राम दातीर
माहूर( प्रतिनिधी )माहूर तालुक्यात वाडी,तांडा व दुर्गमभागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी म्हणून मागील तीन वर्षात खेचून आणलेला भरीव निधी, ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेली मोठमोठी बांधकामे,आरोग्य विषयक साधन सामुग्रीत झालेली प्रचंड वाढ, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राला मिळालेल्या 27 रुग्णवाहिका आपल्या प्रयत्नाचे फलित असल्याचे प्रतिपादन आ.भीमराव केराम यांनी केले.माहूर येथील बौद्धपुतळा प्रांगणात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्यसाधून युवक काँग्रेस डॉक्टर सेल व मेडिकेअर पुसद यांचे संयुक्त विद्यमाने दि.11 एप्रिल रोजी आयोजित महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे हे होते, तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड, कादर दोसाणी, भाजप तालुकाध्यक्ष ऍड. दिनेश येऊतकर,शहराध्यक्ष सागर महामुने,डॉ. निरंजन केशवे, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, विजय आमले व मनोज कीर्तने यांची प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आ. केराम म्हणाले लवकरच 50 खाटाचे रुग्णालय कार्यान्वित होणार असून डायलेसिस केंद्र उभारण्यासाठी सारखा पाठपुरावा सुरु आहे. आपल्या अध्यक्षीय समारोपतून नामदेवराव केशवे यांनी माहूरला उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या आरोग्य शिबिरासाठी पुसद येथील डॉ. संजय अग्रवाल व त्यांच्या सहकारी तज्ञांनी आपली सेवा दिली. आरोग्य शिबिरात २०० रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला असून ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तसंचलन करण्याचे काम यवतमाळच्या वंसतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी चमूने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेविका नंदा कांबळे, शीला रणधीर पाटील, रेणुकादास वानखेडे, रणधीर पाटील, आकाश कांबळे, अर्जुन बरडे,आकाश वानखेडे, सचिन बेहेरे आदीनी परिश्रम घेतले.

COMMENTS