नरेंद्र येरावार
उमरी
बोळसा बुद्रुक, ता. उमरी येथील तरूण दत्ताहरी पंढरी तलकोकुलवार यांनी काही दिवसांपूर्वी उमरी रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे तलकोकुलवार कुटुंबावर मोठा आघात झाला.
दत्ताहरी तलकोकुलवार हे रोजगाराच्या शोधात हैदराबाद येथे मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी आपल्या दोन बहिणींच्या विवाहाची जबाबदारी पार पाडली. मात्र त्यानंतर निर्माण झालेली आर्थिक विवंचना, अल्प शेती आणि त्यातच निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे कुटुंबावर आर्थिक संकट अधिकच गडद झाले.
कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले; मात्र वाढते आर्थिक संकट आणि परिस्थितीशी सामना करताना आलेल्या अडचणींमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या अकाली निधनाने तलकोकुलवार परिवाराने कुटुंबातील तरुण आधार गमावला आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी बोळसा बुद्रुक येथील तलकोकुलवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दुःखात कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आर्थिक मदत केली.
यावेळी बोळसा गणपतराव मरोळे, देवराव पाटील वडजे,मनू डिडेवाड,शंकर पाटील गोरटकर, ज्ञानेश्वर दारसेवाड, गोविंद राठोड, माधव पाटील ढगे, कवळे गुरूजी यांचे स्वीय सहायक आनंद चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
...........

COMMENTS