-----------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
कोरोना महामारीच्या काळात मुखेड तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भौतिक सोयी सुविधेचे पुर्णपणे अभाव व आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराकडे गांभिर्याने लक्ष घालून तात्काळ प्रश्न सोडवावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
संपुर्ण देश कोविड १९ या महामारी सारख्या रोगाच्या विरोधात संघर्ष करत असताना तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच सबंधित प्रशासन जनतेसाठी ज्या काही भौतिक प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करायला पाहिजे ते करताना दिसत नाही.किसान सभेचे नेते कॉम्रेड राजु पाटील गोजेगावकर यांनी वेळोवेळी फोन व प्रत्यक्ष सबंधित आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर उडवा उडवीचे उत्तर मिळत असल्याची माहिती त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गवाले यांच्याशी शिष्टमंडळासोबत चर्चा करत असताना दिली.
रुग्ण बेड,शौचालय,डिलीव्हरी साठी लागणार्या सोयी सुविधा,स्टाफ मुख्यालयी व नियमित नसणे,रुग्णांसाठी औषधांचा व तपासणी यंत्राचा अभाव,इमारत व कंपाउंड बाधकामात झालेला गैरव्यवहार,रुग्ण सेवा फर्निचर इत्यादी स्वरुपाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत अशा संकट काळात प्रशासन पुर्णपणे सज्ज राहणे गरजेचे असताना उलट प्रशासनच जनतेच्या जिवासोबत खेळत असल्याचा आरोप कॉम्रेड राजु पाटील गोजेगावकर यांनी केलेला आहे.या सर्व ढिसाळ कारभाराकडे तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी व जनतेला सर्व प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गवाले सर यांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.शिष्टमंडळासोबत चर्चा करत असताना मौजे गोजेगाव येथील आरोग्य केंद्राकडे लक्ष घालून सर्व प्राथमिक सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देऊ असे डॉ.गवाले सर यांनी सांगितले.
यावेळी किसान सभेचे राजु पाटील गोजेगावकर,एसएफआय चे जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे,शंकर बादावाड,विठ्ठल यलगंधेवाड,बालाजी मरखेले यांची उपस्थिती होती.
COMMENTS