राम दातीर
माहूर (प्रतिनिधी)माहूर नगरपंचायत निवडणुकीचे वारे आतापासूनच सुसाट झाले असून शहरातील राजकीय हालचालींना उधाण आले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पडद्यामागून मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने संपर्क अभियान आणि गुप्त बैठकांचा धडाका लावला आहे. अनेक भाजपा व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाठीभेटी घेणे सुरू केले असून शहरात जनतेच्या हिताचे विविध प्रकारचे कार्यक्रम आणि लोकार्पण सोहळे आयोजित केले जात आहेत.या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि युवा चेहऱ्याला संधी देण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे. प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. रमण जायभाये यांचे नाव भावी नगराध्यक्ष म्हणून सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
ॲड. रमण जायभाये यांनी केवळ कायदेशीर बाबींमध्येच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देणे, तरुण वर्गासाठी मार्गदर्शन करणे, मोफत कायदेशीर सल्ला देणे आणि स्वच्छता मोहिमांमधील सहभागामुळे त्यांचा जनतेशी थेट संपर्क राहिला आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे.भाजप पक्षाकडून जायभाये यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने स्थानिक समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत भाजप शहर उपाध्यक्ष निलेश जयस्वाल यांनी ॲड. रमण जायभाये यांच्याबद्दल बोलताना सांगितले की ॲड.रमण जायभाये हे अभ्यासू, उच्चशिक्षित आणि समाजातील सर्व घटकांशी जोडून घेणारे नेतृत्व आहे. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.नगरपंचायतीच्या विकासासाठी अशा सक्षम आणि युवा चेहऱ्याचा पक्षाला आणि शहराला निश्चितच मोठा फायदा होईल.
आगामी होऊ घातलेल्या या निवडणुकीत शहरातील घरकुल,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा आणि रोजगाराचे मुद्दे प्रमुख ठरणार आहेत.संबंधित निवडणूक विभागाकडून निवडणुकीबद्दल अजून निर्णय झालेला नसला तरी शहरात राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागले आहे. ॲड. रमण जायभाये यांना निवडणूक लढवणार की नाही या अधिकृत भूमिकेबाबत विचारणा केली असता जायभाये यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS