किनवट (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कि...
किनवट (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किनवट येथील साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेले मोफत मणका निदान शिबिर उत्साहात पार पडले. भारत जोडो युवा अकादमी संचलित साने गुरुजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि द स्पाइन फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.२० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या या शिबिरात किनवट व माहूर तालुक्यातील एकूण ७५ रुग्णांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. यामध्ये २९ पुरुष व ४६ महिला रुग्णांचा समावेश होता. मणक्याच्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशातील आघाडीचे मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज (मुंबई) यांनी शिबिरात उपस्थित राहून रुग्णांना मार्गदर्शन केले. भारत जोडो युवा अकादमीचे डॉ. अशोक बेलखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. डॉ. भोजराज यांच्यासोबत डॉ. प्रेमिक नागड, डॉ. मयुरेश रामपूरकर व डॉ. गोविंद शिंदे यांच्या तज्ज्ञ चमूने प्रत्येक रुग्णाची तपासणी करून आवश्यक औषधोपचार व व्यायामाबाबत सल्ला दिला.
शिबिरात मान व पाठदुखी, मणक्याची झीज (स्पॉन्डिलोसिस) तसेच हातापायांना मुंग्या येणे किंवा हालचालींमध्ये अडथळा निर्माण होणे अशा तक्रारी असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
मुंबईसारख्या महानगरात उपलब्ध असणारे तज्ज्ञ उपचार स्थानिक स्तरावर मोफत मिळाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी साने गुरुजी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

COMMENTS