किनवट : गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या पोलिसांच्या पथकावर लाठ्या-काठ्या व दगडांनी हल्ला करून आरोपीला पळवून नेल्...
किनवट : गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेऊन तेलंगणाकडे निघालेल्या पोलिसांच्या पथकावर लाठ्या-काठ्या व दगडांनी हल्ला करून आरोपीला पळवून नेल्याच्या घटनेने किनवट परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात किनवट पोलिसांनी सोमवारी सकाळी चिखली गावातून फरार आरोपी शेख बकर उर्फ जाफर शेख याच्यासह त्याचा भाऊ शेख सोनू याला अटक केली.
तेलंगणा राज्यातील बाजार हातनुर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात (गु.र.नं. १७३/२०२५) शेख बकर हा फरार होता. तो किनवट येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजार हातनुर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश परशुराम गोकला हे पथकासह किनवट येथे आले. पोलिसांनी शेख बकरला ताब्यात घेऊन वाहनातून तेलंगणाकडे रवाना झाले.
दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६.०५ वाजता चिखली फाट्याजवळ शेख सोनू याने ५० ते ६० महिला-पुरुषांच्या जमावासह पोलिसांचे वाहन अडवले. जमावाच्या हातात लाठ्या-काठ्या व दगड होते. परिस्थिती पाहता पोलिसांनी वाहन किनवटकडे वळवले; मात्र जमावाने पाठलाग करून पुन्हा वाहन अडवले.
जमावाने पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडून पोलिसांवर हल्ला केला. पोलीस उपनिरीक्षक रमेश गोकला यांच्या डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली, तर इतर पोलिस कर्मचाऱ्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गोंधळाचा फायदा घेत शेख बकरला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोकला यांनी सर्व्हिस पिस्तुलातून हवेत गोळीबार केला.
या प्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २.१५ वाजता किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. २२४/२०२६) दाखल करण्यात आला. खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, जमाव करून पोलिसांच्या कामात अडथळा आणणे यासह भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांन्वये ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच भोकरच्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम व पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर किनवट पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी सकाळी चिखली येथील एका घरातून शेख बकर व त्याचा भाऊ शेख सोनू यांना पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

COMMENTS