नायगांव / प्रतिनिधी
घराच्या दाराची कोंडी तोडून चोरट्यांनी सालगड्याला देण्यासाठी घरात ठेवलेले एक लाख ८० हजार नगदी तर लंपास केले. पण जाता जाता आडीच तोळे सोन्याचे दागिने घेवून गेल्याची घटना सोमवारी दि.12 च्या रात्री तालुक्यातील बेटकबिलोली येथे घडली आहे.
दरवर्षी गुडीपाडव्याला शेतात सालगडी ठेवण्याची मराठवाड्यात प्रथा असून सालगड्याचा पगार ठरवल्यावर त्यांना त्याच दिवशी रक्कम द्यावी लागते. त्यासाठी बेटकबिलोली येथील शेतकरी आत्माराम विठ्ठल पवार यांनी सालगड्याला पगार देण्यासाठी शेतमाल विकून एक लाख ८० हजार रुपये घरात आणून ठेवले होते. मंगळवारी दि.13 रोजी सालगड्याचा पगार ठरवण्यात येणार होता. पण गुडीपाडव्याच्या पुर्वसंध्येला चोरट्यांनी रक्कम लंपास केली असल्याने पवार यांच्यासमोर मोठे संकट उभ टाकल आहे.
शेतकरी आत्माराम पवार हे नेहमीप्रमाणे सहकुटूंब घरात झोपले असता बाजूच्या खोलीची कडी तोडून घरात प्रवेश केला व कपाटात ठेवलेले एक लाख ८० हजाराची रक्कम तर चोरलीच पण जाता जाता चोरट्यांनी आडीच तोळ्याचे सोन्याचे दागिनेही लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. ऐन गुडीपाडव्याच्या दिवशीच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घरात चोरी करुन सालगड्याला द्यावयाची रक्कमच लंपास केली असल्याने सालगड्याचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोरीच्या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी हे श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. पण काहीही उपयोग झाला नाही. मागील अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरुच असून झालेल्या चोऱ्यांचा तर तपास लागलाच नाही पण चोरीच्या घटना थांबवण्यातही पोलीसांना यश येत नसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
COMMENTS