पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे हे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड शाखेचे सचिव आहेत. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष...
पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे हे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नांदेड शाखेचे सचिव आहेत. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे समन्वयक म्हणूनही काम पाहिले आहे. 'अर्थबोध' आणि 'अर्थविचार' ह्या परिषदेच्या मुखपत्रांचे संपादक म्हणून काम केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीला आणि पीपल्स कॉलेजला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. ह्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डॉ. सुकाळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांचे छोटेखानी पण उत्तम चरित्र लिहिले आहे. 'स्वातंत्र्यसैनिक ते शिक्षणप्रणेते युगपुरुष स्वामी रामानंद तीर्थ : जीवनकार्य, शैक्षणिक विचार आणि संदेश' असे ह्या पुस्तकाचे शीर्षक आणि स्वरूप आहे. विद्यापीठाच्या कक्षेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना स्वामीजींचे कार्यकर्तृत्व समजावे, या हेतूने हे चरित्रलेखन सिद्ध झालेले आहे.
स्वामीजींचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. व्यंकटेश खेडगीकर यांचा जन्म दि. ३ ऑक्टोबर १९०३ रोजी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी ह्या गावी झाला. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या गुरुंनी त्यांना 'स्वामी रामानंद तीर्थ' हे नाव दिले. बालपणापासूनच व्यंकटेश हे संन्यस्त वृत्तीचे होते. त्यांचे वडील भगवानराव खेडगीकर यांनी त्यांना दोन मुले झाल्यानंतर संन्यास घेतला होता. म्हणून विरक्त वृत्तीच्या व्यंकटेश यांनाही संन्यासाश्रमाचे आकर्षण वाटत होते. व्यंकटेश यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी सिंदगी येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण सोलापूर येथे झाले. त्यांना बालपणापासूनच अवांतर वाचनाची आवड होती. विद्यार्थिदशेतच त्यांना देशभक्तीने झपाटले होते. त्यामुळे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करण्याचा निर्धार केला.
व्यंकटेश सोलापुरात शिकत असताना गांधीजी रेल्वेने सोलापूरला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी व्यंकटेश स्टेशनवर गेले होते. त्यांनी गांधीजींना चरणस्पर्श केला. गांधीजींनी दोन्ही खांदे धरून व्यंकटेशला उठवले आणि त्यांना म्हणाले, 'देश के लिये कुछ करो'.
गांधीजींच्या ह्या उद्गारांनी व्यंकटेशला देशकार्य करण्याची आणखी प्रेरणा मिळाली. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यंकटेशने शाळा सोडून दिली. असहकार चळवळीचा प्रचार करत गावोगावी फिरू लागले. दरम्यान ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांनी अमळनेर येथील राष्ट्रीय महाविद्यालयातून इंटरमिजीएटची पदवी मिळवली. या काळात त्यांनी विद्यार्थ्यांचे संघटन सुरू केले. अमळनेरचे कॉलेज बंद पडल्यामुळे त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून बी. ए.ची पदवी संपादन केली. या काळात त्यांनी पुण्यातील देशभक्त कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. याच काळात व्यंकटेश यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला.
व्यंकटेश यांनी कामगार चळवळीचे नेते ना. म. जोशी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कामगार संघटनेसाठी काम केले. या प्रभावातून ते लोकशाही समाजवादाचे पुरस्कर्ते बनले. मुंबईतील वातावरण त्यांच्या प्रकृतीला न मानवल्यामुळे ते सोलापूर येथे कामगार संघटनेचे काम करू लागले.
तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या जवळ हिप्परगा येथे काही ध्येयवादी लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय शाळा सुरू केली होती. त्या मंडळींनी व्यंकटेश यांना शाळेचे मुख्याध्यापकपद स्वीकारण्याची विनंती केली. ते आधीपासूनच खादी वापरत असत. त्यांचे राहणीमान अगदी साधे होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांना शाळा हे कार्यक्षेत्र चांगले वाटले, म्हणून त्यांनी हिप्परग्याच्या शाळेचे मुख्याध्यापकपद स्वीकारले आणि एक रुपयासुद्धा वेतन न घेण्याच्या अटीवर ते ९ जून १९२९ रोजी शाळेत रुजू झाले.
व्यंकटेश खेडगीकर यांनी दि. १४ जानेवारी १९३२ रोजी संन्यासदीक्षा घेतली. स्वामीजींनी शाळेतून कधीच वेतन घेतले नाही. अपरिग्रह वृत्तीने जीवन जगत राहिले. त्यांची हिप्परग्याची शाळा गावाबाहेर, नदीकाठी एखाद्या गुरुकुलासारखी होती. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एका झोपडीत एकत्रच राहात असत. सगळ्यांचे जेवण एकच. वि. स. खांडेकर यांनी या शाळेचा उल्लेख 'हिप्परग्याच्या माळावरची बाग' असा केला आहे. हिप्परग्याची शाळा म्हणजे परिपूर्ण माणूस घडविणारी कार्यशाळा होती. युवकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करावे, अशी मुख्य शिकवण या शाळेत दिली जात असे. स्वामीजींसोबत जे शिक्षक होते, त्या सगळ्यांनी पुढे हैदराबाद मुक्तिसंग्रामात झोकून दिले. स्वामीजींनी ह्या शाळेत सात वर्षे काम केले. पुढे १९३५मध्ये प्लेगची साथ आल्यामुळे ही शाळा सोलापूरला हलविण्यात आली. एव्हाना स्वामीजींच्या राजकीय कार्याची व्याप्ती वाढली होती. स्वामीजींसह त्यांच्या सहकाऱ्यांनी हैदराबाद मुक्तीची शपथ घेतली आणि १९३६च्या जून महिन्यात हिप्परग्याच्या शाळेचा निरोप घेतला.
स्वामीजींची संन्यासदीक्षा म्हणजे जनकल्याणासाठी आणि देशकार्यासाठी विचारपूर्वक घेतलेले व्रत होते. आपला जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, याची खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधली होती. त्यांनी आयुष्यात कधीही आणि कोणतेही कर्मकांड केले नाही. गांधीजींच्या सूचनेनुसार स्वामीजी अखंड मानवसेवेत व्यग्र राहिले. १९१८ साली अंबाजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. तेथील सर्व संचालक स्वामीजींना मानणारे होते. स्वामीजींनी १९३५मध्ये ह्या शाळेचे पुनरुज्जीवन केले. अस्पृश्यता संपविण्यासाठी सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले. स्वामीजी आध्यात्मिक वृत्तीचे असले तरी ते विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी काळाची पावले ओळखून १९५६मध्ये अंबाजोगाई येथे योगेश्वरी विज्ञान महाविद्यालय सुरू केले.
त्या काळात हैदराबाद संस्थानात निजामाची अन्यायकारक राजवट होती. या संस्थानात मराठवाड्यातील पाच, तेलंगणातील आठ आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांचा समावेश होता. या संस्थानातील जनतेला कसलेच नागरी स्वातंत्र्य नव्हते. निजामाची 'रजाकार' ही संघटना जनतेवर अनन्वित अत्याचार करत होती. जनतेच्या मनात निजामविरोधी प्रक्षोभ होता, पण त्यांना कोणीही वाली नव्हता. आता स्वामीजींनी आपला मुक्काम हैदराबादला हलविला. मराठी, कन्नड आणि तेलुगू भाषिकांचे संघटन करून हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची स्थापना केली. आपल्या चळवळीला जातीयवादी स्वरूप येणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली. जबाबदार शासनपद्धतीच्या मागणीसाठी हैदराबादेत सत्याग्रह केला. निजाम सरकारने त्यांना दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. १०१ दिवस अंधारकोठडीत ठेवण्यात आले.
तुरुंगात स्वामीजींचा खूप छळ करण्यात आला.
१० एप्रिल १९३९ रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.
स्वामीजी सेवाग्रामला जाऊन गांधीजींसोबत चर्चा करून, त्यांचे मार्गदर्शन घेत असत. एके दिवशी गांधीजींनी स्वामीजींना सांगून टाकले, 'आता हैदराबाद संस्थानातील जनतेला तुमच्या रूपाने एक खरा मोठा नेता लाभला आहे. आता ही लढाई आपण जिंकणारच आहोत'.
वैयक्तिक सत्याग्रही म्हणून ११ सप्टेंबर १९४० रोजी स्वामीजींना अटक करून निजामाबादच्या तुरुंगात ठेवण्यात आले. या काळात त्यांनी आपले वाचन वाढवले. तुरुंगातून सुटका झाल्यावर स्वामीजींनी जनसंघटन आणि इतर विधायक स्वरूपाचे कार्य हाती घेतले. १९४२च्या 'चले जाव' चळवळीत सक्रिय होण्यासाठी स्वामीजींनी हैदराबादला सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्याआधीच निजाम सरकारने त्यांना अटक करून चंचलगुडा तुरुंगात टाकले. स्वामीजींनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे १९४६मध्ये सरकारने स्टेट कॉंग्रेसवरील बंदी उठवली. त्यामुळे स्वामीजींचे नेतृत्व अधिकच व्यापक झाले. १९४६मध्ये स्टेट कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन स्वामीजींच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
स्वामीजींनी दिल्ली येथे गांधीजींची भेट घेऊन हैदराबाद संस्थानातील परिस्थिती समजावून सांगितली आणि गांधीजींकडून सशस्त्र क्रांतीला परवानगी मिळवली. १५ ऑगस्ट १९४७ला संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला, तरी हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी जोखडात होते. निजाम सहजासहजी संस्थान स्वतंत्र करायला तयार नव्हता. स्वामीजींनी नेहरू आणि पटेल यांची भेट घेऊन लष्करी कारवाई करण्याची मागणी केली. या काळात संस्थानात वेगवेगळ्या ठिकाणी क्रांतिकारी घटना घडल्या. रजाकाराचे अत्याचार वाढले. निजामाच्या राजवटीची दहशत वाढली होती.
स्वामीजींनी तिरंगा ध्वज हातात घेऊन हैदराबादमध्ये मिरवणूक काढली. त्यामुळे स्वामीजींना अटक करण्यात आली. तुरुंगातून सुटका झाल्यावर स्वामीजींनी संस्थानाच्या बाहेर जाऊन राष्ट्रीय नेत्यांना हैदराबाद मुक्तिसंग्रामाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. निजामाच्या राजवटीचा शेवट करण्यासाठी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि संरक्षणमंत्री बलदेव सिंग यांनी लष्करी कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले. अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला. योद्धा संन्यासी असलेल्या स्वामीजींच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९५२ साली स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत स्वामीजी गुलबर्गा मतदारसंघातून ५६ हजार मते मिळवून विजयी झाले. १९५७मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ते औरंगाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. स्वामीजींचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी लोकसभेत इंग्रजीतून केलेली भाषणे ऐकण्यासाठी पंडित नेहरू आवर्जून उपस्थित असत. हैदराबाद संस्थानाच्या विसर्जन आणि विलीनीकरणानंतर स्वामीजींनी मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. स्वामीजींनी भाषावर प्रांतरचनेसाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. स्वामीजींनी तिसऱ्या लोकसभेची निवडणूक लढवावी, यासाठी पंडित नेहरू आग्रही होते. त्याला स्वामीजींनी नकार दिला. राज्यसभेत जाण्यासही त्यांनी नकार दिला. १९६२ साली स्वामीजींनी निवडणुकीच्या राजकारणातून कायमची निवृत्ती घेतली.
हैदराबाद संस्थानातील भाग सर्वार्थाने मागास होता. ह्या प्रदेशाचे मागासलेपण घालविण्यासाठी स्वामीजींनी शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित केले. १९४९मध्ये हैदराबाद येथे विवेकवर्धिनी शिक्षण संस्थेचे पहिले खाजगी महाविद्यालय त्यांनी सुरू केले. विद्यार्थ्यांवर लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे संस्कार करण्याच्या हेतूने २६ जून १९५० रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्या माध्यमातून पीपल्स कॉलेज सुरू केले. कॉलेजला 'पीपल्स' हे नाव देण्यामागे स्वामीजींना जनसामान्यांप्रतिची बांधिलकी, लोकशाही, मानवता आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये अपेक्षित होती. याच संस्थेतर्फे १९५३मध्ये पीपल्स हायस्कूलची स्थापना करण्यात आली. १९६३मध्ये संस्थेचे स्वतंत्र विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात आले.
स्वामीजींनी लातूर येथील सहका-यांच्या मदतीने १९५५मध्ये लातूर येथे पुरणमल लाहोटी तंत्रशिक्षण विद्यालय सुरू केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी २९ जून १९५६ रोजी अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून योगेश्वरी विज्ञान महाविद्यालय सुरू केले. या काळात स्वामीजींच्या प्रेरणेने महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालय आणि सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या स्थापनेमागे स्वामीजींची प्रेरणा होती. मराठवाड्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, या मागणीचा स्वामीजी १९५४-५५पासून पाठपुरावा करत होते. त्यानुसार २३ ऑगस्ट १९५८ रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. स्वामीजींचे आणखी एक स्वप्न साकार झाले. स्वामीजींनी १९६६मध्ये आंध्र प्रदेशातील पिठापूरम चिंतलूर येथे रामतीर्थ शांती महाविद्यालयाची स्थापना केली. स्वामीजींचे शिक्षण क्षेत्रातील हे अफाट कार्य लक्षात घेऊन १९७०मध्ये मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट्. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला
डॉ. विकास सुकाळे यांनी एका स्वतंत्र प्रकरणात स्वामीजींच्या शिक्षणविषयक विचारांचा तपशीलवार आढावा घेतला आहे. स्वामीजींच्या शिक्षणविषयक विचारांवर महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. स्वामीजींना 'शिक्षण' ह्या संकल्पनेत मानवजातीचे अंतिम कल्याण अपेक्षित होते. म्हणून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचा आग्रही पुरस्कार केला. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी शिक्षण संस्थांना लोकाश्रय मिळवून दिला. दलित आणि बहुजनवर्गाच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांनी श्रमजीवी, निरक्षर लोकांना आणि स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. स्वामीजींनी शिक्षक आणि कर्मचारी यांना शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनात महत्त्वाचे स्थान दिले आहे. शिक्षकांना आचार असावी असे त्यांना वाटत होते. शिक्षकांचा धर्म हा मानवताधर्म असावा, याकडे स्वामीजींचा कटाक्ष होता. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्यात स्वदेश आणि स्वसंस्कृती यांच्याबद्दल प्रेम निर्माण व्हावे, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी हिप्परग्यापासून पिठापूरमपर्यंतच्या प्रवासात आटोकाट प्रयत्न केले.
स्वामी रामानंद तीर्थ हे एक तेजस्वी, तपस्वी, तत्त्वनिष्ठ युगपुरुष आणि युवकांचे प्रेरणास्थान होते. ते हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते होते. स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वात आपल्याला राष्ट्रभक्ती, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक सुधारणा यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो. डॉ. विकास सुकाळे यांनी 'स्वामीजींचे चिंतनशील संदेश' ह्या प्रकरणात १०५ अवतरणांतून स्वामीजींच्या शैक्षणिक विचारांचे नवनीत वाचकांच्या हातावर ठेवले आहे. हे सर्वच विचार प्रत्येकाने चिंतन, मनन करून आचरणात आणण्यासारखे आहेत.
१९७१मध्ये स्वामीजींना पक्षाघात झाला. दि. २२ जानेवारी १९७२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. स्वामीजींनी स्वतःचा संसार केला नसला, तरी अनेकांचे संसार सुखाचे व्हावेत यासाठी आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारतातील सर्वात मोठे, श्रीमंत आणि सामर्थ्यशाली असलेले निजामाचे हैदराबाद संस्थान ह्या संन्याशाच्या नेतृत्वाने संपुष्टात आणले. स्वामीजींनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत आजही अभिमानाने उभ्या आहेत. स्वामीजींच्या नावाने नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ हे विद्यापीठ उभे राहिले आहे. ह्या विद्यापीठाकडे पाहिल्यावर एका शिक्षकाचे आणि शिक्षणतज्ज्ञाचे कार्यकर्तृत्व नजरेसमोर साकार होते.
डॉ. विकास सुकाळे यांनी लिहिलेले हे परिपूर्ण पुस्तक लातूरच्या विद्याभारती प्रकाशनाने अवघ्या ७० रुपयांत उपलब्ध करून दिले आहे. चरित्राची भाषा अतिशय सोपी आणि ओघवती आहे. ह्या प्रेरणादायी पुस्तकाच्या निर्मितीसाठी लेखक आणि प्रकाशक, दोघांचेही हार्दिक अभिनंदन!

- 'युगपुरुष स्वामी रामानंद तीर्थ' (चरित्र)
- लेखक : डॉ. विकास सुकाळे
- प्रकाशक : विद्याभारती प्रकाशन, लातूर
- पृष्ठे ९६ किंमत रु. ७०
- पुस्तक परिचय :
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
- sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS