भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांचे ज्येष्ठ कामगार नेते ऍड. सदानंद कृष्णा शेट्ये यांना ३१ जुलै २०२१ रोजी ९० वर्षे पूर्ण होऊन ९१ व्या वर्षात पदार्पण होत आहे. ऍड. एस. के. शेट्ये यांचा जन्म ३१ जुलै १९३१ रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील लांजा तालुक्यातील वाकेड या गावी झाला. प्राथमिक शिक्षण मूळगावी तर माध्यमिक शिक्षण राजापूर व देवरुख येथे झाले. शालेय जीवनात ते राष्ट्र सेवा दलाचे सैनिक होते. पुढील शिक्षणासाठी ते १९४३ साली मुंबईला आले त्यांनी विल्सन व एल्फिस्टन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. ३ जानेवारी १९५३ साली त्यांना मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भंडार भवन येथे नोकरी मिळाली.
भारत सरकारच्या केंद्रीय कामगार शिक्षण योजनेअंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टचे पाहिले कामगार शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली. कामगार शिक्षक वर्गात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ऍड. एस. के. शेट्ये यांच्यातील सेवाभावीवृत्ती व धाडसीपणा ओळखून स्वातंत्र्यसैनिक व तत्कालीन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व अध्यक्ष डॉ. शांती पटेल यांनी त्यांना युनियनमध्ये काम करण्यास पाचारण केले.डॉ. शांती पटेल यांच्या हाकेला साथ देऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट नोकरीचा तात्काळ राजीनामा देऊन १९६२ पासून युनियनमध्ये पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली. थोड्याच अवधीत ते युनियनचे जनरल सेक्रेटरी झाले, या आता युनियनचे व फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडीत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टचे आठ वर्षे तर गोवा पोर्ट ट्रस्टचे तीस वर्षे ते कामगार विश्वस्त होते. आणीबाणीला विरोध करून कामगार हिताची बाजू घेतल्याबद्दल डॉ. शांती पटेल, ऍड. एस. के. शेट्ये यांच्यासाहित सर्व युनियन पदाधिकाऱ्यांना नाशिक जेलमध्ये अटक करण्यात आली होती. टाकसाळ मजदूर सभेचे ते अध्यक्ष असून मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज को. ऑप. कन्झ्युमर सोसायटीचे ते अनेक वर्षे चेअरमन होते. पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे ते संपादक आहेत. भारत सरकारबरोबर द्विपक्षीय वेतन समितीच्या माध्यमातून बंदर व गोदी कामगार तसेच पेन्शनर्सना भरघोस पगारवाढ मिळून दिली आहे. एक कोटीहून अधिक सभासद असलेल्या हिंद न
मजदूर सभेचे ते पदाधिकारी आहेत. त्यांना जीवन गौरव, भीष्माचार्य, कर्मयोगी असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ऍड. एस. के. शेट्ये यांच्या हातून श्रमिकांची, समाजाची व रंजल्या गांजल्याची सेवा यापुढेही अशीच होत राहो. त्यांना उदंड आयुष्यं आणि ठणठणीत आरोग्य लाभो, हीच बंदर व गोदी कामगारांतर्फे ईश्वरचरणी प्रार्थना.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS