नांदेडचे आचार्य डॉ. सुरेश सावंत म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. उपक्रमशील शिक्षक, उत्तम प्रशासक, सर्जनशील साहित्यिक, बालशिक्षण आणि बालसाहित्य हा विषय त्यांचा आस, ध्यास आणि श्वास आहे. जीवनभर ह्याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी असिधाराव्रत घेतलेले हे एक झपाटलेले आनंदाचे झाड! अक्षरयात्री!! कविवर्य रवींद्रनाथ टागोर आणि मातृहृदयी साने गुरुजी ही दोन्ही त्यांची श्रद्धास्थाने आहेत.
नांदेडच्या वसंतनगर भागातील राजर्षी शाहू विद्यालयात प्रथम सहशिक्षक, नंतर मुख्याध्यापक आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ह्या पदावरून 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून 30 एप्रिल 2018 रोजी सेवानिवृत्त झाले. बालकांच्या भावी आयुष्याची पायाभरणी विद्यामंदिराच्या प्रांगणातच केली जाते. बालपणीचा हा संस्कारक्षम कालखंड अधिक समृद्ध आणि संस्मरणीय बनविण्याची जबाबदारी डॉ. सुरेश सावंत या उपक्रमशील, प्रयोगशील, कृतिशील अध्यापकाने ओळखली आणि त्यांनी राजर्षी शाहू विद्यालयात आपल्या सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहयोगातून अभिनव, नावीन्यपूर्ण आणि चैतन्यदायी असे 81 उपक्रम कार्यान्वित केले. या सर्व उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे हा प्रांजळ हेतू होता. त्यातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जडणघडण केली आहे. डॉ. सुरेश सावंत यांच्या कार्यकर्तृत्वामुळे राजर्षी शाहू विद्यालय हा शैक्षणिक गुणवत्तेचा मानदंड ठरला. डॉ. सावंत यांनी सुरू केलेल्या विविध नवोन्मेष उपक्रमांचे राज्यभर कौतुक होऊन अनुसरण करण्यात आले. ही नांदेडची एक प्रयोगशील शाळा झाली. संपूर्ण महाराष्ट्रात ही बहुचर्चित शाळा बनली, ती त्या शाळेतील वैविध्यपूर्ण उपक्रमशीलतेमुळे. शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय व समर्पित योगदानाबद्दल भारत सरकारने सन 2008मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड येथील प्रमाणिकरण संस्थेचे आय.एस.ओ. मानांकन या शाळेला मिळाले आहे. यात डॉ. सुरेश सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे. ब्रिटिश कॉन्सिलने ’उपक्रमशील शाळा’ म्हणून या शाळेची निवड केली.
शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा सळसळत्या चैतन्याचा झरा असतो. आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा शाळेचा बॅ्रंड अॅम्बेसेडर आहे, असे डॉ. सावंत यांनी मानले. शाळेतील प्रत्येक उपक्रम हे कर्मकांड म्हणून नव्हे, तर एक सृजनात्मक आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारले. शाळा ही आनंदशाळा व्हावी, जीवनशाळा व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले. वाचनसंस्कृती आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी डॉ. सुरेश सावंत यांनी दिलेले योगदान लाख मोलाचे आहे. डॉ. सावंत सरांनी आपल्या ’पुस्तक माझा मित्र’ या बालकवितेत म्हटल्याप्रमणे-
’पुस्तकांनी बोट धरून
अद्भुत विश्वात नेले
पुस्तकांच्या मैत्रीनेच
मला श्रीमंत केले...’
त्याच पुस्तकांची गोडी आपल्या विद्यार्थ्यांना लावून त्यांचे जीवन अधिक समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी त्यांनी आपल्या शाळेत केलेल्या उपक्रमांची माहिती त्यांच्या ’बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध’ या पुस्तकात तसेच डॉ. सुरेश सावंत यांच्या एकसष्टीनिमित्ताने संदीप काळे यांनी संपादित केलेल्या ’आचार्य डॉ. सुरेश सावंत गौरवग्रंथ’ या पुस्तकात मिळते.
