नांदेड , दि. 16 मार्च: तेलंगाणातील हैद्राबाद येथील गुरुद्वारा सिख छावनी अत्तापुर येथील 1.5 एकर जमिनीचा वाद सोडविण्यासाठी तख्त सचखंड श्री हजू...
नांदेड , दि. 16 मार्च: तेलंगाणातील हैद्राबाद येथील गुरुद्वारा सिख छावनी अत्तापुर येथील 1.5 एकर जमिनीचा वाद सोडविण्यासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथील आदरणीय पंज प्यारे साहिबान यांनी आज गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने तेलंगाणाचे मुख्यमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना भेटून हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळ पाठविण्याचा एकमताने निर्णय घेतला.याबाबत प्राप्त माहितीनुसार, दि. 15 मार्च 2026 रोजी गुरुद्वारा सिख छावनी अत्तापुर येथील 1.5 एकर जमीन प्रशासनाने जप्त केली. ही जमीन गुरुद्वारा साहिबाची असून तिचा वाद न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने हा वाद गुरुद्वारा साहिबाच्या बाजूने निकाली काढला होता. मात्र, निकालानंतर काही स्थानिक लोकांनी ही जमीन मंदिराची असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या कारवाईत 1.5 एकरपैकी केवळ 1000 गज जमीन गुरुद्वारा साहिबाला देण्यात आली, तर उर्वरित जमीन जप्त करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस प्रशासनाने काही शीख व्यक्तींवर गुन्हेही नोंदवले आहेत.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे पंज प्यारे साहिबान यांची विशेष बैठक झाली. या बैठकीदरम्यान गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ यांनी दूरध्वनीद्वारे सर्व माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.बैठकीस जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी, हैड ग्रंथी सिंघ साहिब भाई कश्मीर सिंघ जी, धुपिया सिंघ साहिब भाई राम सिंघ जी, भाई गुरदीप सिंघ जी, भाई रणजीत सिंघ जी, डिप्टी अधिक्षक स. रविंदर सिंघ कपुर, सहायक अधिक्षक स. बलविंदर सिंघ फौजी, स. दर्शन सिंघ (इंचार्ज कमेटी विभाग) तथा गुरुद्वारा बोर्डाचे लीगल अॅडव्हायझर स. जसपाल सिंघ सुखमनी हे उपस्थित होते.

COMMENTS