लोहा प्रतिनिधी,
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सह्याद्री शाळेचा विद्यार्थी कपील उत्तम इंगळे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत एकूण ७ फेऱ्या खेळविण्यात आल्या. त्यापैकी ५ फेऱ्यांमध्ये विजय मिळवत कपीलने आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि उत्कृष्ट रणनीतीचे दर्शन घडवले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बुद्धिबळ हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशक्ती, निर्णयक्षमता, एकाग्रता, संयम आणि नियोजन कौशल्य विकसित करणारा बौद्धिक खेळ आहे. स्पर्धेदरम्यान कपीलने प्रत्येक डावात शांतपणे विचार करून अचूक चाली खेळत आपले कौशल्य सिद्ध केले.
त्याच्या या यशाबद्दल सह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संचालक सुदर्शन शिंदे, संचालिका जयश्री शिंदे, मुख्याध्यापक अनिल जाधव, मुख्याध्यापिका तनुजा नायक, प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी धोंडगे, क्रीडा शिक्षक गणपत पाटील तसेच सर्व शिक्षकवृंदांनी कपीलचे अभिनंदन केले व विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कपीलच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही विविध क्रीडा व बौद्धिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा
मिळणार आहे.

COMMENTS