वर्गवार वाचनपेटी
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अवांतर वाचनाशिवाय परिपूर्ण होत नाही. वेळापत्रकाच्या आणि अभ्यासाच्या व्यस्ततेमुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे, अशी सर्वत्र ओरड होत आहे, परंतु डॉ. सुरेश सावंत यांनी वाचनसंस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ’वर्गवार वाचनपेटी’ अर्थात ’फिरते वाचनालय’ हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेत राबविला. शाळेच्या दिनक्रमात शिक्षकांच्या रजेमुळे जे तास रिकामे असतात, अशा वर्गात पर्यायी शिक्षक छोट्या छोट्या पुस्तकांची वाचनपेटी घेऊन जात आणि सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाचनासाठी देत. ह्या प्रत्येक वाचनपेटीत कथा, कविता, गाणी, कादंबरी, चरित्रे, छंदविषयक, निबंधांची अशी साठ-सत्तर पुस्तके असत. या फिरत्या वाचनालयामुळे रिकाम्या तासिकेचा वेळ वाया न जाता विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढले. त्यांना वाचनाचे अक्षरशः वेड लागले. विद्यार्थ्यांची पुस्तकांशी मैत्री जडली. या वाचनपेटी उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले आहे.
लेखक आपल्या भेटीला
पाठ्यपुस्तकातील लेखक, कवी पाहायला मिळणे, त्यांच्या तोंडून त्यांच्या कवितेबद्दल, कथेबद्दल ऐकायला मिळणे, अशा लेखक-कवींशी मनमोकळा संवाद साधणे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक आनंददायी अनुभव असतो. आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा असतो. ’कवी तो कसा दिसे आननी’, असे बालसुलभ कुतूहल असते. डॉ. सुरेश सावंत यांनी आपल्या शाळेत ’लेखक आपल्या भेटीला’ हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत यदुनाथ थत्ते, फ. मुं. शिंदे, भास्कर चंदनशिव, लक्ष्मीकांत तांबोळी, रविचंद्र हडसनकर, भु. द. वाडीकर, द. ता. भोसले, दत्ता भगत, श्रीकांत देशमुख, प्रदीप निफाडकर, मधुकर धर्मापुरीकर, ग. पि. मनूरकर इ. नामवंत लेखक-कवींनी त्यांच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या चिकित्सक प्रश्नांना या लेखक-कवींनी मनमोकळी उत्तरे दिल्यामुळे ’लेखक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम म्हणजे शाळेतील ’साहित्यसंसद’ बनली.
शतकोत्सव ः वाचकांचा आणि पुस्तकांचाही
राजर्षी शाहू विद्यालयात उपक्रमशील मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत सरांच्या कल्पकतेमधून वाचनचळवळीला बळकटी देण्यासाठी ’शतकोत्सव ः वाचकांचा आणि पुस्तकांचाही’ हा अनोखा उपक्रम राबवला होता.
शाळेत मुख्य वाचनालय आहे. त्या ग्रंथालयाचे वारानुसार विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचे वेळापत्रक आहे. ज्या दिवशी ज्या वर्गाचा दिवस असेल, त्या दिवशी त्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तके वाचायला मिळतात. मात्र ज्यांचा दिवस नाही, अशा वर्गांची कुचंबणा होते. त्यांच्यासाठी त्यांनी कार्यालयात एक स्वतंत्र वाचनालय सुरू केले. त्या ग्रंथालयात एक हजार पुस्तके ठेवली. त्यातून विद्यार्थी हवे ते पुस्तक वाचनासाठी निवडू शकत असत.
मुक्त वाचनालय हे मुख्याध्यापकांच्या टेबलावर असते. मुख्याध्यापकांच्या टेबलावर सदैव शे-दोनशे पुस्तके ठेवलेली असत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे पुस्तक निवडावे आणि वाचनासाठी घरी घेऊन जावे. वाचून झालेले पुस्तक परत करावे. या पुस्तकाची कुठेही नोंद नसे. पुस्तके वाचली, फाटली किंवा नेऊन घरीच ठेवून दिली, तरी त्यांची काहीच हरकत नसे. पुस्तक वाचले जाणे महत्त्वाचे.
दोन्ही वाचनालयांची सभासद संख्या दोन हजार होती. दररोज दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी दोनशेपेक्षा अधिक पुस्तके वाचनासाठी घरी नेत आणि वाचून दुसर्या दिवशी परत करत. त्यामुळे शाळेत दररोज वाचनाचा शतकोत्सव साजरा केला जात असे.
मागेल त्याला मागेल ते पुस्तक
डॉ. सुरेश सावंत सर यांनी आपल्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना खुले आवाहन केले की, ज्याला जे पुस्तक वाचायला आवडते, त्याने त्या पुस्तकाचे नाव एका कागदावर लिहून द्यावे. या आवाहनानुसार विद्यार्थी-शिक्षक, ग्रंथालयात पुस्तक नसेल तर पुस्तकाचे नाव लिहून द्यायचे. ’मागेल त्याला मागेल ते पुस्तक’ तत्काळ उपलब्ध करून दिले जात असे. नांदेडला दुकानात न मिळालेले पुस्तक पुणे, मुंबई येथून, जिथे मिळेल तिथून पुस्तके उपलब्ध करून देत. चांगल्या पुस्तकाला चांगला वाचक मिळवून दिला पाहिजे आणि चांगल्या वाचकांना हवे ते पुस्तक मिळवून दिले पाहिजे, हा ग्रंथालयशास्त्रातील सिद्धान्त सावंत सरांनी वास्तवात उतरविला.
नव्या पुस्तकांचे जाहीर स्वागत
विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या आवडीचे एखादे नवीन पुस्तक बाजारात आले की, मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत सर ते हमखास सरेदी करीत. ते पुस्तक खरेदी करून गुपचूप ग्रंथालयात जमा करून टाकले, तर ते कपाटबंद होऊन जाते. पुस्तकांच्या संख्येत भर पडते, पण योग्य त्या वाचकांपर्यंत पुस्तक पोहचत नाही. म्हणून डॉ. सावंत सर प्रार्थनेच्या वेळी एक हजार विद्यार्थ्यांसमोर ते पुस्तक दाखवून त्या पुस्तकाविषयी माहिती सांगत. कधीकधी तर लेखी सूचना देऊन ग्रंथालयात किती आणि कोणती नवीन पुस्तके दाखल झाली, याची माहिती देत. त्यामुळे पुस्तकांविषयी वाचकांची उत्कंठा वाढली आणि पुस्तकांची मागणी वाढली. एखाद्या नवागत आणि प्रिय पाहुण्यांचे आवडीने स्वागत करावे, तसे नव्या पुस्तकांचे स्वागत केले जायचे.
वाढदिवसाची पुस्तक भेट
डॉ. सुरेश सावंत यांनी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा वाढदिवस सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत सुरू केली. त्यासाठी अर्थात शाळेचा अध्ययन-अध्यापनाचा वेळ खर्च न करता, प्रार्थनेच्या वेळीच वाढदिवस साजरे करण्याची पद्धत होती. एकेका दिवशी पाच-दहा विद्यार्थ्यांचेही वाढदिवस असत. अशा प्रत्येक विद्यार्थ्याला त्या दिवशी एक प्रेरणादायी आणि सुंदर असे शुभेच्छा कार्ड आणि एक वाचनीय पुस्तक भेट देऊन वाढदिवस साजरे करत असत. त्यांच्या शाळेत जवळजवळ 65 ते 70 टक्के विद्यार्थी हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील होते. ज्यांच्या घरी कधीच वाढदिवस साजरा होत नाही, अशा हमालांची, हातगाडीवाल्यांची, शेतमजुरांची, बांधकाम मिस्त्रींची, गिरीजनांची आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील मुले-मुली होत्या. अशा विद्यार्थ्यांना आपला वाढदिवस जाहीरपणे साजरा होताना पाहून त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असायचा. ज्या घरात पाठ्यपुस्तकाशिवाय अन्य पुस्तक माहीत नसे, अशा घरात एक नवे कोरे पुस्तक जात असे. ह्या उपक्रमामुळे ग्रंथप्रचार आणि ग्रंथप्रसार होत असे. आपल्या वाढदिवसाची ’रिटर्न गिफ्ट’ म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तक भेट देत.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मृती वाचनकट्टा
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी डॉ. सुरेश सावंत यांनी कल्पकतेने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मृती वाचनकट्टा सुरू केला. यासाठी नरहर कुरूंदकर स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे श्री जयप्रकाश सुरनर यांनी निवडक पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली. ती पेटी डॉ. सुरेश सावंत सरांच्या कार्यालयात सदैव उघडी करून ठेवलेली असे. विद्यार्थ्यांनी केव्हाही यावे पुस्तके चाळावीत आणि आवडलेली पुस्तके वाचनासाठी घरी घेऊन जावीत. वाचून झाल्यावर परत पेटीत आणून ठेवावीत. त्याची कुठेच नोंद नसे. खेळांसाठी क्रीडांगण आणि पुस्तकांसाठी वाचनकट्टा यांना कधीच सुट्टी नसे.
समृद्ध ग्रंथालय
समृद्ध ग्रंथालय हे शाळेचे वैभव आणि भूषण असते. डॉ. सुरेश सावंत यांनी डिसेंबर 2004 मध्ये मुख्याध्यापकपदाची सूत्र स्वीकारली, त्यावेळी शाळेच्या ग्रंथालयात केवळ 800 पुस्तके होती. ग्रंथालयाचे महत्त्व ओळखून स्वतःच्या पैशातून शाळेला 1 लक्ष रूपयांची ग्रंथसंपदा सरांनी भेट दिली. ’ज्ञानपोई’ नावाचा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये प्रत्येक शिक्षकाने दरमहा एक पुस्तक खरेदी करून ते स्वतः वाचावे व नतर ग्रंथालयास भेट द्यायचे. त्यामधून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनीही शाळेला पुस्तके भेट दिली. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून ग्रंथालयाला पुस्तके भेट मिळविण्यात आली.
डॉ. सुरेश सावंत सरांनी आपल्या परिचित ग्रंथप्रेमींना आणि साहित्यिकांना विनंतीपत्रे पाठवून व प्रत्यक्ष भेटून त्यांना ’ग्रंथदान’ करण्याचे विनम्र आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राचार्य रा. रं. बोराडे, भालचंद्र देशपांडे, प्राचार्य सी. बी. देशपांडे, डॉ. विलास कुमठेकर, माधव चुकेवाड, भु. द. वाडीकर, डॉ. शैलजा वाडीकर, प्राचार्य जी. व्ही. थेटे, प्राचार्य दत्तात्रेय धनपलवार, प्रदीप लोखंडे, जयप्रकाश सुरनर यांनी हजारो रूपयांचे दुर्मीळ ग्रंथ शाळेच्या ग्रंथालयाला दान दिले.
डॉ. सुरेश सावंत सरांनी समाजातील प्रतिष्ठित, शिक्षणप्रेमी लोकांच्या भेटी घेऊन आपापल्या वयाच्या रौप्यमहोत्सवात, अमृतमहोत्सवात अन्नदानाऐवजी ग्रंथदान करावे, असे पटवून दिले. त्यांच्याकडून दानरूपाने ग्रंथसंपदा मिळविली. त्यांच्या विविधांगी अथक परिश्रमांमुळे आज शाळेच्या ग्रंथालयातील ग्रंथसंपदा 8 हजारापर्यंत पोहोचली आहे.
तीन दर्शनी फलक
डॉ. सुरेश सावंत सरांच्या कल्पकतेतून शाळेच्या तीन मजल्यांवर तीन दर्शनी फलक (डिस्प्ले बोर्ड) लावण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळेच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी ’वृत्तदर्पण’ फलक, विद्यार्थ्यांची चित्रे प्रदर्शित करण्यासाठी ’चित्रलिपी’ फलक आणि विद्यार्थ्यांच्या कथाकविता प्रदर्शित करण्यासाठी ’अक्षरशिल्प’ फलक लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना भिंतीवर, फळ्यांवर लिहायला फार आवडते. ती त्यांची मानसिक गरज असते. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून डॉ. सुरेश सावंत सरांनी शाळेच्या व्हरांड्यात, प्रवेशद्वाराशी एक खास फलक बसविला आहे. ह्या फळ्याचे नावच मुळी ’अभिव्यक्ती फलक’ असे आहे. ह्या फलकावर विद्यार्थी बातम्या, सुविचार, उपयुक्त माहिती असे काहीकाही लिहितात. कुणी चित्रे काढतात, कुणी रांगोळी काढतात. या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाट मोकळी करून दिली जाते.
लेखन कार्यशाळा
विद्यार्थ्यांच्या अंगच्या सुप्त साहित्यिक गुणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी शाळेत दर शनिवारी शाळा सुटल्यावर दुपारी 3 ते 5 या वेळात निवडक 100 ते 150 विद्यार्थ्यांची लेखन कार्यशाळा घेत असत. या कार्यशाळेत उपस्थित राहून ज्येष्ठ लेखक, कवी, संशोधक, पत्रकार या विद्यार्थ्यांना लेखनकलेविषयी मार्गदर्शन करत. अनुभवकथन करत.
लेखनकार्यशाळेत ज्या लेखकाची उपस्थिती लाभणार आहे, अशा लेखकाची पुस्तके आधीच विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देत असत. विद्यार्थ्यांनी ती पुस्तके वाचलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांची संबंधित लेखकाशी संवाद साधण्याची मनोभूमिका तयार होत असे. त्यातून लेखक आणि वाचकांचा छान संवाद घडून येत असे. डॉ. भगवान अंजनीकर, डॉ. अच्युत बन, भूगोलकोशकार एल. के. कुलकर्णी, रविचंद्र हडसनकर, डॉ. वृषाली किन्हाळकर, श्रीकांत देशमुख, भीमराव शेळके, मनोज बोरगावकर, व्यंकटेश चौधरी, राजेश मुखेडकर, महेश मोरे इ. लेखक-कवींनी या कार्यशाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना लेखनकलेविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेतून प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन अनेक विद्यार्थी कथा-कविता लिहू लागले. त्यांच्या कथा-कविता नामांकित दैनिकांतून, मुलांच्या मासिकांतून प्रकाशित झाल्या आहेत.
रोजनिशी ः माझी सखी
पुणे येथील अक्षरमानव प्रकाशनाने महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी रोजनिशी (दैनंदिनी) लेखनस्पर्धा घेतली होती. या निमित्ताने सरांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिनी लेखनाची पद्धती आणि महत्त्व समजावून सांगितले. रोजनिशी ही आपली सर्वात जवळची मैत्रीण असते. तिच्याशी आपण हितगुज साधू शकतो. आपण आपले मन मोकळे करू शकतो, ही जाणीव विद्यार्थ्यांना झाली. यातून काही विद्यार्थी नियमित दैनंदिनी लिहू लागले.
शोध प्रतिभाकळ्यांचा
वाचती झालेली मुले लवकरच लिहिती होतात, असे सरांचे अनुभवसिद्ध मत आहे. यांच्यातून उद्याचे लेखक, कवी, विचारवंत घडणार असतात, असा त्यांचा विश्वास आहे आणि त्यांचा हा विश्वास त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी खरा ठरविला आहे.
त्यांच्या शाळेची सहल दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी जात असे. डॉ. सुरेश सावंत यांनी सहलीला जाऊन आलेल्या विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठी प्रवृत्त केले. विद्यार्थ्यांच्या निबंधावर भाषिक आणि संपादकीय संस्कार करून त्यांनी ’मी अनुभवलेली सहल’ हा विद्यार्थ्यांच्या निबंधांचा उत्कृष्ट असा शंभर पृष्ठांचा संग्रह प्रकाशित केला. आठवीत शिकणारी 12 वर्षीय विद्यार्थिनी कु. शची शैलजा ही गोष्टी लिहिते याचा सुगावा डॉ. सावंत यांना लागला. अत्यंत तत्परतेने तिचे हस्तलिखित हस्तगत करून त्यांनी तिचा ’आनंदी’ हा बालकथासंग्रह इसाप प्रकाशनाच्या माध्यमातून 2003 साली प्रकाशित केला.
2016-17 ह्या शैक्षणिक वर्षात त्यांच्या वीस विद्यार्थ्यांनी डॉ. भगवान अंजनीकर यांच्या वीस पुस्तकांची समीक्षा केली. 2017-18 या शैक्षणिक वर्षात त्यांच्या वीस विद्यार्थ्यांनी मुंबई येथील ज्येष्ठ बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या वीस पुस्तकांची समीक्षा केली. ’डॉ. भगवान अंजनीकर यांचे बालसाहित्य ः बालवाचकांच्या नजरेतून’ आणि ’एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य ः बालसमीक्षकांच्या नजरेतून’ ही दोन पुस्तके नांदेडच्या इसाप प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहेत.
महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर, नांदेड येथील इयत्ता दहावीत शिकत असलेला नचिकेत केशव मेकाले या नव्यानं लिहिणार्या विद्यार्थ्याला प्रेरणा देऊन, त्याच्या प्रज्ञा आणि प्रतिभेचे कौतुक करून त्याला अधिक सक्षमपणे लिहितं करण्याचं कामही डॉ. सुरेश सावंत यांनी केलं आहे. त्याची ’नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे जग’ ही किशोर कादंबरी 2019 साली नामवंत प्रकाशनाकडून प्रकाशित केली.
माझा शिक्षक ः चरित्रनायक
विद्यार्थी महापुरूषांची चरित्रे वाचतात, ऐकतात, पण ती चरित्रे कशी घडतात याची कल्पना ह्या विद्यार्थ्यांना नसते. अनेकांची चरित्रे घडविणारा, अनेकांच्या आयुष्याला आकार देणारा, अनेकांना प्रभावित करणारा आपला शिक्षक हादेखील चरित्रनायक होऊ शकतो, याची कल्पना विद्यार्थ्यांना नसते. डॉ. सुरेश सावंत सर यांनी लेखनगुण अवगत असणार्या शाळेतील आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना आपला प्रत्येक शिक्षक हा चरित्रनायकच आहे. त्याचेही वाचनीय चरित्र तयार होऊ शकते, हा विश्वास दिला. चरित्रलेखनासाठी आवश्यक असणारी सामुग्री कशी गोळा करायची याची सविस्तर माहिती दिली. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या शिक्षकांची चरित्रे लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांची मुलाखत घेऊन आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून आवश्यक माहिती मिळवून, आपल्या शिक्षकांशी चर्चा करून शिक्षकांची चरित्रे लिहिली आहेत. विद्यार्थ्यांची लेखनशैली फारशी प्रगत नसल्यामुळे डॉ. सुरेश सावंत यांनी ती चरित्रे पुनः पुन्हा वाचून, संपादित करून विद्यार्थ्यांकडून वारंवार पुनर्लेखन करवून घेतली. या प्रकल्पात एकोणीस विद्यार्थ्यांनी एकोणीस शिक्षकांची चरित्रचित्रे जिव्हाळ्याने रेखाटली आहेत. यात पाच चरित्रलेखक मुले आहेत आणि चौदा चरित्रलेखक मुली आहेत.
ह्या पुस्तकाचे काम साधारणतः दोन वर्षे चालले. 2016-2017 ह्या शैक्षणिक वर्षात ह्या कामाला सुरूवात झाली आणि 2017-2018 ह्या शैक्षणिक वर्षात ह्या प्रकल्पाला ग्रंथरूप लाभले. त्याचे संपादन डॉ. सुरेश सावंत सरांनी केले. हे पुस्तक नांदेडच्या संगत प्रकाशनाने आकर्षक स्वरूपात जानेवारी 2018 मध्ये प्रकाशित केले. ’माझा शिक्षक ः चरित्रनायक’ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांची ह्या पुस्तकाला प्रस्तावना लाभली असून महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने शाळेत वनौषधी उद्यान विकसित केले आहे. यात 45 प्रकारच्या 288 रोपांचे आगळेवेगळे असे वनौषधी उद्यान साकारले आहे. पानाफुलांनी बहरलेल्या पसिरात बागडताना विद्यार्थ्यांना उपवनात विहार केल्याचा आनंद मिळतो. याशिवाय सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा, पंचतारांकित स्वच्छतागृहे, भव्य क्रीडांगण, पर्जन्यजलसंचय आदी उपक्रमांचा नामोल्लेख करण्याचा मोह होतो.
शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या बारकाईने तपासून अक्षर सुधारून देणारा मुख्याध्यापक लाभणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मोठी भाग्याची गोष्ट आहे. या सर्व उपक्रमांची कार्यवाही पाहता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य दामोदर आळंदकर यांनी ’राजर्षी शाहू विद्यालयाने आपला स्वतंत्र पॅटर्न निर्माण केला आहे’, असे मत नोंदविले आहे.
या सर्व डोंगराएवढ्या उपक्रमांचा डोलारा सहज सांभाळणारे, सर्वांना मार्गदर्शन करणारे डॉ. सुरेश सावंत नक्की आहेत तरी कोण?
उमरी तालुक्यातील गोरठा ही संत दासगणू महाराज आणि परमपूज्य वरदानंद भारती यांच्या वास्तव्याने भारावलेली पावनभूमी. या गोरठा गावी सुरेश सावंत यांचा जन्म 1 जानेवारी 1960 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. गोविंदराव सावंत आणि चंद्राबाई सावंत यांचे हे पाचवे अपत्य. तीन बंधू आणि तीन भगिनी मिळून ह्या अष्टकोनी कुटुंबाने अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आपला जीवनप्रवास सुरू केला. सरांचे प्राथमिक शिक्षण गोरठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज उमरी येथे झाले. आठवी ते बारावीपर्यंतची पाच वर्षे त्यांनी नित्यनेमाने गोरठा ते उमरी आणि उमरी ते गोरठा असा अनवाणी पायी प्रवास केला.
1977 साली सर बारावी उत्तीर्ण झाले. सरांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांना आपल्या कॉलेजला प्रवेश घेण्याची विनंती केली, तेव्हा सरांनी नम्रपणे सांगितले की, माझ्या गरीब परिस्थितीमुळे मी आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाही. तेव्हा प्राध्यापकांनी कॉलेजतर्फे सरांना उमरी ते धर्माबाद रेल्वेचा पास काढून देण्याची हमी दिली आणि सरांच्या शिक्षणाची गाडी पायवाटेवरून लोहमार्गावर आली. हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात सर 1980 मध्ये बी. ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळी बी.एड्.ची फीस रूपये 365/- होती. पण तेवढीही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यावर्षी ते बी.एड्.ला प्रवेश घेऊ शकले नाहीत.
गुणवत्तेने बी. ए. उत्तीर्ण होऊनही गरिबीमुळे सरांनी गावाकडे गुरे राखण्याचे काम केले. 1980 ते 1983 ही जवळजवळ तीन वर्षे सरांनी शेतीत पूर्णवेळ शेतकर्यासारखे काम केले. बी.एड.ची फीस भरण्यासाठी सरांनी चक्क दुसर्याच्या शेतावर मजूर म्हणून काम करायला सुरूवात केली. त्यातून बी.एड्.च्या फीसचे पैसे जमा केले आणि जून 1984मध्ये नांदेडच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी. एड्. प्रथमश्रेणीत प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. जून ते सप्टेंबर 1985 या चार महिन्यांच्या कालावधीत भोकर येथील शाहू महाराज हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीच्या वर्गांना मराठीचे अध्यापन करून अध्यापक जीवनाचा ओनामा रचला.
9 सप्टेंबर 1985 रोजी सावंत सर नांदेडच्या राजर्षी शाहू विद्यालयात सहशिक्षक म्हणून रूजू झाले. उपजत कल्पकता, प्रतिभा, धाडसीवृत्ती, साहित्यनिर्मितीची ओढ, प्रभावी वक्तृत्वशैलीच्या जोरावर सरांनी अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला. संस्थेच्या पदाधिकार्यांनी 1992 मध्ये ज्युनिअर कॉलेजची मान्यता मिळविली आणि ज्युनिअर कॉलेजची पूर्ण जबाबदारी सावंत सरांवर सोपविली. एक-दोन वर्षांमध्येच 11 वी आणि 12 वीची विद्यार्थीसंख्या वाढू लागली. बारावीचा निकाल चांगला लागू लागला. शाळा, कॉलेजमधील विविध उपक्रमांच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होऊ लागल्या, तशीतशी राजर्षी शाहू ज्युनिअर कॉलेजची ओळख समाजमनामध्ये निर्माण होऊ लागली. प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून 1996पर्यंत 11वी व 12वी कला शाळेच्या दोन अनुदानित तुकड्या मिळविल्या. ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज म्हणून त्यांनी 2004 पर्यंत कार्यभार सांभाळला. सावंत सर हे बोलके सुधारक नाहीत, तर ते कर्ते सुधारक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजचा 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 17% वरून 97% पर्यंत पोहोचला. याचे श्रेय सरांच्या कार्यकौशल्याला जाते.
1985 ते 1994 या नऊ वर्षांमध्ये सावंत सरांनी माध्यमिक विभागात सहशिक्षक म्हणून कार्य केले. 1994 ते 2004 पर्यंत ज्युनिअर कॉलेजच्या प्रमुखपदाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यानंतर शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी 2004मध्ये सावंत सरांची मुख्याध्यापकपदी निवड झाली. 2004 ते 2018 म्हणजे सेवानिवृत्त होईपर्यंत चौदा वर्षांची सरांची मुख्याध्यापकपदाची कारकीर्द म्हणजे शाळेच्या प्रगतीचा सुवर्णकाळच ठरला. शाळेची चौफेर प्रगती होऊन नांदेड जिल्ह्यातील क्रमांक एकची शाळा तर ठरलीच, शिवाय शाळेचा नावलौकिक राष्ट्रीयस्तरापर्यंत पोहोचविण्यात सर यशस्वी झाले.
डॉ. सुरेश सावंत यांच्याविषयी आचार्य विनोबा भावे यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे जो फक्त पुस्तकातील धडे शिकवतो तो शिक्षक, जो पुस्तकाबाहेरील ज्ञान देतो तो गुरू आणि जो विद्यार्थ्यांना जगायचं कसं हे शिकवतो, त्यासाठी लायक बनवतो, तो आचार्य. या दृष्टीने विचार करता डॉ. सुरेश सावंत यांचे ’आचार्य’ म्हणून आपणास दर्शन घडते. प्रा. उत्तमराव सूर्यवंशी हे डॉ. सुरेश सावंत यांचे गुरू आहेत. ते आपल्या शिष्याचा गौरव करताना म्हणतात, ’सुरेश सावंत हे राजर्षीचे आचार्य आहेत’. यातच त्यांचा मोठेपणा अधोरेखित होतो.
डॉ. सुरेश सावंत हे स्वतः सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांची 54 पुस्तके प्रकाशित झाली असून महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचे लेखनकर्तृत्व सन्मानित झाले आहे. कुंटूर, जळगाव आणि पैठण येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद डॉ. सुरेश सावंत यांनी भूषविले आहे. श्रद्धेय अप्पा म्हणजे अनंत महाराज आठवले उर्फ स्वामी वरदानंद भारती यांनी आपल्या या शिष्याचे लेखनकर्तृत्व पाहून ’साहित्याचार्य’ ही उपाधी दिली आहे.
संघर्षाच्या मैदानात उतरलेल्या ह्या अपराजित योद्ध्याच्या प्रा.डॉ. मथु सावंत ह्या सहधर्मचारिणी आहेत. त्याही प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांचा एक मुलगा सौरभ याने एम. सी. ए. चे शिक्षण पूर्ण केले आहे. तो आपली वैचारिक भूमिका संगणकीय ज्ञानातून भक्कम करतो आहे, तर धाकटा मुलगा डॉ. संकेत हा वैद्यकीय व्यवसायात उतरला आहे.
थोडक्यात, साहित्याचे सर्जनशील उपासक नावीन्यपूर्ण उपक्रमांचे प्रवर्तक, वाचन चळवळीचे अध्वर्यू, संघटनशील नेतृत्व, सर्वसमावेशक मनोवृत्ती असलेल्या डॉ. सुरेश सावंत यांनी वाचन चळवळीच्या संवर्धनासाठी, विकासासाठी केलेले कार्य हा ह्या क्षेत्रातील मैलाचा दगड आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा