नाशिक नरेंद्र येरावार
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार, भागवताचार्य परमपूज्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा केजकर यांचा चांदीचा मुकुट परिधान करून त्यांचे परमस्नेही श्री रामभाऊ वाघ (डासाळा) यांनी सन्मान सोहळा अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात संपन्न केला.
हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या या सोहळ्याने परिसरातील आध्यात्मिक वातावरण भारून गेले होते.
भक्ती, प्रेम आणि सन्मानाचा त्रिवेणी संगम
श्री रामभाऊ वाघ हे समाधान महाराजांचे अनेक वर्षांपासूनचे परमस्नेही आणि निस्सीम भक्त आहेत. महाराजांनी भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केलेल्या अखंड सेवेची दखल म्हणून आणि त्यांच्या बद्दल असलेल्या अपार श्रद्धेपोटी श्री वाघ यांनी स्वखर्चातून चांदीचा आकर्षक मुकुट तयार करून घेतला होता.
आज झालेल्या विशेष कथा समारंभात टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात श्री रामभाऊ वाघ यांच्या हस्ते हा चमचमता चांदीचा मुकुट परमपूज्य समाधान महाराजांच्या मस्तकी विराजित करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी "ज्ञानोबा माऊली तुकाराम" च्या गजराने संपूर्ण मंडप दणाणून सोडला.
मुकुट विराजित होताच महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज आणि आनंद द्विगुणित झाला. उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि पुष्पवृष्टी करून या सोहळ्याचे स्वागत केले.
या भव्य दिव्य सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर ह.भ.प., ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ आणि हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाधान महाराजांनी उपस्थितांना भागवत धर्माचे महत्त्व सांगत आशीर्वाद दिला आणि रामभाऊ वाघ यांच्या या निस्वार्थ प्रेम आणि भक्तीभावाचे कौतुक केले
"हा मुकुट माझ्या मस्तकी नाही, तर माझ्या वारकरी संप्रदायाच्या सेवेचा सन्मान आहे. रामभाऊंसारखे स्नेही लाभणे हे माझे भाग्य आहे. हा मुकुट पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण आहे," असे भावोद्गार यावेळी समाधान महाराजांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. अशी माहिती जेष्ठ पञकार नरेंद्र येरावार यांनी दिली

COMMENTS