किनवट तालुक्यात बेचाळीस हजार हेक्टर जमिनीवर कापसाचा पेरा असून जवळपास साडेतीन लाख क्विंटल कापूस उत्पादित होण्याचा अंदाज आहे. एवढा मोठा भूभाग असलेल्या किनवट तालुक्यात केवळ एकच जिनिंग आहे. या जिनिंग ची क्षमता दररोज 900 क्विंटल असून आज पर्यंत 37000 क्विंटल म्हणजे केवळ 10 टक्के कापूस खरेदी करण्यात आला. परिणामी एक लाख क्विंटल कापूस खाजगी बाजारात 6500 रुपये दराने कापूस विकला. जवळपास दीड लाख क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे. हा कापूस शासनाने खरेदी न केल्यास 6000 रुपये दराने म्हणजे फक्त कापूस भाव फरकात किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांचे 40 कोटी रुपये लुटून कारखानदारांच्या घशात घातले जाणार आहेत. सोयाबीन मध्ये जवळपास 22 कोटी रुपये, पावसाळी मका पिकात 20 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशातून गेले.
किनवट तालुक्यात 10 हजार हेक्टरवर मका आहे प्रती हेक्टरी सरासरी 65 क्विंटल उत्पन्न होते. शासनाने खरेदी न केल्यास 1700 रुपये भावाने मका विकण्याची भयानक वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. 700 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 45500 रुपये प्रति हेक्टर नुकसान होणार आहे. 45 कोटी रुपये मका पिकात शेतकरी लुटल्या जाणार आहे. म्हणजे जवळपास 147 कोटी रुपये एकाच वर्षात होणारे नुकसान आहे तर किनवट तालुक्यावर एकूण पिक कर्ज 150 कोटी रुपये आहे. अटी शर्ती लावून फारतर 80 कोटी माफ होईल. हे आहे कर्जमाफी चे भयानक वास्तव. तालुक्यात जिनींग नाहीत, शेजारच्या राज्यात कापूस नेऊ देत नाही, प्रश्न मांडायला सभागृहात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नाही, जातीत विभागलेला शेतकरी संघटनेत व मोर्चात येत नाही. शेतमाल खरेदी आडून जालीयनवाला बाग हत्याकांड चालवले जात आहे.
कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया एवढी किचकट आहे की, ती पूर्ण करणे 90% शेतकऱ्यांना शक्यच नाही. मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करावे लागते, त्या अँप वर सर्व माहिती भरावी लागते. मग अप्रुवल येते, दुसरी स्टेप म्हणजे बार कोडींग होते, त्यानंतर स्लॉट बुकिंग होतात. शुक्रवारी रात्रीपर्यंत सीसीआय मार्फत शेडूलिंग केलं जातं, दर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता स्लॉट ओपन होतात. कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारो आणि स्लॉट मात्र लिमिटेड सोडल्याने काही सेकंदात हे स्लॉट संपतात. ज्यांच्याकडे नीट नेटवर्क नाही, मोबाईल जुना आहे, सिस्टीम थोडसं स्लो आहे, स्लॉट बुकिंग नॉलेज नाही, ॲप युजर फ्रेंडली नाही. अशा अनंत अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांना स्लॉट बुकिंग होणे शक्य नाही. दलाल मात्र बाजी मारुन जातोय. कापूस शेतकऱ्यांकडे स्लाट दलालांकडे. अडलेला शेतकरी बिन पाण्याचा जागीच हलाल.शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पंचनामे करावेत व शेवटच्या बोंडा पर्यंत खरेदी करावी या व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा दोनतुला यांना भेटून सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर आनकाडे, गंगाधर नारायण भिसे, नागनाथ उमाजी बोथिंगे, दत्ता लक्ष्मण चिरमाडे, विनोद डवरे, दत्ता बळीराम भिसे, विक्रांत नागनाथ इजारे, बालाजी बाबाराव चिरमाडे, बाबाराव चिरमाडे, सुरेश डवरे, अंकुश भिसे, गोपाळ सुदाम तोरकड, धर्माजी शेषराव भिसे इत्यादी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

COMMENTS