नांदेड.(विशेष प्रतिनिधी) बायोडिझेलची अवैधरीत्या टँकरमध्ये साठवणूक करून चोरटी विक्री करणाऱ्या वाहन चालक-मालकाविरूध्द नांदेड ग्रामीण ठाण्यात १३ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील तहसीलदार किरण अंबेकर यांनी ११ ऑक्टोबर रोजी ब्राह्मणवाड्याचे तलाठी बाबूराव मोरे यांना फोनवरून संपर्क साधला. त्याचवेळी, नांदेडचे तहसीलदार अंबेकर यांनी तलाठी मोरे यांना उपविभागीय अधिकारी विकास माने यांना बोंडार बायपास रोडवर बायोडिझेलची चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. आपण उपविभागीय अधिकारी माने यांच्या पथकासोबत जावून पुढील कार्यवाही करावी, असा आदेश दिला. दरम्यान, ११ ऑक्टोबरच्या रात्री पावणे नऊचेदरम्यान, तलाठी मोरे, उपविभागीय अधिकारी विकास माने, पो. नि. अशोक घोरबांड, नायब तहसीलदार मुगाजी एम. काकडे, मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे व अनिल धुळगंडे यांच्यासह तलाठी मंगेश वांगीकर, नारायण गाढे, शंकर वच्चेवार तसेच सय्यद मोहसिन, सपोनि. संकेत दिघे, हेड कॉन्स्टेबल शेख जावेद, पो. ना. जुबेर चाऊस, प्रमोद कऱ्हाळे व पोलीस नाईक संतोष जाधव हे बोंडार बायपास रोडवरील इकरा स्कुलच्या बाजूस एम. एस. खेहरा ट्रान्सपोर्ट येथे पोहोचले. त्यावेळी, तेथे एमएच-०४, डीएस- ८७२२ या क्रमांकाचा टँकर रस्त्याच्या बाजूला अंधारात होता.
विशेष बाब म्हणजे, त्यातून डिझेलचा वास आल्याने उपरोल्लेखित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संशय आला त्यामुळे ते सर्वजण टँकरजवळ जात असताना तेथील इसम पळून गेले. त्याचवेळी, घटना स्थळावरील टँकरची पाहणी केली असता, टँकरमध्ये अंदाजे ८ हजार लिटर्स बायोडिझेल आढळले.
महत्वपूर्ण म्हणजे, उपरोल्लेखित टँकरमध्ये साठवलेले बायोडिझेल एमपी-१४, एचसी- ०१७६ या ट्रकच्या टॅन्कमध्ये एका इलेक्ट्रॉनिक मिटरच्या साहाय्याने अवैधरीत्या बायोडिझेल भरून चोरटी विक्री करताना उपरोक्त विशेष पथकातील कर्मचाऱ्यांना आढळून आले. उपविभागीय अधिकारी विकास माने व त्यांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी उपरोक्त घटनास्थळावरून एक टँकर व त्यामधील ८ हजार लिटर बायोडिझेल, इलेक्ट्रॉनिक डिझेल भरणा व मोजमाप करणारी मशीन व एक ट्रक असा एकूण तब्बल २० ते २१ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा केंद्रे व मदतनीस पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली.
याप्रकरणी तलाठी बाबूराव अमृतराव मोरे यांनी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी १२ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशाच्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी उपरोक्त वाहन चालक व मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस नाईक ज्ञानोबा कवठेकर आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उशिरा पोलिसांनी याप्रकरणातील एका आरोपीस जेरबंद केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
COMMENTS