नांदेड :(दि.२९ एप्रिल २०२५)
महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केल्यामुळे भारत हे राष्ट्र निर्माण झाले. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा दीपस्तंभ भारतीय संविधान आहे. महिलांना सन्मान, प्रतिष्ठा व माणूस म्हणून जीवन जगण्याकरिता संसदेमध्ये हिंदू कोड बिल आणले. कोणत्याही देशाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली जावी, हे प्रगतीचे आधुनिक मोजमाप दिले. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता व मानवतेच्या प्रस्थापनेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य झिजविले, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
आयकर कार्यालय, नांदेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संजय इंगोले, सी.ए. दागडिया, सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश भराडिया यांची उपस्थिती होती.
यावेळी सी.ए. दागडिया यांनी, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा संपूर्ण जगात अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, राजकीय विचारवंत, कायदेतज्ञ आणि क्रांतिकारक होते. प्रथमत: आणि अंतिमत: मी भारतीय आहे, हे राष्ट्रवादाच्या बळकटीकरणाचे सूत्र त्यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथप्रेमाचा वारसा आपण सदैव जपला पाहिजे, असे विचार व्यक्त केले.
जयप्रकाश भराडिया यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला. भारतामधील गुलामी नष्ट करण्यासाठी आंदोलने केली. शिका, संघटित व्हा व आणि संघर्ष करा; या तत्वत्रयीमुळे युगानयुगे अस्तित्वात असलेला अंधार दूर झाला, असे मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात श्री.संजय इंगोले यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिला व कामगारांना हक्क मिळवून दिले. रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. सध्याच्या काळातील तरुणांनी मोबाईलवर वेळ खर्च करण्यापेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचे वाचन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मदने यांनी केले.
या व्याख्यानास आयकर अधिकारी जी. व्ही. आठवले, सी.ए.विजय मालपाणी, सूर्यकुमार, नरेश कुमार, सी.ए. साले आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.व्ही.आठवले, यशवंत महाविद्यालयातील मराठीचे साहित्यिक डॉ. विश्वाधार देशमुख, कृष्णा खुळखुळे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास आयकर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील चार्टर्ड अकाउंटंट यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा