कामगार व जनसुरक्षा कायद्याविरुद्ध 20 मेला देशव्यापी संपाचा इशारा*



कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने  २८ मार्च २०२५ रोजी परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या  कामगार  संमेलनात १)कामगार विरोधी,मालक धार्जिण्या चार श्रम संहिता मागे घ्या!२) कामगारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या! आणि ३) देशातील १४२ कोटी लोकांचे हक्क सुरक्षित ठेवणा-या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करा! हे तीन ठराव संमत करण्यात आले असून, जर हे कायदे मागे घेतले नाही तर २० मे रोजी  देशव्यापी  संप करण्यात येईल. असा स्पष्ट इशारा  कामगार कर्मचारी कृती समितीच्या सर्व कामगार नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारला दिला.

   राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष ,  भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आणि आमदार सचिन अहिर  आपल्या भाषणात म्हणाले की, आपण मैदानात लढा आम्ही सभागृहात कामगार विरोधी कायदा लागू होऊ नये, यासाठी निर्धाराने लढत राहू!आज विधानसभेत कामगारांची बाजू घेणारे आमदार नाहीत,या बाबत खंत व्यक्त करून आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, कामगारांच्या प्रश्नांची  विधिमंडळ सदस्यांना जाणीव व्हावी यासाठी, शिष्टमंडळाद्वारे विरोधी पक्ष नेत्यांची आपण भेट आयोजित करू.

  ज्येष्ठ कामगार नेते ॲड .एस. के. शेट्ये यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अन्यायविरुद्ध लढाईचे पहिले पाऊल चांगले पडले असून, शेतकरी व कामगारांची चांगली ताकद निर्माण झाली आहे. बंदर व गोदी कामगारांचा २० मे च्या आंदोलनाला पाठिंबा राहील. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव व शेतकरी कामगारांचे नेते  डॉ. अजित नवले यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  चार श्रम संहिता व जन  सुरक्षा कायदा सरकारने ताबडतोब मागे घ्यावा. शेतकरी व कामगारांनी एक वर्षभर संघर्ष करून ज्याप्रमाणे केंद्र सरकारला शेतकऱ्याचा कायदा मागे घेण्यास लावला,  त्याचप्रमाणे चार श्रम सहिता व जन सुरक्षा कायदा ताबडतोब मागे घेण्यात यावा. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे संघटन‌ सचिव राजेंद्र साळसकर यांनी अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या वतीने आजच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या भाषणात, सन २०१४ पासून केंद्राने केलेल्या कामगार विरोधी कायद्याचा समाचार घेऊन,संमेलनात करण्यात आलेल्या तीन एकमुखी ठरावावर कामगारांची हात उंचावून संमत्ती घेतली. कामगार संमेलनामध्ये समितीचे समन्वयक डॉ. डी. एल.कराड,  संजय वढावकर,  मिलिंद रानडे उदय भट,  सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास काटकर,  कृष्णा भोईर.  सुभाष लांडगे इत्यादी नेत्यांनी आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर कडाडून हल्ला केला.  याप्रसंगी संतोष चाळके, एम. ए. पाटील, उदय चौधरी, विजय कुलकर्णी, त्रिशीला कांबळे. दिवाकर दळवी, बजरंग चव्हाण, सुकुमार दामले  सुधाकर अपराज, विद्याधर राणे, भूषण पाटील, प्रदीप शिंदे, अशोक जाधव,  बाविस्कर आदी कामगार नेते उपस्थित होते. आभार विवेक मोंन्टेरो यांनी आभार मानले. सभागृहा कामगारांनी तुडुंब भरून बाहेर देखील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या