ऋषितुल्य ज्ञानसाधकाचे भावदर्शन : 'ऊब ही महीतली' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

डॉ. सुधीर रसाळ हे केवळ एक व्यक्तिनाम नसून ही मराठी समीक्षेच्या क्षेत्रातील तप्त अशी नाममुद्रा आहे. गेली ४०-४५ वर्षे समीक्षेच्या प्रांतात सुध...
डॉ. सुधीर रसाळ हे केवळ एक व्यक्तिनाम नसून ही मराठी समीक्षेच्या क्षेत्रातील तप्त अशी नाममुद्रा आहे. गेली ४०-४५ वर्षे समीक्षेच्या प्रांतात सुधीर रसाळ ह्या नावाचा दबदबा कायम आहे. लेखक-कवी प्रा. इंद्रजित भालेराव हे रसाळ यांचे वर्गातील विद्यार्थी आहेत. एक अध्यापक म्हणून आणि एक लेखक-कवी म्हणून भालेराव यांच्या जडणघडणीत रसाळ यांचा खोल प्रभाव आहे. रसाळ यांच्या साधेपणामुळे, त्यांच्या तर्कशुद्ध आणि तर्ककठोर वागण्या-बोलण्यामुळे, त्यांच्या सखोल आणि सदसद्विवेकी विद्वत्तेमुळे, त्यांच्या विषयनिष्ठ अध्यापनामुळे आणि उत्कट ललित व समीक्षा लेखनामुळे भालेराव खूपच प्रभावित झालेले आहेत. ह्या प्रभावातून त्यांनी 'ऊब ही महीतली' ह्या पुस्तकात आपल्या गुरुजींविषयीच्या अतीव कृतज्ञतेने आणि परमादराने हे लेखन केले आहे. हे लेखन अतिशय ओघवते आहे आणि त्यामुळेच ते वाचनीय झाले आहे. मर्ढेकरांच्या 'गोड ऊब ही महीतली' ह्या कवितेच्या ओळीवरून पुस्तकाचे काव्यमय शीर्षक बेतलेले आहे. लेखकाने ह्या पुस्तकाची मांडणी १३ प्रकरणांतून केली आहे. यातील काही आठवणी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत.
डॉ. सुधीर रसाळ यांचा जन्म दि. १० ऑगस्ट १९३४ रोजी झाला. येत्या १० ऑगस्ट रोजी ते आपल्या वयाची ९२ वर्षे पूर्ण करतील. रसाळ सरांचे डोळे जन्मजात अधू असले, तरी त्यांची वाङ्मयीन दृष्टी मात्र कमालीची स्वच्छ आहे! १९८५ ते १९८८ या काळात औरंगाबादच्या विद्यापीठात मराठी विषयात एम. ए.चे शिक्षण घेत असताना भालेराव यांना रसाळ सरांचा प्रेरणादायी सहवास लाभला. त्या सहवासाच्या आणि निरीक्षणाच्या नोंदी ह्या पुस्तकात वाचायला मिळतात. विद्यापीठाच्या मराठी विभागात चार प्राध्यापकांचे कक्ष अशा क्रमाने होते, की ती आधुनिक चातुर्वर्णव्यवस्था वाटावी. लेखकाने हे निरीक्षण गमतीने नोंदविले आहे. अन्य तिन्ही प्राध्यापकांकडे विद्यार्थी आणि अभ्यागतांची वर्दळ असायची, पण रसाळ यांच्या कक्षात नेहमी शुकशुकाट असायचा, असे निरीक्षण लेखकाने नोंदविले आहे. लेखकाने याचे कारणही सांगितले आहे. रसाळ सरांना भेटीगाठीपेक्षा वैयक्तिक ज्ञानसाधनेत अधिक रस असायचा. रसाळ वर्गात शिकवताना कधीही कुणाची वैयक्तिक चौकशी करत नसत. त्यांची शिकवण्याची शैली अनाकर्षक असली, तरी त्यांची विद्वत्ता आकर्षून घेत असे. ते अतिशय संथपणे आणि शांतपणे समीक्षाशास्त्र शिकवत.

