चित्ते वाची क्रियायां च साधूनामेक रूपता || "
जे मनात तेच बोलण्यात आणि जे बोलण्यात तसेच कृतीत. मनात, बोलण्यात आणि कृतीत सज्जनांच्यामध्ये एकवाक्यता असते.
डॉ. सुरेश सावंत हे असेच एक साहित्य क्षेत्रातील नि:स्पृह असे व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या मनातले ते बोलतात आणि तेच कृतीत आणून दाखवतात. याचा आदर्श नमुना म्हणजे 'अनुभवाचे बोल' हा बालकुमारांच्या जडणघडणीसाठी कानगोष्टी सांगणारा, सर्वसामान्य ज्ञान देणारा, त्यांना छंदोपासना करायला शिकवणारा व व्यवहाराचे शास्त्रशुद्ध ज्ञान देणारा ग्रंथ आहे.
आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना बालकुमारांसाठी डॉ. सावंत सरांनी विपुल असे संस्कारक्षम साहित्य लिहिले आहे. मुलांच्या मनाला, मेंदूला आणि मनगटाला विकसित करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी संस्कारक्षम साहित्य लिहून उत्तम असा खुराक मुलांना दिला आहे. बालकथा, बालकविता, बालकादंबरी लिहून बालकुमारांसाठी अनुभवांची शिदोरी उदारहस्ते वाटून दिली आहे.
सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्यातला उपक्रमशील शिक्षक त्यांनी किंचितही कमी होऊ दिलेला नाही. वर्षभर अग्रगण्य दैनिकांत 'बोल हे अनमोल' ह्या सदरामधून मुलांना हिताच्या कानगोष्टी सांगितल्या. त्याचेच मूर्त रूप म्हणजे 'अनुभवाचे बोल' हे पुस्तक होय.
अनुभव हा माणसाचा सगळ्यात मोठा गुरु आहे. तो माणसाला शिकवतो. तो त्याला चुका दुरुस्त करण्याची संधी देतो आणि अधिक अचूकतेकडे वाटचाल करण्यासाठी दिशा दाखवतो. ज्येष्ठ मंडळींच्याकडे अनुभवांचे फार मोठे संचित असते. याचे कारण त्यांनी अनेक उन्हाळे आणि पावसाळे अनुभवलेले असतात. कळत- नकळतपणे हातून झालेल्या चुकांतून त्यांना प्रगल्भपण प्राप्त झालेले असते. अनाहूतपणे घडलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी ही मंडळी आपल्या 'अनुभवाचे बोल' पुढल्या पिढीकडे संक्रमित करीत असते.
कुमारांच्या कोवळ्या मनावर बालपणातच सुसंस्कारांची पेरणी झाली पाहिजे. तरच एक सजग आणि समृद्ध विचारांची पिढी निर्माण होईल, अशी लेखकाची दृढ धारणा आहे. म्हणूनच त्यांनी वृत्तपत्रातील लेखांचे सुंदर पुस्तकात रूपांतर करून मुलांच्या समोर अनुभवसंपन्न ज्ञानाचे भांडार खुले केले आहे.
चांगल्या सवयी, निश्चित ध्येय, संयम, शांतता, रागावर नियंत्रण, थोरामोठ्यांचा आदर, सुसंवाद, ध्यास, निर्धार, सहनशीलता, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, ग्रंथमैत्री असे छोटे छोटे विषय घेऊन मुलांना चिंतन आणि मननातून आकाराला आलेले अनुभवाचे शहाणपण या पुस्तकात लेखकाने आपलेपणाने व जिव्हाळ्याने सादर केले आहे.
प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने करावी, नेहमी सकारात्मक राहावे, आरोग्यासाठी वेळ दिला, तरच आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, असे 'अनुभवाचे बोल' ते सांगतात. चांगल्या सवयींमुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व उन्नत होत असते. त्यामुळे या सवयींचा अंगीकार करण्याचे आवाहनही ते मुलांना करतात. मोठे व्हायचे असेल तर अगोदर आपले ध्येय निश्चित करून क्षमतेनुसार वाटचाल करण्याचा सल्लासुद्धा त्यांनी मुलांना दिला आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सकारात्मकता हवीच. आव्हाने स्वीकारलीच पाहिजेत. अडचणींवर मात करून आत्मविश्वासाने आणि जिद्दीने, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जो प्रयत्न करतो, तोच यशस्वी होतो. असा यशाचा मूलमंत्रसुद्धा ते मुलांना देतात. कुमारावस्थेचा कालखंड हा गोंधळाचा आणि वादळी कालखंड असतो. या काळामध्ये नेहमी डोके शांत ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ते करतात.
"टाईम अँड टाईड वेट फॉर नन". वेळ ही कोणासाठी थांबत नाही. वेळ अनमोल आहे. वेळेचे महत्त्व जाणा. भूतकाळ विसरा आणि उद्यावर लक्ष केंद्रित करा. व्यर्थ चिंता करणे सोडून द्या, कारण सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मनाचे वास्तव्य असते. निरोगी राहण्यासाठी ही पथ्ये पाळण्याची आवश्यकता असल्याचे ते छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून मुलांच्या मनावर बिंबवितात.
'आळसे कार्यभाग नासतो' असे एक प्रसिद्ध वचन आहे. आळसाला नेहमी चार दूर ठेवा. आपले जीवन रडतकुढत नव्हे, तर हसत खेळत जगा. जीवनाच्या वाटचालीत अडथळे तर येणारच. त्यावरती मात करा. असा सल्ला ते मुलांना देतात. भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला धार्मिक संदर्भ आहे. परंतु वाईट गोष्टींचा उपवास धरावा असे मार्गदर्शन ते करतात.
नियमितपणाची सवय मुलांना संपन्नतेकडे घेऊन जाते. त्यामुळे अविरत अखंडित कार्यरत राहा, थांबला तो संपला असे विचार देऊन मुलांना नियमितपणाचे महत्त्व प्रेमळपणाने पटवून देतात.
राग हा माणसाचा शत्रू आहे. 'अति राग आणि भीक माग' असे म्हटलेच आहे, म्हणून रागावर नियंत्रण ठेवण्याचा सूचक सल्ला ते आपल्याला देतात. आई, वडील, गुरुजन यांच्याविषयीचा कृतज्ञता भाव हा असलाच पाहिजे. याविषयीचा संस्कार मुलांच्यामध्ये बिंबवितात.
शब्द हे दुधारी शस्त्र आहेत आणि म्हणून त्याचा जपून वापर करण्यास सांगतात. बोलणाऱ्याच्या एरंड्या खपतात, पण न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा खपत नाहीत. म्हणून संवादकौशल्य आणि वक्तृत्वाची कला शिकून घेण्यासाठी ते मुलांना प्रेरित करतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी आपले सामाजिक पर्यावरण, अर्थात भोवताल जाणून घ्या, खूप हसा, खूप खेळा, पण शिस्त पाळा आणि मोठे व्हा, असा आशीर्वादही ते देतात.
'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणेच विषाची आणि विस्तवाची परीक्षा घेऊ नका. आपण दुसऱ्याच्या चुका पाहून शिकले पाहिजे, वेळेची बचत केली पाहिजे. सावध, विचारशील आणि शहाणं बनलं पाहिजे असे मुलांना ते सांगतात. आपण जे पेरतो तेच उगवते. त्यामुळे चांगल्या फलनिष्पत्तीसाठी चांगल्या विचारांची पेरणी व चांगल्या कृतींची गरज प्रतिपादित करतात. अपयशाची भीती बाळगू नका. चांगले दिसण्यापेक्षा चांगले असण्याकडे लक्ष द्या, असा अनुभवाचा सल्ला ते मुलांना देतात.
यशासाठी पक्का निर्धार करण्याची गरज असते. म्हणून निर्धार पक्का असेल तर यश हमखास मिळते, असे मार्गदर्शन मुलांना करतात. मिळालेल्या संधीचे सोने करा. चुकीचे वागू नका. पश्चात्ताप होईल अशा गोष्टी करू नका. दररोज किमान एक तरी पाऊल पुढे टाका, असे अनुभवाचा सल्ला ते मुलांना देतात.
सहनशीलता हा माणसाचा सद्गुण आहे. संयमाने माणूस यशस्वी होतो. क्षमा हे वीरांचे भूषण आहे. क्षमाशील माणूस नेहमी प्रगती करतो. कधीकधी चांगले कार्य केले, तरीही काही लोक बोलतात. संतांनीसुद्धा सांगितले आहे की "निंदकाचे घर असावे शेजारी". लोक बोलणारच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मार्गक्रमण करीत राहा. जो चुकतो तोच शिकतो. म्हणून चुकत चुकत शिकावे आणि शिकत शिकत एक दिवस यशाचे उच्च शिखर गाठावे, असा विश्वास ते देतात.
जीवन ही एक सुंदर रंगभूमी आहे, म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदाचा शोध घ्या. निराशेला पळवून लावा. मित्रत्वाचे अतूट धागे गुंफून त्यांची घट्ट वीण तयार करा. कारण कष्टाची फळे नेहमी गोड असतात. असा सारभूत सिद्धान्त ते मुलांना सांगतात.
आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे, म्हणून कुठल्याही कार्याच्या यशस्वितेसाठी आत्मविश्वासाची गरज आहे. त्यामुळेच आत्मविश्वासाने, धैर्याने, धाडसाने कार्यारंभ करा. पुस्तकांची मैत्री करा. आपण चालतो आहोत, ती वाट योग्य आहे का हे पाहण्यासाठी रोजनिशी लिहा आणि तुम्हीच तुमचे मार्गदर्शक व्हा. 'मी एक सुसंस्कृत माणूस आहे' अशा स्वयंसूचना मनाला द्या. शाळा हे एक पवित्र मंदिर आहे. या मंदिराचे पावित्र्य जपण्याचे महत्कार्य आपल्या हातून होऊ द्या, असे विचारांचे संचित अर्थात 'अनुभवाचे बोल' डॉ. सुरेश सावंत सरांनी बालकुमारांसाठी खुले केले आहेत.
या पुस्तकातील प्रत्येक लेख हा विद्यार्थ्यांचे उद्बोधन करणारा आहे. मुलांच्या मनावर सुसंस्कार पेरणारा आहे. मुलांच्या जडणघडणीला मार्गदर्शक ठरणारा आहे. म्हणी, वाक्प्रचार, छोट्या छोट्या गोष्टी व आपल्या समाजातील, सामाजिक पर्यावरणातील घटना- घडामोडींचा धांडोळा घेऊन मुलांना समजेल अशा भाषेत 'अनुभवांचे बोल' मुलांना दिले आहेत. मुलांचा वयोगट लक्षात घेऊन त्यांना समजेल अशी भाषा, ओघवती शैली, आपल्या सामाजिक पर्यावरणातील दाखले, मराठी - हिंदी पद्यपंक्तींची पेरणी यामुळे हे 'अनुभवाचे बोल' अतिशय वाचनीय झालेले आहेत. निश्चितपणे मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी आणि त्यांना यशस्वी मार्गक्रमणासाठी ते उपयुक्त ठरतील, असा मला विश्वास वाटतो. बालकुमारांसाठी हे ज्ञानभांडार खुले केल्याबद्दल डॉ. सुरेश सावंत सर यांचे मनापासून आभार.
- अनुभवाचे बोल ( कुमारांसाठी कानगोष्टी)
- लेखक : डॉ. सुरेश सावंत
- प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे.
- मुखपृष्ठ व सजावट : विजयकुमार चित्तरवाड
- पृष्ठे १०४ किंमत रु. १८०
- पुस्तक परिचय :
- डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील, कोल्हापूर.
- भ्र. ९८३४३४२१२४

COMMENTS