*साईनाथ कन्ट्रक्शन कंपनीवर कार्यवाही होणार का?युवा सेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांचा सवाल*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील रस्ते विकास प्रशासनाच्या संगनमताने बोगस कामाचा पायंडा पाडून आपले अस्तित्व स्थापित करणाऱ्या परळी येथील साईनाथ कंट्रक्शन कंपनीवर कार्यवाही करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.मागील अनेक दिवसापूर्वी तालुक्यातील कान्हेंगाव-शिर्शी-शिरोरी या गावाला जोडणारे रस्ते नव्हते तेव्हा कान्हेंगाव येथील ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी या तीन गावांना जोडणारे रस्ते करण्याची मागणी लावून धरली होती.निवडणुकीच्या कार्यकाळात भावी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या उमेदवारांनी या गावातील ग्रामस्थांना रस्त्याचे आमिष दाखवून मताचा मलिदा लाटला होता.त्यातून निवडणूक पार पडली यात आश्वासित करणारे काही पराभूत झाले तर विजय एकाचा झाला त्यानंतर या रस्त्याला मुहूर्त सापडेल असे चिन्ह २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते.त्यातूनच तत्कालीन आमदार मोहन फड यांनी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून निधी आणला मात्र स्वतःच्या मर्जीतील कंत्राटदारांना काम देऊन आपली मर्जी राखण्याचा प्रयत्न केला.मात्र बोगस कामे करणाऱ्या कंपनीने नुसती बिले उचलून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रकार केलेला आहे.यामुळे अर्धवट कामामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी रामेश्वर मोकाशे यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील ग्रामसडक योजनेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले,दोन-वेळा आंदोलन केलं तरीही ही निडर प्रशासनाला जाग येईना!अशी परिस्थिती निर्माण झाल्यानेच मोकाशे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे तसेच पर्सनल इमेलद्वारे साईनाथ कंट्रक्शन कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे.यात त्यांनी साईनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीने मोठ्या प्रमाणात बोगस कामे करून बिले उचलले आहेत.या सर्व कामाची चौकशी करण्यासोबतच शिर्शी-शिरोरी-कान्हेंगाव या रस्त्याच्या कामाची चौकशी करत सदर रस्ता करण्यासाठी आदेशित करून या अपहारात समाविष्ट असणाऱ्या व साईनाथ कंट्रक्शन कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
COMMENTS