आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचा इतिहास नवीन पिढीला सांगणे गरजेचे आहे. त्यांनी जर इतिहास जाणून घेतला आणि त्यानुसार कार्य केले तरच त्यांच्या परिवाराचं भवितव्य टिकून राहील. अन्यथा सर्वत्र अंधकार पसरेल. सध्याचे कामगार कायदे मोडीत काढले तर कामगारांना जीवन जगणे कठीण जाणार आहे. सरकार केव्हा काय करेल, ते सांगता येणार नाही. त्यावेळेस आपणास फक्त हात चोळत बसावे लागेल, असे स्पष्ट उद्गार नॅशनल रेल्वे मजूर युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. वेणू नायर यांनी कल्याण येथे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या रेल्वे कामगारांच्या जाहीर सभेत काढले.
कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२५ रोजी युनियनच्या कल्याण मुख्य शाखा कार्यालयापासून सकाळी ११ वाजता कामगारांनी लाल वेशभूषा परिधान करून भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात रेल्वे कामगारांनी सरकारचे कामगार विरोधी धोरण तसेच चार लेबर कोड बिल विरोधात जोरदार घोषणा दिल्या. या मोर्चाचे कल्याण रेल्वे इन्स्टिट्यूट येथे भव्य सभेत रुपांतर झाले. मोर्चामध्ये युनियन मुख्यालयातील पदाधिकारी पी. जी. शिंदे, आर. के. मलबारी, विनय सावंत, अरुण मनोरे, हर्षा शेळके, के. आर. गोयल, बाळा गंगु, आणि हजारो कामगार सहभागी झाले होते.
महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून नीलकंठ वाघमारे आणि हर्षला ढगळे यांनी महाराष्ट्रातील संत परंपरा, कला, सौंदर्य शृंगार यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यास कामगारांनी टाळ्यांच्या गजरात चांगली साथ दिली. कॉम्रेड के. आर. गोयल यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा