊ नये
UDISE+ पोर्टलवरील त्रुटी या तांत्रिक स्वरूपाच्या असून त्या कायमस्वरूपी नाहीत. बहुतांश तांत्रिक समस्या पुढील २-३ दिवसांत दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर किंवा प्राचार्यांकडून दिल्या जाणाऱ्या स्थानिक सूचनांकडे अंतिम कालमर्यादा म्हणून पाहू नये, असे आवाहन महासंघाने केले आहे.
प्रॅक्टिकल बॅच व तासिकांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरूच राहणार
प्रॅक्टिकलच्या बॅचमधील विद्यार्थीसंख्या पूर्ववत करणे आणि तासिकांचा कालावधी पूर्वीप्रमाणे ठेवणे या मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे महासंघाचा संघर्ष सुरूच राहील आणि आगामी आंदोलनांमध्ये सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
उपस्थित पदाधिकारी:
सभेस शिक्षण सहसंचालक मा. श्रीराम पानझडे साहेब, महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. लक्ष्मण रोडे, कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, उपाध्यक्ष प्रा. रविंद्र भदाणे, उपाध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी, सहसचिव प्रा. दिलीप शितोळे, मार्गदर्शक प्रा. संतोष फाजगे, पुणे जिल्हाध्यक्ष प्राचार्य विक्रम काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS