नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) नायगांव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर दररोज होणारा वातावरणातील बदल व ढगाळ वातावरणामुळे हरभरा ,ज्वारी,गहू अशा अनेक पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने हरभरा पीक तर अक्षरशः करपून जात आहे त्याकरिता शेतकरी चिंतातूर झाला आहे. हरभरा पीक वाचविण्यासाठी औषधींची फवारणी करत आहेत. सध्या नायगांव तालुक्यात कोवळया पिकावरच फवारणी करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
यावर्षी परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातल्याने शेतातील खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .त्यातच हाताशी आलेल्या सोयाबीन ,कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले होते, शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत माजले होते . शेतकऱ्यांनी शेतातील गवताची साफसफाई करून हरभरा, गहू, ज्वारी,तूर पिकाची लागवड केली आहे. यामुळे रब्बीची पेरणी बऱ्यापैकी झाली. कुंटूर येथील बालाजी हणमंते यांच्या शेतातील फुलोऱ्यात आलेली हरभरा , तुर ही पिके अक्षरशः करपून जात आहेत. या परिस्थितीत हरभरा व तुरीमुळे कांही तरी हाती लागेल म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे विविध रोग पडून पिके माना टाकत आहेत. त्यामुळे संपूर्ण वाढ होईपर्यंत हे पीक हाती लागते की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. जोमाने उगवण झालेल्या हरभरा पिकावर काही भागात वानरे तुटून पडत असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. शेतकरी आपापल्या शेतात रात्री गस्त घालून पिकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. वानर व रानडुकरामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या परिस्थितीत वनविभागाने वणाराचा व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यावर्षीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकावर होत्या मात्र तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पडलेल्या रोगामुळे हाती काही पडते की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.वानर व रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध उपाय करत आहेत. बुजगावणे उभे करणे, वाऱ्यामुळे आवाज होईल अशा पद्धतीने झाडांवर काचेच्या बाटल्या बांधणे रात्री गस्त घालणे आदी उपाय शेतकरी करत आहेत. दरवर्षी नोव्हेबर महिन्यात थंडीस सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडते. ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिकांना पोषक असते. परंतु, डिसेंबर महिना उलटला आहे, तरी अजूनही पाहिजे तशी थंडी पडलेली नाही. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन तर, कधी ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक पिवळे पडून करपून जात आहे.

COMMENTS