माहूर(प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील जुनापाणी नजीक एका नामांकित कंस्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर 1 मे रोजी रात्री 9 वाजताचे सुमारास टिप्परने इतर ठिकाणाहून आणलेली माती रिचवली असता,
ती नेमकी मैदानात झोपलेल्या ऑपरेटरच्या अंगावर पडली, त्यात गुदमरून त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही अत्यंत धक्कादायक व हृदयद्रावक घटना दुसरे दिवशी उघडकीस आली. हा प्रकार अपघात की
घातपात की अपघात,अशी सर्वत्र कुजबुज सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, झारखंड राज्यातील जोंगी (ता. चंदवारा, जि. कोंडरमा) येथील अजीत यादव (वय ३५) हा संबंधित साईटवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. मागील दहा दिवसांपासून कंपनीकडून डिझेल बचतीच्या कारणास्तव साईटवरील जनरेटर बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती या घटनेने पुढे आली आहे. त्यामुळे अंधार व जबर उष्णतेमुळे त्रस्त मजूरांना मोकळ्या जागेत झोपावे लागत आहे.दरम्यान, १ मे रोजी रात्री अंदाजे ९ वाजता अजीत यादव हा साईट परिसरात मोकळ्या जागेत झोपला होता. त्याचवेळी एका टिप्परने इतर ठिकाणाहून आणलेली माती नेमकी त्याच ठिकाणी टाकण्यात आली. दुर्दैवाने, त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अजीत दबला गेला, अशी माहिती प्रत्यक्षस्थळी उपस्थित असलेल्या इतर मजुरांनी दिली. 2 मे रोजी सकाळी जेसीबीद्वारे माती दुसऱ्या टिप्परमध्ये भरताना अजीतचे पाय दिसून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच माहूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. नातेवाईकांना येण्यास वेळ लागणार असल्याने शवविच्छेदन प्रक्रिया रखडली होती.
या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.परंतु प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार व प्राथमिक परिस्थिती पाहता कंपनीवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप होत असून, हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा जोर धरत आहे.दरम्यान, साईटवर आणली जाणारी माती, तिचा वापर, रात्रीच्या वेळी वाहतूक, तसेच मुरमाऐवजी मातीचा वापर यासारख्या अनेक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचा पूर्णतः अभाव असल्याचा आरोपही मजुरांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे कोट्यवधींची कामे करणाऱ्या कंपनीने डिझेल बचतीसाठी जनरेटर बंद ठेवणे, आणि त्यातून एका निष्पाप मजुराचा जीव जाणे ही बाब संतापजनक असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

COMMENTS