केज प्रतिनिधी.
मनातील द्वेषला मूठमाती देऊन, नैतिक मूल्यांच्या आधारावर व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल तर जीवनात शिस्त अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी व्यक्त केले. ते अभिमान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, समर्पण या उपक्रमांतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा तांबवा येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महादेव नेहरकर तर प्राचार्य हनुमंत सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य सौदागर म्हणाले की, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून ती विद्यार्थ्यांसाठी महान विभूतीच्या जयंतीची खरी भेट असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी मुख्याध्यापक नेहरकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इतिहास घडवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ नागेश कराळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार शिक्षक बालासाहेब चाटे यांनी मानले. यावेळी शिक्षक राजेंद्र सोनवणे, मच्छिंद्र चाटे, शिक्षिका पदमिन गरळे, दीपाली पवार आदींची उपस्थिती होती.

COMMENTS