अंतःमनाने ते बालकांच्या वयाचे होऊन त्यांच्याशी हसत - खेळत त्यांना समजेल अशा भाषेत प्रगल्भ संवाद साधतात. ते विज्ञानवादी आणि विज्ञाननिष्ठ होताना दिसतात. निसर्गात रमणे, त्याची निरक्षणे.. मग झाडांची असतील, फळांची असतील किंवा फुलाची... फूल उमलणे ते गोड मधूर फळाची निर्मिती यामागील विज्ञान ते रंजकपणे उलगडून सांगतात.
मुलांच्या कल्पनाशक्तीला कमालीचं बळ देताना विठ्ठल जाधव यांची लेखणी मुलांचं भावविश्व समृद्ध करते. आपण जीव लावला तर पशू - पक्षी, झाडे - पाने आपल्याशी संवाद करू शकतात, ही सुंदर कल्पना त्यांच्या कवितेतून डोकावते. निसर्गापासून माणूस दूर जाताना निसर्गाशी नाळ जोडायला लावणारा हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा वाटतो.
नदीवर जाणे, तेथील सर्व गोष्टींचे डोळसपणे निरीक्षण करणे. जळातील माशांशी संवाद साधणे ही कल्पनाच मोहरून टाकणारी आणि आचाट आहे. मोबाईल मधूनही खूप काही चांगल्या गोष्टी शिकता येतात. मात्र त्याचा योग्य वापर हवा, ही गोष्टही नकळत डॉ. जाधव बालकांना शिकवतात. येथे त्यांच्यातील शिक्षक महत्त्वाचा ठरतो.
आपल्या 'डोंगर' या कवितेत कवी हिरवा डोंगर दाखवतो. नदी दाखवतो. नदीत पाण्यात पाय बुडवून चालणारा आल्हाददायक रस्ता दाखवतो. या रस्त्यावरून तो 'डांबरीवर' येतो. तेथील खड्डे... खड्ड्यातील दगड ते घराचे दगड याचं यथार्थ दर्शन कवी घडवितो. या कवितेतील खरी गंमत म्हणजे -
‘दाराला झुंबर
झुंबराला गोंडा
गोंडा लावला टोपीत
बाळ चाले ऐटीत’ (पान-५)
यातील शेवटच्या दोन ओळी निरागस आनंदाला प्रगल्भ करतात. 'गोंड्याची टोपी’ ही कल्पनासुद्धा सुखावणारी वाटते.
अटर का पटर या बालकविता संग्रहातील दुसरी कविता 'स्वातंत्र्यगान' या कवितेतून कवी विज्ञाननिष्ठ होऊन कवी राष्ट्रप्रेम, समता, बंधुता आणि संविधान निष्ठा पेरू पाहतोय, ही बाब उल्लेखनीय आहे.
तंत्रज्ञान पेरू ज्ञान उगवूया
हरित क्रांतीचे पाईक बनुया
संविधानाचे गीत गाऊ या ll४ll (पान नं.६)
शेत, बैल आणि शेत अवजारे यातून अंकांची ओळख करून देताना कवीची कल्पना विलक्षण वाटते. ती संपूर्ण वाचून सौंदर्य अनुभवणेच योग्य होईल. असे प्रयोग आणखी कवितेतही आढळतात. (अंकगीत, पान नं.१०)
पर्यावरणावर भाष्य करताना ‘नदी बाई नदी' या कवितेतून मानवाच्या बेजबाबदारपणामुळे नदी कशी दूषित होते आहे याकडे लक्ष वेधले आहे.
ऑनलाइनच्या जमान्यामध्ये मोबाईल आवश्यक होऊन बसला आहे. मात्र याच्या सवयीमुळं रेंज नसल्यावर गुरुजींच्या कामाचाही कसा खोळंबा होतो, हे सांगताना ऑनलाइन कामांमुळे गुरुजी कसे जेर झालेत याकडेही अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले आहे. सोबत मुलांना पुस्तक हातात घेऊन अभ्यास करण्याचा सल्लाही दिला आहे. 'वाचन संस्कृती' जपली पाहिजे असा संदेशही कवी नकळतपणे देऊन जातो.
कविता - 'नवी शाळा'
(पान नं.१३)
पिझ्झा बर्गरच्या जमान्यात गिरणीत दळलेल्या पिठाची भाकरी खाण्याचा सल्ला देताना कवी म्हणतो -
'तापलेला तवा
चर्र वाजायला हवा
भाकरीला पाणी
लवकर फिरवा '
पूर्वीच्या काळातील ग्रामीण भागाच्या घराघरातील चित्र कवीनं जिवंत केलं आहे. या ओळी वाचताना खमंग भाकरीचा वास मनात दरवळत
राहतो.
कविता - ‘भाकरी’ (पान नं.१८)
‘अटर का पटर’ ही संग्रहाच्या शीर्षकाची कविता ही दातृत्वाची शिकवण देणारी वाटते. शिवाय काय घ्यायचे? याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे हे सुचविणारी आहे.
'वही घ्या, पेन घ्या, फूल घ्या, पान घ्या, म्हणता - म्हणता,
'कुणी डोसा घ्या, कुणी इडली घ्या, असं लयीत - ताला सुरात सांगतानाच
'कुणी घ्या बिया, कुणी घ्या कणीस
कुणी घ्या देव, कुणी घ्या माणूस' ॥७॥
असे लिहून बालविश्वाला मानवतेकडं घेऊन जाताना दिसतो. हे ‘अटर का पटर’ चं यश वाटतं. (पान नं.२७)
या संग्रहातून कवीने शेती - माती, निसर्ग - डोंगर, नदी, गाव, शिवार, पशू - पक्षी, चिऊ - काऊ, आरोग्यवर्धक फळ भाज्यांचं ज्ञान, हेल्मेटचं महत्व, मोबाईलच्या गंमती - जमती, फायदे तोटे हे सांगता - सांगता मानवता आणि महापुरुषांच्या कार्याची महतीही सांगितली आहे, याचा आर्वजून उल्लेख करावा वाटतो.
कवी 'शोधू पुस्तकात भीमाला'
या कवितेत म्हणतो -
'शोधू पुस्तकात भीमाला
घेऊ मस्तकान भीमाला
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या महान कार्याविषयी लिहिताना कवी पुढे म्हणतो-
'देह लेखणीत झिजला
अश्रू पापणीत टिपला
संविधानी कायदा केला
पाईक समतेचा झाला
रयतेचा राजा नीतीला
शाहूराजे जे मदतीला
बुद्ध वंदनीय जाहला
सयाजीराव ते साथीला ll५ll (पान नं.३३)
इथे समता - बंधुता पेरण्याचा कवीचा उद्देश लक्षात येतो. महापुरुषांना पुस्तकात शोधलं पाहिजे आणि त्यांचे विचार मस्तकात ठेऊन ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसत्याच जयंत्या साजऱ्या करणं, मिरवणूका काढणं, नाचणं, घोषणाबाजी करणं यातून महापुरुष कळत नसतात, तर ते समजून घ्यावे लागतात, डोक्यावर नव्हे तर डोक्यात घ्यावे लागतात. यातच मानवाची प्रगती आहे, हा सल्ला कवीने दिल्याच जाणवत.
‘अटर का पटर’ या संग्रहातील सर्वच कविता सुंदर आहेत. कवीने बालकांच्या अंर्तमनाचा वेध घेऊन लिहिल्या आहेत. हे लेखन वरचेवर प्रगल्भ होत राहिल आणि मराठी साहित्यात कवी विठ्ठल जाधव यांच्या लेखणीची छाप अधिक गडद होईल असे वाटते.
या संग्रहासाठी शीतल शहाणे यांच देखणं मुखपृष्ठ तितकेच देखणे आतील रेखाटणे, इसाप प्रकाशनचे प्रकाशक दत्ता डांगे सुबक मांडणी, सजावट, दर्जा जोपासून मनाला मोहित करणारा काव्यसंग्रह आपल्याला दिला आहे. यात एकनाथ आवाड यांची पाठराखण ‘चार चाँद’ वाटते.
- अटर का पटर
- बालकुमार कवितासंग्रह.
- कवी- विठ्ठल जाधव
- इसाप प्रकाशन, नांदेड
- भ्र-९४२१४४२९९५
- अनिलकुमार बा. होळकर बीड भ्र- ९४२१२७४७८७

COMMENTS