दर्शवेळा अमावस्या: ग्रामसंस्कृती आणि शेतीचे प्रतीक

माती म्हणजे 'काळ्या आईची' ममता,रब्बीच्या हिरव्या वस्त्रात शिवारात रमते;शेतशिवारात पंगत, आनंदाचा सडा पडे,दर्शवेळा अमावस्या, संस्कृतीचा अतूट बंध जडे.

"शिवार सजले हिरव्यागार पिकांनी, मन हरखले निसर्गाच्या सौदर्याने! जेव्हा मार्गशीर्ष अमावस्येच्या थंडीत, शेतकरी कुटुंब 'काळ्या आई'च्या चरणी नतमस्तक होते, तेव्हा साजरा होतो'वेळाअमावस्या'. हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता, सामाजिक समरसतेचे दर्शन घडवणारे वनभोजन आणि पूर्वजांनी जपलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. मराठवाडा आणि कर्नाटक सीमाभागाचे वैभव असलेला हा उत्सव, मातीशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करतो. हा सण लातूर जिल्हयात मोठया उत्साहात साजरा होतो"

भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील ग्रामीण जीवन, सण-उत्सव आणि अर्थकारण शतकानुशतके शेतीशी जोडलेले आहे. शेती हा केवळ व्यवसाय नसून, जीवनपद्धतीचा केंद्रबिंदू आहे. याच कृषी संस्कृतीतून निर्माण झालेला एक मनोहारी लोकसण म्हणजे 'दर्शवेळा अमावस्या'. 'येळवस' किंवा 'वेळाअमावस्या' या नावांनी ओळखला जाणारा हा उत्सव शेतकरी आणि निसर्ग यांच्यातील कृतज्ञतापूर्ण नात्याचे जिवंत प्रतीक आहे.

उत्सवाचे स्वरूप आणि भौगोलिक व्याप्ती पाहता दर्शवेळा अमावस्या प्रामुख्याने मराठवाडा (धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर) आणि कर्नाटक सीमाभागात (गुलबर्गा, बीदर) मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला हा सण येतो. या दिवशी शेतकरी आपल्या 'काळ्या आईची'—म्हणजेच धरणीमातेचीपूजा करतात. खरीप हंगाम संपून रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, करडई आणि सूर्यफूल ही पिके हिरवीगार डोलू लागलेली असतात. या पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी आणि निसर्गाची कृपादृष्टी कायम राहावी, यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. शेतशिवारात सामूहिक वनभोजन आयोजित करण्याची या सणाची मोठी परंपरा आहे.

या सणाच्या नावाचा उगम कर्नाटकात असल्याचे मानले जाते. कन्नड भाषेत याला 'येळ्ळ अमावस्या' म्हणतात, ज्याचा अर्थ 'पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या' असा होतो. या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्रात 'येळवस' किंवा 'वेळा अमावस्या' हे शब्द रूढ झाले.

निसर्गाशी ऋणानुबंध आणि आरोग्यशास्त्रा प्रमाणे वेळा अमावस्या हा केवळ धार्मिक विधी नसून, शेतकरी आणि निसर्गाचे अतूट नाते दर्शवतो. भूमातेने दिलेल्या धनधान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हा या पूजेचा मुख्य उद्देश असतो. ऊन, वारा, पाऊस या निसर्गशक्तींसमोर नतमस्तक होण्याची ही एक विनम्र पद्धत आहे.

 मार्गशीर्ष महिना म्हणजे थंडीचा कडाका

आयुर्वेदशास्त्रानुसार या काळात शरीराला उष्णता देणारे आणि स्निग्ध पदार्थ सेवन करणे आवश्यक असते. हिवाळ्यात पचनशक्ती उत्तम असल्याने, या सणात बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ आरोग्याला ऊर्जा आणि पोषण देतात.

सामाजिक समरसतेचा संदेश

या सणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक समानता. या दिवशी शेतकरी आपले शेजारी, मित्र, नातेवाईक आणि अगदी अपरिचित वाटसरूंनाही जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण देतात. जात, धर्म किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही भेद न बाळगता सर्वजण एकाच पंगतीत बसून वनभोजनाचा आनंद घेतात. यामुळे हा सण माणुसकी आणि एकोपा यांचा संदेश देतो.

सणाची तयारी आणि पूजाविधी

दर्शवेळा अमावस्येच्या दिवशी शहरे ओस पडतात आणि शेते गजबजून जातात. शेतकरी कुटुंबे पहाटेच बैलगाड्या किंवा ट्रॅक्टरमधून शेताकडे रवाना होतात. आदल्या दिवशी कडब्याच्या पेंढ्यांपासून शेतात एक तात्पुरती 'खोप' (झोपडी) तयार केली जाते. या खोपीत मातीपासून बनवलेल्या पांडवांची (पाच पांडव आणि सहावी द्रौपदी) स्थापना केली जाते. या मूर्तींना काव आणि चुना लावून रंगवले जाते. ऊस, ज्वारीचे ताट, फुले आणि आंब्याच्या पानांनी ही खोप सजवली जाते.

पांडवांना नैवेद्य दाखवल्यानंतर 'चर शिंपडणे' हा महत्त्वाचा विधी पार पडतो. यात भज्जी, उंडे आणि आंबिल हे पदार्थ पिकांवर आणि बांधावर प्रतीकात्मक स्वरूपात शिंपडले जातात. ‘हरभला जो भगतरा हर हर महादेव किंवा ‘ओलघे, ओलघे सालम पोलगे(तुम्ही सुखी राहा, समृद्ध व्हा) असा जयघोष करत प्रदक्षिणा घातल्या जातात.

वनभोजन आणि अस्सल ग्रामीण मेजवानी

पूजा संपन्न झाल्यावर हिरव्यागार शिवारात वनभोजनाची पंगत बसते. निसर्गाच्या सान्निध्यात जेवण्याचा हा अनुभव शहरातील पार्ट्यांपेक्षा अधिक सुखद असतो. या मेजवानीचे पदार्थ केवळ चविष्ट नसून पौष्टिक असतात:

१. भज्जी आणि उंडे: सुमारे सोळा प्रकारच्या पालेभाज्या आणि शेंगा (वाटाणा, तूर, मेथी, वाल, गाजर, चिंच) एकत्र करून ही 'भज्जी' बनवली जाते. बाजरीच्या पिठाचे उकडलेले गोळे म्हणजे ' हे फायबरने समृद्ध असतात.

२. आंबिल: हे या सणाचे खास आकर्षण आहे. ज्वारीचे पीठ ताकात भिजवून, रात्रभर आंबवून त्यात आले, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली जाते. हे पेय पचनास उत्तम आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असते.

३. इतर पदार्थ: बाजरीची भाकरी, गुळ-तूप घातलेली गव्हाची खीर (हुग्गी), धपाटे आणि खिचडा हे पदार्थ मातीच्या भांड्यांतून (बिंदगी) वाढले जातात, जे ग्रामीण साधेपणाचे दर्शन घडवतात.

मनोरंजन आणि परंपरा

जेवणानंतर स्त्रियांच्या गप्पा आणि पुरुषांचे मैदानी खेळ किंवा पत्ते खेळणे रंगते. काही ठिकाणी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख हे कितीही व्यस्त असले, तरी दरवर्षी लातूरच्या बाभळगावला येऊन सहकुटुंब हा सण साजरा करत असत. यामुळे या उत्सवाला सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठी ओळख मिळाली.

दर्शवेळा अमावस्या हा कृषी संस्कृतीचा आत्मा आहे. यात अर्थशास्त्र (पीक संरक्षण), आरोग्यशास्त्र (ऋतू नुसार आहार) आणि सामाजिक समरसता यांचा सुरेख संगम आढळतो. हा सण निसर्गाला हानी न पोहोचवता कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण देतो. नव्या पिढीने या परंपरेचा अनुभव घ्यायला हवा, कारण यात केवळ खाद्यसंस्कृती नाही, तर एकता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दडलेला आहे.

मार्गशीर्ष मासी येळवस आली,

रानोमाळी सारी हिरवी न्हाली!

काळ्या आईचे ऋण फेडण्याला,

दर्शवेळा अमावस्या शेतात सजली.

वेळ अमावस्या, तू ये पुन्हा पुन्हा,

बळीराजावर असो निसर्गाची कृपा!

-    राहुल हरिभाऊ इंगळे पाटील - मो. ९८९०५७७१२८

टिप्पण्या
Popular posts
रविकिरणचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि रंगकर्मी रघुनाथ कदम स्मृतिगत '३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' १९ बालनाट्यांतून अटीतटीच्या सामन्यातून 'अडलंय ‘का’ अव्वल!
इमेज
राष्ट्रीय लोकन्यायालयात डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार संपन्न
इमेज
चार लेबर कोड विरोधात शेतकऱ्यांप्रमाणे कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची गरज*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज