नवनिर्वाचित नगरसेविकेसह ६० विद्यार्थ्यांनी स्वीकारली पदवी
नांदेड, (प्रतिनिधी)-पत्रकारितक्षेत्राला वर्षानुवर्षांची अनमोल परंपरा आहे. आपल्या देशात जुन्या काळात अनेक मान्यवरांनी समाजाभिमुख निर्भीड आणि परखड पत्रकारिता केली. त्या काळात पत्रकारितेची पारंपरिक शिक्षण व्यवस्था अस्तित्वात नव्हती. मात्र आज तुमच्यासारखे विद्यार्थी अद्यावत शिक्षण घेऊन पत्रकारितेच्या अथांग विश्वात झेपावण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील प्रगतीचे एकेक क्षेत्र काबीज करत असताना समाजाच्या जडणघडणीसाठी अत्युच्च योगदान देण्याची जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य पंखात बाळगा, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी केले. श्री गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचा महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना हुशारसिंग साबळे बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम समारंभाचे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव विकास तु. कदम, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. शेखर घुंगरवार, श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. देवदत्त देशपांडे पदवी वितरण समारंभाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी समारंभाचे उद्घाटन झाल्यानंतर विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. विकास कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख उपस्थितांच्या मार्गदर्शनानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पदवी वितरित करण्यात आल्या. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका राजश्री गोडबोले राक्षसमारे यांनी स्वतः या समारंभात पदवी स्वीकारली. सुमारे ६० विद्यार्थ्यांना बी. ए. (एम. सी. जे.), बी. जे. एम. एस. आणि एम.जे. एम. एस. पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या पदवीचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल धुळे यांनी केले. आभार प्रदर्शन नितीन नरवाडे यांनी केले. पदवी वितरण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. सुरेश पाटील, डॉ. शुद्धोधन एडके, प्रा. अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, प्रा. रवींद्र सिंग मोदी, प्रा. विपिन कदम, प्रा. रूपाली वागरे, प्रा. सोनम खोडके, प्रा. प्रतीक्षा चवणे, प्रा. रंजना बहादुरे, प्रा. बुद्धमाला हिंगोले, अनिल
विनायते, विलास वाळकीकर, भरत सोनटक्के, फोटोग्राफर रोहन कहाळेकर, कुणाल भुरे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

COMMENTS