भूसुरुंगाचे शेत ...
'शिक्षकानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, म्हणून आईने मुलीला पेन्सिलनं भोसकलं.' बातमीचा नुसता मथळा वाचला आणि अंगावर काटा आला. एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून????
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे कित्येक अनुत्तरित प्रश्न असतात. मग सहावीतल्या मुलीला अभ्यासक्रमातील एका प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून काय बिघडलं? खरंच तेवढ्याचसाठी का तिच्या आईचा संताप अनावर झाला असेल.
.
नक्कीच नाही! त्या स्त्रीच्या मनात आधीच काहीतरी धुमसत असणार? काळजात दुःख, निराशा दाटलेली असणार. 'मुलीला उत्तर आलं नाही', हे कारण असूच शकत नाही. आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत. मनाच्या गुंतागुंतीतून वाट सापडत नाही. अंधारातून बाहेर काढणारी प्रकाशाची तिरीप दिसत नाही. या सगळ्याचा प्रस्फोट होता तो.
अर्थात तरीही तिच्या कृतीचे समर्थन नाहीच करता येणार. कारण तिच्या त्या उद्रेकाने एका कोवळ्या जीवाला तशाच एका अविश्वासाच्या गर्तेत ढकललं आहे. त्या चिमुरडीच्या पाठीवरचे घाव भरतील, पण मनावरचा?... कठीण आहे.
.
सांगायचा मुद्दा एवढाच.... की आज आपण भूसुरुंगाच्या शेतातून मार्गक्रमणा करतोय. वरवर शांतता दिसत असली तरी, कधी कुणाचा पाय पडेल? कुठे स्फोट होईल? सांगता येत नाही. म्हणूनच त्यांना वेळीच निकामी करण्याचा मार्ग शोधायला हवा.
त्या स्त्रीच्या वैयक्तिक/ कौटुंबिक आयुष्यातच प्रश्न असतील असेही नाही. सगळ्याच माध्यमातून तिन्ही त्रिकाल घेरून टाकणारी निराशा, अविश्वासाची पेरणीही याला जबाबदार आहे. बातम्या ऐका किंवा मनोरंजनासाठी एखादं चॅनल लावा; काय पोहोचते आपल्यापर्यंत? सामाजिक - आर्थिक, गुन्हे, ढासळणारी नीतिमत्ता, अनैतिक संबंध, कटकारस्थान, विश्वासघात...
आधीच माणसामाणसांतील स्नेहसंबंध हरवलाय. त्यात सगळीकडून हेच ऐकायला मिळणार असेल तर आशा जागवायची तरी कशी? निराशेच्या गर्तेतून स्वतःला सावरायचे कसे? व्यक्त व्हावंस वाटलं तरी, कुणावर आणि कसा विश्वास ठेवायचा?
.
मानस तज्ज्ञांच्या क्लिनिकमध्ये जाऊन सुटणारा हा प्रश्न नाही. त्यांच्यापर्यंत जे पोहोचतील त्यांना ते 'रितं' करतीलही. पण संपूर्ण समाजाला पुरे पडण्याएवढी त्यांचीही ताकद नाही. शेवटी तेही याच समाजाचा एक भाग आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. समाजाची, आपल्या सामाजिक बांधिलकीची, भावनिक गरजांची आणि त्या पूर्ण करणाऱ्या साधनांची पुनर्बांधणी हाच यावर शाश्वत पर्याय असू शकतो.
.
'या समाजात सगळंच काही वाईट नाही, चांगुलपणाही आहे', हे आता आपल्याला ओरडून सांगायला हवं. गुन्ह्याला शिक्षेची मागणी होते, तशी सद्गुणांना पुरस्कारही द्यायला हवेत. चुकीसाठी कानउघडणी होते तर चांगल्याचे कौतुकही व्हायला हवे. जे जे उत्तम, उदात्त आहे त्याबद्दल उच्चरवाने बोलायला हवे.
अंधार कितीही असो, प्रकाशाचा कवडसा कानाकोपऱ्यात पोहोचेल याची व्यवस्था करायला हवी. तरच कदाचित या भूसुरुंगाच्या शेतातून आपल्याला मार्ग सापडू शकेल.
- सृष्टी अंकोलेकर गुजराथी
COMMENTS