ग्रामीण जीवनातील दारिद्र्य, श्रम, स्थलांतर, शिक्षणाची ओढ, कौटुंबिक जिव्हाळा आणि स्वाभिमानाची धडपड यांना अस्सल शब्दरूप देणारे लेखक म्हणून तानाजी बबन धरणे यांनी मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कविता, कादंबरी, आत्मकथन आणि गीतलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी केलेली निर्मिती त्यांच्या संघर्षमय जीवनानुभवातून आकाराला आली आहे.
तानाजी धरणे यांच्या लेखनाची सुरुवात सन १९८९ मध्ये, इयत्ता सातवीत असताना काव्यलेखनाने झाली. मात्र नोकरीचा शोध, प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सन १९९४-९५ च्या सुमारास त्यांचे लेखन थांबले. सन १९९८ मध्ये कोकण निवड मंडळामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ते ग्रामसेवक म्हणून सेवेत रुजू झाले. नोकरी, संसार आणि सामाजिक जबाबदाऱ्यांच्या व्यापात पुढील सुमारे चोवीस वर्षे त्यांच्याकडून कोणतेही लेखन झाले नाही.
नोकरीनिमित्त महाड ते पेण असा जवळपास बारा वर्षे नियमित प्रवास करताना त्यांनी कोकणातील ग्रामीण जीवन, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, कष्टकरी समाजाची जगण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि बदलत जाणारे गाव जवळून अनुभवले. सन २०१८ मध्ये त्यांची दोन्ही मुले शिक्षणासाठी पुण्याला गेल्यानंतर त्यांच्या दिनक्रमात काहीसा बदल झाला. मनात साठलेल्या अनुभवांना शब्दरूप देण्याची इच्छा पुन्हा जागी होऊ लागली; मात्र प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात होत नव्हती.
डिसेंबर २०२० मधील एका एस.टी. प्रवासाने त्यांच्या साहित्यिक जीवनाला अनपेक्षित वळण दिले. प्रवासात मनात आलेले विचार त्यांनी कागदावर उतरवले. घरी परतल्यानंतर ते लेखन पत्नी पुष्पा यांना वाचून दाखवले. “अहो, जमतेय की…!” या त्यांच्या सहज उद्गारांनी धरणे यांच्या मनातील आत्मविश्वास जागा केला. अनेक वर्षे थांबलेली लेखनाची गाडी पुन्हा सुरू झाली आणि प्रदीर्घ मौनानंतर त्यांच्या शब्दांना नवी वाट मिळाली.
नव्याने सुरू झालेल्या या लेखनप्रवासात ग्रामीण जीवन, शेतकरी-कष्टकरी समाज, नात्यांतील जिव्हाळा, सामाजिक वास्तव आणि मानवी संवेदना त्यांच्या साहित्याचे केंद्र बनले. अवघ्या सहा वर्षांत त्यांनी सहा कवितासंग्रह आणि दोन कादंबऱ्या अशी आठ पुस्तके वाचकांसमोर आणली. ‘शेताच्या बांधावर’, ‘सांजवेळ’, ‘स्वप्नचित्र’, ‘चांदणं पेरित जाऊ’, ‘होरपळ’ आणि ‘माणुसकीच्या रेषा’ या कवितासंग्रहांमधून ग्रामीण माणसाचे जगणे, प्रेम, वेदना, निसर्ग, श्रमसंस्कृती आणि सामाजिक जाणिवांचे विविध पदर व्यक्त झाले आहेत.
सन २०२३ मध्ये प्रकाशित झालेली ‘हेलपाटा’ ही कादंबरी तानाजी धरणे यांच्या साहित्यप्रवासातील मैलाचा दगड ठरली. ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील मुलाचे खडतर शालेय जीवन, दारिद्र्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, शिक्षणासाठी करावी लागलेली पायपीट आणि संकटांवर मात करण्याची जिद्द या कादंबरीतून प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. एका व्यक्तीची संघर्षकथा सांगताना ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांच्या जगण्याचे प्रतिनिधित्व ही कादंबरी करते.
अनुभवातील प्रामाणिकपणा, ग्रामीण परिसराचे जिवंत चित्रण, गावाकडच्या बोलीभाषेचा सहज वापर आणि सत्याच्या अधिकाधिक जवळ जाणारे निवेदन ही ‘हेलपाटा’ची बलस्थाने आहेत. कादंबरी लिहिताना धरणे यांनी अनेक रात्री जागून काढल्या. पहाटे तीन वाजता उठून कादंबरीचा एखादा भाग लिहिला जाई. हे लेखन प्रसिद्धीच्या अपेक्षेने नव्हे, तर मनात साठलेल्या अनुभवांना अभिव्यक्ती देण्याच्या अस्वस्थतेतून घडले.
वाचकांनी या कादंबरीवर भरभरून प्रेम केले. अवघ्या काही वर्षांत तिच्या आठ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून नववी आवृत्ती लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतील तसेच परदेशांतील मराठी वाचकांपर्यंतही ती पोहोचली आहे.
‘हेलपाटा’चा हिंदी आणि इंग्रजी भाषांत अनुवाद झाला असून गुजराती अनुवादाचे काम सुरू आहे. अशा प्रकारे मराठीसह चार भाषांमधून या कादंबरीचा प्रवास विस्तारत आहे. तिला आजवर २१ उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नामवंत समीक्षक, साहित्यिक आणि वाचकांनी तिची दखल घेतली असून ९९ हून अधिक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने ‘आनंदाचं पान’ या सदरात ‘लक्षवेधी पुस्तक’ म्हणून कादंबरीचा विशेष परिचय करून दिला.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथील एम.ए. मराठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात ‘हेलपाटा’चा समावेश करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापर्यंत सहज पोहोचता न आलेल्या ग्रामीण मुलाची संघर्षकथा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पोहोचणे, ही लेखकासाठी अत्यंत भावस्पर्शी घटना आहे. आपल्या वाट्याला सहज न आलेले विद्यापीठाचे दार स्वतःच्या कादंबरीने उघडले, ही भावना त्यांच्या साहित्यिक प्रवासाला वेगळे महत्त्व प्राप्त करून देते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ‘हेलपाटा’ची पीएच.डी. संशोधनासाठी अधिकृत निवड झाली आहे. ग्रामीण जीवनानुभवावर आधारित साहित्यकृतीचा विद्यापीठीय अभ्यासक्रम आणि संशोधनासाठी स्वीकार होणे, हा तिच्या साहित्यिक गुणवत्तेचा महत्त्वपूर्ण गौरव आहे.
तानाजी धरणे यांच्या साहित्यप्रवासाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सद्भावनापत्राद्वारे प्रोत्साहन दिले. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, प्रवीण दवणे, बाबाराव मडावी, नवनाथ गोरे आणि दत्ताभाऊ मानुगडे यांचे मार्गदर्शन व पाठबळ त्यांना लाभले. ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, निवेदिका भारती सहस्रबुद्धे तसेच ‘सकाळ’, ‘लोकमत’, ‘पुढारी’, ‘पुण्यनगरी’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि विविध प्रसारमाध्यमांतील पत्रकारांनी त्यांच्या साहित्याची दखल घेतली. ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक; पी.आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशन; मुखपृष्ठकार शिरीष घाटे आणि स्नेही-वाचकांनी त्यांच्या साहित्यप्रवासाला बळ दिले.
तानाजी धरणे यांचे साहित्य त्यांच्या अनुभवविश्वाशी प्रामाणिक राहते. प्रसिद्धीपेक्षा वास्तवातील माणूस, त्याच्या जगण्यातील संघर्ष आणि ग्रामीण मातीचा अस्सल गंध जपण्याला ते अधिक महत्त्व देतात. त्यांच्या लेखनात कृत्रिम अलंकरणापेक्षा अनुभवांची सत्यता, बोलीभाषेचा सहजपणा आणि सामान्य माणसाविषयीची आस्था प्रकर्षाने जाणवते.
‘हेलपाटा’च्या यशानंतरही ते हुरळून गेलेले नाहीत. उलट या यशामुळे आपल्यावरील सामाजिक आणि साहित्यिक जबाबदारी वाढल्याची त्यांची भावना आहे. आगामी काळात ‘पायपीट’, ‘कसब’ आणि इतर साहित्यकृतींमधून ग्रामीण परिसर, माणसे आणि वास्तवातील घटनांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
चोवीस वर्षांच्या प्रदीर्घ मौनानंतर पुन्हा लेखणी हातात घेऊन अवघ्या सहा वर्षांत आठ पुस्तके प्रकाशित करणारा तानाजी धरणे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. जीवनात एखाद्या टप्प्यावर थांबलेली सर्जनशीलता पुन्हा जागी होऊ शकते, मनातील अनुभवांना नवी अभिव्यक्ती मिळू शकते आणि अस्सल लेखन सातासमुद्रापार पोहोचू शकते, हे त्यांच्या वाटचालीने सिद्ध केले आहे.
– प्रा. डॉ. सुभाष वाघमारे

COMMENTS