नांदेड / प्रतिनिधी:
शहरातील पूर्णा रोडवरील छत्रपती चौक परिसरात सध्या अनधिकृत बॅनर्सचा सुळसुळाट झाला असून, यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. या संदर्भात महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केली असता, अधिकाऱ्यांकडून थेट हात झटकण्याचे प्रकार समोर येत आहेत.
छत्रपती चौक, पूर्णा रोड येथे सध्या तीन मोठे अनधिकृत बॅनर्स लावण्यात आले आहेत , आणि यामध्ये एक 'व्यंकटेश्वरा पब्लिक स्कूल' () चे शैक्षणिक बॅनर (, दुसरे 'हॉटेल कावेरी' चे खाद्यपदार्थांचे व्यावसायिक बॅनर ) आणि तिसरे 'मलिका फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिटन' चे जाहिरात देणारे मोठे गुलाबी रंगाचे बॅनर यांचा समावेश आहे. हे सर्व बॅनर्स विनापरवाना व अनधिकृतपणे लावण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.
उपायुक्तांचे अजब उत्तर!
या अनधिकृत बॅनर्सबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त श्री. अजितपालसिंह संधू यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता, त्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर दिले. "छत्रपती चौक हा ग्रामीण भागात येतो," असे सांगत त्यांनी या समस्येकडे साफ दुर्लक्ष केले आणि महापालिकेची जबाबदारी झटकून टाकली.
एकीकडे महापालिका प्रशासन अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर कारवाईचा बडगा उगारत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे मुख्य रस्त्यांवरील चौकांमध्ये लागलेल्या बॅनर्सची साधी चौकशी करण्याचेही टाळले जात आहे. छत्रपती चौक खरोखरच महापालिकेच्या हद्दीत येत नाही की केवळ कारवाई टाळण्यासाठी अशी कारणे दिली जात आहेत? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. या अनधिकृत बॅनर्सवर आणि ते लावणाऱ्यांवर नेमकी कोणती यंत्रणा कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



COMMENTS