मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
दिव्यांग, वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील (कुंचेलीकर) यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा परिसरातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दिव्यांगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या स्तरावर दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत आतापर्यंत १२ बैठका आणि १ सुनावणी होऊनही प्रश्न ‘जैसे थे’च असल्याबद्दल डाकोरे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा तसेच दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांशी संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.
दिव्यांगांच्या प्रशासकीय छळाविरोधात नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. निवेदनातील मागण्यांवर १५ दिवसांच्या आत समाधानकारक लेखी उत्तर व आवश्यक कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या
१) दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबाबतच्या कायद्याची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने किती वेळा ग्रामसभा अथवा बैठक घेतली? त्याची रजिस्टर प्रत व संबंधित माहिती द्यावी.
२) ग्रामपंचायतीकडील दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवहीची माहिती उपलब्ध करून द्यावी.
३) सन २०१६ पासून आजपर्यंत दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी किती वेळा वितरित करण्यात आला? लाभार्थ्यांची नावे, स्वाक्षऱ्या, वितरित वस्तू, रक्कम व मोबाईल क्रमांकासह रजिस्टरची माहिती द्यावी.
४) दिव्यांगांना व्यवसायासाठी शासकीय जागा अथवा गाळे किती जणांना उपलब्ध करून देण्यात आले? त्याची संपूर्ण माहिती द्यावी.
५) रोहयोअंतर्गत काम देता येत नसलेल्या दिव्यांगांना १०० दिवसांचा भत्ता किती जणांना देण्यात आला? त्याची माहिती द्यावी.
६) आतापर्यंत किती दिव्यांगांना घरकुलाचा लाभ देण्यात आला? घरकुलासाठी किती प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्यात आले? याबाबत ग्रामपंचायतीने बैठक घेतली का, याची माहिती द्यावी.
७) शासनाच्या विविध विभागांमध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणातून किती दिव्यांगांना लाभ मिळाला? त्याची माहिती द्यावी.
८) दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या व्यंगावरून अपमानित करणे, मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे तसेच त्यांच्या घरावर किंवा शेतीवर अतिक्रमण करणे यासंदर्भात दिव्यांग कायदा २०१६ मधील कलम ९२ अंतर्गत होणाऱ्या कारवाईबाबत जनजागृती करण्यात आली आहे का? त्याची माहिती द्यावी.
९) मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू न शकणाऱ्या दिव्यांगांसाठी घरोघरी मतदानाची सुविधा व नोंदणीबाबत माहिती देण्यात आली आहे का? त्याची माहिती द्यावी.
वरील दिलेल्या सर्व मागण्यांवर १५ दिवसांच्या आत समाधानकारक लेखी उत्तर आणि प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिला. तसेच स्वेच्छामरणाची परवानगी मागण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय निवेदनाद्वारे गावागावांत कळविण्यात यावा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष मगदूम शेख ऊंद्रिकर, हेमंत पाटील, सचिन राजुरे, प्रमोद इंगळे, गोपाळ राजुरा, राम राजुरे, सुधाकर जाधव, नामदेव वाघमारे, तुळसा गंगाधर, नेहा भंडारे, मारोती वाघमारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS