बोधप्रद आणि शीतल अशी आभाळमाया || डॉ. वृषाली किन्हाळकर, नांदेड.


डॉ. सुरेश सावंत यांना बालमनाचा अचूक ठाव घेता आलेला आहे. गेली ४० वर्षे ते सातत्याने मुलांसाठी लिहितात आणि मुलांनादेखील लिहितं करतात. विद्यार्थ्यांना लिहितं करणं सोपं नाही, मात्र तेही त्यांनी लीलया केलेलं आहे.

सेवेत असताना ते विद्यार्थिमय होऊन कार्यरत होते. आता निवृत्तीनंतर ते निरंतर लेखनमग्न असतात. बालकांच्या जगात रमून त्यांच्यासाठी ५०  पुस्तकं लिहिणं, म्हणजे एक मनोज्ञ अशी साहित्यसेवा आहे. त्यांचा लेखन सातत्याचा हा यज्ञ यथासांग झाला आणि त्यांच्या 'आभाळमाया' या बालकवितासंग्रहावर साहित्य अकादमीची   मोहोर उमटली! बालसाहित्यात डॉ. सावंत यांचे योगदान मौलिक आहे.

'जांभुळबेट', 'पळसपापडी' या संग्रहांतील कविता अतिशय सुरेख आहेत. लहान मुलांच्या मनात शिरून लिहिल्यासारख्या.

'आभाळमाया' हे पुस्तक तर अतिशय प्रसन्न रंगांचा शिडकावा करणारे आहे.

'आभाळमाया'मधील कविता  बोधप्रद असूनही बोजड झालेल्या नाहीत.

रंजक आणि खेळकर भाषेत मूल्यांची पेरणी करणाऱ्या अशा एकूण पस्तीस कविता या पुस्तकात आहेत. नकार पचविण्याची सवय लावत, बालमनात आशावाद रुजवणाऱ्या  या कविता आहेत. ध्येय गाठण्यासाठी स्वतःशीच स्पर्धा करायची, हे सहजपणे सांगणाऱ्या या कविता आहेत. ह्या कविता निकोप वृत्तीची पुढची पिढी तयार होण्यासाठी महत्त्वाचे योगदान देतील, हे नक्की! 

निसर्गाशी मैत्री करत, जगणं शिकवणाऱ्या काही कविता या पुस्तकाची उंची वाढवतात.

कवीने बालमनातील विचार समजून उमजून कवितांचे विषय निवडलेले आहेत.

सणांचं महत्त्व सांगताना दिवाळी, होळी आणि ख्रिसमस या सणांची  निवड केलीये. कविता सहज वाचल्या तर साध्या वाटतात आणि पुन्हा वाचल्या की त्यातील सूक्ष्म धागे जाणवतात.

'खापराच्या पणत्यांनाही

दिवाळीत मिळतो मान ' 

या ओळी सहज आलेल्या नाहीत, हे लक्षात येते. आजच्या मॉल - मल्टिप्लेक्सच्या  युगात मुले चकचकीत आणि आकर्षक अशा हजारो तऱ्हेच्या मेणबत्त्या नि दिवे पाहतात. त्यांना खापराच्या पणत्या ठाऊक असाव्यात आणि शिवाय 'खापर' हा शब्ददेखील समजावा, ही मराठी भाषेबद्दलची तळमळदेखील ह्या कवितेत जाणवते. याशिवाय मुलांची मने सर्वसमावेशक व्हावीत, समाजातील निम्न स्तरातील लोकजीवनाबद्दल मुलांच्या मनात एक सौहार्दाचा ओलावा असावा, हादेखील हेतू यात आहे.

केवढा विचार करून त्यांनी कविता लिहिल्या आहेत, हे खालील ओळी ओळीतून लक्षात येत जातं.

'मला विझवू शकणार नाही 

अवखळ खट्याळ वारा '

असं निर्धाराने म्हणणारी या कवितेतली खापराची पणती म्हणजे मुलांसाठी एक दीपशिखा आहे. दिवाळीची ही कविता अशा अर्थाने महत्त्वाची, की इथे फटाक्यांचा उल्लेख नाही. दिवाळीची सगळी मजा, सुट्टया, नवे कपडे, फराळाचे पदार्थ आणि फटाके या सगळ्या रूढ गोष्टींच्या कितीतरी पलीकडे  जाऊन ही कविता मुलांना समाजाभिमुख करत जाते. पुढच्याच पानावर मग 'प्रकाशगीत' भेटीला येतं.

