जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहरातील रेल्वेस्टेशन रोड भागात जून्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी ता. २७ रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून ४१ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी तात्काळ शनिवारी सकाळी हिंगोलीत दाखल झाले. यावेळी घटनास्थळी जाऊन कायदा हातात घेणाऱ्याची गय केली जाणार नाही असे कडक शब्दात सांगितले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेस्टेशन रोड भागातील प्रशांत पिल्ले व शेख इस्माईल यांच्यात मागील काही दिवसांत वाद सुरु होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्या कुरबुरी सुरुच होत्या. दरम्यान, शुक्रवारी ता. २७ हा वाद वाढल्याने दोन्ही गट समोरासमोर आले. त्यानंतर काही वेळातच हाणामारी सुरु झाली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला.
या हाणामारीची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सय्यद अखील, उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, नितीन केणेकर, डीबी पथकाचे शेख शकील, गजानन होळकर, सुधीर ठोंबरे, शेख मुजीब यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळावर दंगाकाबू पथक देखील तैनात करण्यात आले होते.
सदर घटनेची माहिती नांदेड परिक्षत्राचे विषेश पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तांबोळी हिंगोलीत दाखल झाले होते. हिंगोली शहरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या सुचनाही दिल्या आहेत. या प्रकरणी दोन्ही गटातील परस्पर तक्रारीवरून 41 जणाविरूध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गस्त वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS