नांदेड: राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महत्त्वाचे असलेले 'वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ' तातडीने कार्यान्वित करण्यासाठी...
नांदेड: राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महत्त्वाचे असलेले 'वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ' तातडीने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार श्रीजया चव्हाण यांनी दिली. नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतीच आमदार श्रीजया चव्हाण यांची भेट घेऊन राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ विषयी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा 'सत्यप्रभा'चे संपादक संतोषजी पांडागळे व राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने बालाजी पवार यांनी आमदार श्रीजया चव्हाण यांना वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी आजवर झालेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. तेंव्हा वृत्तपत्र विक्रेता महामंडळाची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने बालाजी पवार यांनी केली. शिष्टमंडळाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आमदार श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, "वृत्तपत्र विक्रेते हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा आणि असंघटित घटक आहेत. त्यांच्या कल्याणासाठी हे महामंडळ लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच संबंधित मंत्री आणि असंघटित कामगार आयुक्त यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसेच मंत्रालयात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करून या महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच येणाऱ्या अधिवेशनात सुध्दा प्रश्न उपस्थित करणार असेही यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीला नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, सचिव गणेश वडगावकर, उपाध्यक्ष सतिश कदम, बालाजी चंदेल, सत्यनारायण देवरकोंडा, बालाजी सुताडे, गणेश पवार यांच्या सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

COMMENTS