आयुष्यात पुढे जाण्याचे आव्हान स्वीकारायला लावणारी ही कविता, मुलांना ध्येय गाठण्यासाठी उत्तेजन देणारी आहे आणि त्याचबरोबर कधीतरी येणारं अपयश, कधीतरी होणारी हार सहजपणे स्वीकारायला शिकवणारी आहे. म्हणूनच ही कविता, या संग्रहातली फार महत्त्वाची कविता आहे. 

आज घरोघरी एक किंवा दोन मुले असण्यामुळे त्यांना नकार हा ठाऊकच नसतो. बहुतेक घरात आईवडील ही दोघंही उत्तम अर्थार्जन करत असतात. त्यामुळे  "बघू पुढच्या महिन्यात" किंवा 

"आपल्याला परवडत नाही "

अशी वाक्यं त्यांना माहीतच नसतात.

परीक्षेतलं अपयश, खेळातली हार या गोष्टी त्यांना पचवता येत नाहीत. कारण आईवडील देखील खेळाचा आनंद महत्त्वाचा असतो, हार - जीत हे दोन्हीही सहज स्वीकारायचं असतं, असं सांगायला विसरतात. परिणामी हल्लीची मुले, टोकाच्या प्रतिक्रिया देताना दिसतात. चिमूटभर यशानं हुरळून जातात अन् छोट्याशा अपयशाने खचून जातात.

ही कविता त्यामुळेच महत्त्वाची वाटते . 

'केली पेरणी विवेकाची 

विवेकाचीच फळे येतील' 

असा दुर्दम्य आशेचा सूर या कवितेच्या अंती आहे.

सगळ्या मुलांसाठी भेटवस्तू आणणारा माणूस कुणाला आवडणार नाही बरं?

म्हणून तर 'सांताक्लॉज'ची मुलं वाट पाहत असतात. सांताक्लॉजचे सविस्तर वर्णन करणारी ही कविता, अंतिम चरणात एक बोध देऊन जाते.

'सांताक्लॉजसारखी दानत 

आमच्यामध्येही यावी, 

स्वर्गासारखीच पृथ्वीही 

आनंददायी व्हावी.' 

आपल्याजवळ जे आहे, त्यातले इवलेसे का होईना, इतरांना द्यावे, ही मोलाची शिकवण कवी हळुवारपणे  पेरून टाकतो.

आवर्जून उल्लेख करायला हवा, 'राग आला राग' आणि 'नाकाचे नखरे' या दोन कवितांचा.

'राग आला राग' ही कविता आठ कडव्यांची आहे. पैकी पहिली पाच कडवी 'राग आला' हाच राग आळवतात आणि सहाव्या कडव्यापासून मात्र 'राग मुठीत ठेवा' म्हणत

'राग गेला राग गेला' हे पद रंगत जाते.

तालासुरात गाता येईल असे हे बालगीत ;  रागीट माणसाचे नुकसान कसे होते हे सांगत, राग नियंत्रणात ठेवण्याची युक्तीदेखील सांगणारे आहे

'नाकाचे नखरे' ही कविता, मराठीतील नाकाबद्दल असलेले वाक्प्रचार आणि म्हणी यांची  मुलांना ओळख करून देणारी आहे. कवितेच्या माध्यमातून असे अप्रत्यक्षपणे भाषिक संस्कार करण्यातदेखील डॉ. सावंत यशस्वी झालेले आहेत. 

कविवर्य भा. रा. तांबे यांची 

'मावळत्या दिनकरा ' ही कविता आमच्या पिढीला शालेय अभ्यासक्रमात होती. माणूस प्रगतिपथावर असताना समाज त्याची उचित दखल घेतो, त्याला सन्मानाने वागवतो, परंतु उतरत्या काळात प्रत्येकालाच एकाकीपण सोसावे लागते, हे त्रिकालाबाधित सत्य सांगणारी ही कविता. सूर्याचे थोरपण अधोरेखित करणारी आहे, तरीही वाचल्यावर, ऐकल्यावर नकळत मनावर  उदासी पसरते.

डॉ. सावंत मात्र बालमनावर हे बिंबवतात, की मावळणे हा निसर्गनियमच आहे. त्यात कशाला नाराज व्हायचं बरं? उद्या नव्या उत्साहाने उगवून यायचं, तर आज मावळावं लागेलच. याशिवाय एक  खगोलशास्त्रीय सत्य सांगायला ते विसरत नाहीत की, 

'मावळतीचा सूर्य सांगतो 

कधीच कुठेही जात नाही 

पाठमोरा होऊन बघतो 

फक्त तुम्हाला दिसत नाही.' 


'झाड माझा मित्र' या कवितेत,

जेव्हा मला रडायला येतं

तेव्हा झाड अश्रू ढाळतं 

मी झोपेत असतो तेव्हा 

झाडही आपले डोळे मिटतं ' 

अशा हृद्य ओळी आहेत.

झाडांशी दोस्ती करणं, म्हणजेच पृथ्वीचं संतुलन अबाधित ठेवणं आणि पर्यावरण रक्षण करणं. असे अत्यंत सूचक प्रबोधन करण्यातून कवी डॉ. सावंत कालसापेक्ष गरजाच अधोरेखित करतात. पुढच्या पिढ्यांचे कर्तव्य काय आहे, हेही लक्षात आणून देतात.

'सूर्यफुलांच्या शेतात' ही एक रसप्रसन्न चित्रदर्शी कविता आहे. पिवळ्याधम्मक फुलांनी सजलेले सूर्यफुलाचे शेत म्हणजे जसे काही लग्नाचे वऱ्हाडच. अशा खेळकर, उत्सवी वातावरणात, त्या लगीनघाईतसुद्धा बालमनावर कृषिवलांच्या अथक परिश्रमाचे मोल ठसविण्याची संधी कवी सोडत नाहीत.

'बहरली सूर्यफूले 

तेज सूर्याचे दाविती 

शेतकऱ्यांच्या कष्टाला 

मोल सोन्याचे लाविती ' 

या ओळींतून त्यांच्यामधील हाडाचा शिक्षक संस्कारबीज पेरतो आहे, हे लक्षात येते.

सूर्यफूलांसाठी 'सूर्यबाळे',  'सूर्यपिल्ले' असे वत्सल शब्दप्रयोग करून त्यांनी ही कविता  वाचकांच्या थेट काळजातच नेऊन ठेवली आहे .

'पुस्तक माझा श्वास ' ही कविता आजच्या 

व्हिडिओ गेममध्ये बुडून जाणाऱ्या मुलांना पुस्तकाकडे नेण्याचा प्रयत्न करते.

वाचनसंस्कृती रुजविण्याची मोठी जबाबदारी सध्याच्या ज्येष्ठ मंडळींकडे आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून झपाट्याने तंत्रज्ञान विकसित झाले आहे, होत आहे.

मुठीतल्या भ्रमणध्वनी या खेळण्याने अवघे जगणे व्यापून टाकलेले आहे. अशा काळात मुलांना पुस्तकाकडे नेण्याचा प्रयत्न  करणाऱ्या या हसऱ्या सकारात्मक कविता आहेत. विद्यार्थ्यांना उदंड आत्मबल देणाऱ्या कविता आहेत. कविवर्य सुरेश सावंत यांनी अत्यंत मनःपूर्वक कागदावर साकारलेल्या या अर्थवंत कविता, आता यशवंत होवोत.  

या पुस्तकाची अर्पणपत्रिका अतिशय वेगळी आहे!

आपल्या दोन विहीणबाई आणि दोन व्याही  अशा दोन जोडप्यांना हे पुस्तक अर्पण करून, कविहृदयाचे मूळ शिक्षक असलेले डॉ. सावंत बालमनावरील संस्कारांचे त्यांचे काम अर्पण पत्रिकेपासूनच आरंभ करतात. आज नात्यांच्या गाठी सैल होत असतानाच्या काळात, ही अर्पणपत्रिका या पुस्तकाला एका विलोभनीय मखरात विराजमान करते आहे. विहीण-व्याह्यांना अर्पण केलेलं दुसरं पुस्तक माझ्या अद्याप वाचनात नाही.

या कविता सर्वदूर पोचून, पुढच्या पिढ्यांना आयुष्याचा अर्थ समजावा आणि कवीच्याच शब्दात सांगायचं तर 

'काळासह येणाऱ्या बदलांना 

सहजपणे सामोरे जाऊ' 

असा आत्मविश्वास नव्या मुलांमध्ये यावा, हीच इच्छा.

या उत्तम निर्मितीसाठी कवी डॉ. सुरेश सावंत यांचे अभिनंदन! 

••••••••••

डॉ. वृषाली किन्हाळकर.

'आभाळमाया' (बालकवितासंग्रह)

कवी : डॉ. सुरेश सावंत

मुखपृष्ठ व सजावट : पुंडलिक वझे

आर्ट पेपरवरील रंगीत पृष्ठे ६४

किंमत रु. ३६० (सवलतीत रु. १८०)

प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे.

संपर्क : ८४०७९४०३७३, ९८२२२८०४२४

टिप्पण्या