इंद्रजित भालेराव यांची कवी म्हणून जडणघडण याच काळात झाली. याच काळात लेखकाने आपल्या 'पीकपाणी' ह्या पहिल्या संग्रहातल्या कविता लिहिलेल्या आहेत. इतर प्राध्यापक भालेराव यांच्या कवितांचे कौतुक करायचे, पण रसाळ सरांची दाद मिळाल्याशिवाय काही खरे नाही, असे त्यांना वाटायचे. एक दिवस लेखकाने आपली कवितेची वही रसाळ सरांकडे सोपविली. आठ-दहा दिवसांनी रसाळ सरांनी भालेराव यांना आपल्या कक्षात बोलविले. काही कवितांविषयी चर्चा केली आणि एकूण कवितेचे कौतुक केले. रसाळ सरांनी भालेराव यांच्या 'पीकपाणी' कवितासंग्रहाची पाठराखणही केली होती. लेखकाने रसाळ सरांचे तोवर प्रकाशित झालेले संपूर्ण लेखन विद्यार्थिदशेतच मोठ्या असोशीने वाचले होते. 'काबाडाचे धनी' ही भालेराव यांची दीर्घ कविता वाचून रसाळ यांनी अनेक चुका लक्षात आणून दिल्या होत्या. रसाळ यांचे कविताविषयक लेखन वाचून आपली कविताविषयक समज समृद्ध होत गेली, असे लेखकाने प्रांजळपणे नमूद केले आहे.
रसाळ सर गरज पडेल तेव्हा, त्या त्या क्षेत्रातल्या जाणकारांकडून तपशिलाच्या सत्यतेची खात्री करूनच आपलं मत बनवतात आणि एकदा मत बनल्यानंतर त्यावर ठाम राहतात, हे लेखकाचे निरीक्षणही महत्त्वाचे आहे. लेखकाने सांगितलेल्या काही घटना-प्रसंगांवरून रसाळ सरांची ऋजुता दिसून येते. गेली ४०-४५ वर्षे रसाळ सरांची वाचनपिपासा अम्लानपणे टिकून आहे, याची खात्री पटते. रसाळ सरांना आपली पुस्तके प्रकाशित करण्याची अजिबात घाई नसते, याचे लेखकाने एक फारच छान उदाहरण दिले आहे. रसाळ सरांनी वीस वर्षे मेहनत घेऊन 'कविता आणि प्रतिमा' हे पुस्तक लिहिले होते. 'कविता आणि प्रतिमा' हे त्यांचे पहिले पुस्तक आणि 'काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली' हे दुसरे पुस्तक त्यांच्या पन्नाशीत, म्हणजे १९८२मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांच्या पुस्तक प्रकाशनात खूप मोठा खंड पडला. 'वाङ्मयीन संस्कृती' हे त्यांचे तिसरे पुस्तक २०१०मध्ये, म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षांनंतर प्रकाशित झाले. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
डॉ. सुधीर रसाळ हे ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांचे आवडते विद्यार्थी आहेत. समीक्षेच्या क्षेत्रात आजही वालंचा शब्द प्रमाण मानला जातो. एका मुलाखतीत वालंनी 'समीक्षेच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपला हा विद्यार्थी आपल्यापेक्षाही पुढे गेला आहे', असे म्हटले होते. यावरून या गुरु-शिष्याचे मोठेपण आपल्या लक्षात येते. आज कवितेच्या बाबतीत रसाळांचा शब्द अंतिम मानला जातो. आपल्या विद्याव्यासंगाच्या बळावर रसाळांनी आपल्या गुरूंचा विश्वास सार्थ ठरविला आहे. वालंप्रमाणेच थोर विचारवंत नरहर कुरुंदकर हेही रसाळांना मानत असत. रसाळ सरांनी परिपूर्ण अभ्यासाच्या आधारे मर्ढेकर, कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, विंदा करंदीकर अशा अनेक कवींची सामर्थ्ये आणि मर्यादा दाखवून दिल्या आहेत. शास्त्रकाट्याच्या कसोटीवरच त्यांनी विविध कवी आणि कविता तपासल्या आहेत. लेखना-वाचनाच्या पलीकडे कशालाच वेळ न देणा-या रसाळांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या आणि 'प्रतिष्ठान' ह्या नियतकालिकाच्या विकासासाठी वेळ दिला, हे त्यांचे वेगळेपण आहे.
रसाळ सर माणूसघाणे नसले, तरी सारखी माणसं सांभाळत बसण्याची त्यांना कधी गरज वाटली नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासूनही ते जाणीवपूर्वक दूर राहिले. त्यांनी पुस्तकांना फारशा प्रस्तावना लिहिल्या नाहीत. सभासमारंभातून मिरवत राहिले नाहीत. ते व्रतस्थपणे लेखन करत राहिले. त्यांनी गंगाधर गाडगीळ यांच्या समीक्षालेखांचे संपादन केले होते. त्या पुस्तकाला त्यांनी दोन वर्षे मेहनत घेऊन नव्वद पानांची प्रस्तावना लिहिली होती. नेतृत्व करण्यापेक्षा खाली मान घालून काम करत राहणं त्यांना जास्त आनंददायक वाटतं. एकान्तप्रेमी असलेल्या रसाळांनी वाङ्मयीन उपक्रमांतल्या सार्वजनिक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या. लेखकाने याची काही उदाहरणे दिली आहेत. इंद्रजित भालेराव यांनी रसाळ सरांवर लिहिलेल्या आणि पृष्ठ क्रमांक ५७ ते ६०वर छापलेल्या दोन कविता मुळातून वाचण्यासारख्या आहेत.
रसाळ सरांनी निवृत्तीनंतर संगणक शिकून घेऊन हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. आपली पुस्तके ते स्वतःच संगणकावर टंकलिखित करतात. ध्यास घेतल्यासारखे ते आपल्या अपूर्ण प्रकल्पांची पूर्णता करण्यासाठी सतत संगणकासमोर बसतात, ही फारच मोठी गोष्ट आहे!
रसाळ सरांइतके विविध प्रकारचे समीक्षालेखन अन्य कुणाही समीक्षकाने केलेले नाही. म्हणूनच लेखकाने रसाळ सरांना समीक्षा ह्या क्षेत्रातले एकांडे आणि एकमेव शिलेदार संबोधले आहे.
लेखकाने ह्या पुस्तकातील काही आठवणी आपल्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे लिहिल्या आहेत, तर काही आठवणी सरांच्या 'लोभस : एक गाव काही माणसं' आणि 'माणसं जिव्हाळ्याची' ह्या ललित लेखनाच्या पुस्तकांच्या आधारे लिहिल्या आहेत. शालेय जीवनात सुधीर रसाळ हे संघिष्ठ हिंदुत्ववादी होते. 'पण माझ्या वाङ्मयप्रेमानं मला संघापासून दूर नेलं, हे बरंच झालं', असे रसाळ यांनी स्वत:च सांगितले आहे. (पृ. ५१)
रसाळ सरांच्या आयुष्यात मोजकेच मित्र आहेत. जास्त मित्र करणं म्हणजे वेळ वाया घालवणं, असंही सरांना वाटत असावं. 'आम्ही सारे मित्र' ह्या लेखात रसाळ सरांनी आपल्या मित्रांच्या स्वभावातले बारकावे सांगतानाच त्यांच्या गुणदोषांचीही निर्मम चिकित्सा केली आहे. आपण भले आणि आपले काम भले, असा सरांचा स्वभाव असल्याचे एक निरीक्षण लेखकाने इथे नोंदविले आहे. वडिलांची शिस्त, दरारा आणि घरातली आर्थिक चणचण यामुळे आपल्यात न्यूनगंड निर्माण झाला, असे त्यांनी 'मी' ह्या आत्मपर लेखात लिहिले आहे. 'कॉलेजला जाईपर्यंत माझ्या पायात साधी चप्पलही नसे' हे वाक्य वाचल्यावर कोणीही संवेदनशील वाचक अस्वस्थ होईल.
ह्या पुस्तकातील 'ऊब ही महीतली' हे पहिले प्रकरण वाचल्यावर ह्या लेखाच्या शीर्षकाची अन्वर्थकता आपल्या लक्षात येते.
ह्या पुस्तकातील 'तुकोबा आणि एकोबा' हे दुसरे प्रकरण म्हणजे लेखकाने रसाळ सरांच्या गौरव सोहळ्यात केलेल्या भाषणाचे लिखित रूप आहे.
ह्या लेखात लेखकाने नरहर कुरुंदकर यांना विद्रोही तुकोबा आणि सुधीर रसाळ यांना शांतिब्रह्म एकोबा संबोधले आहे. लेखकाने ह्या दोघांच्या समीक्षेची तुलना केली आहे. दोघांनीही संस्थात्मक कामात सारखाच रस दाखविला. दोघांचीही ज्ञानपिपासा सारखीच होती, असे निरीक्षण लेखकाने नोंदविले आहे. कुरुंदकरांकडे जसे नेतृत्वगुण होते, तसे रसाळ सरांकडे नाहीत, हा भेदही अधोरेखित केला आहे. कुरुंदकरांचा स्वभाव आग्रही आणि आक्रमक होता, तर रसाळ यांचा स्वभाव शांत आणि संयमी आहे, हा भेदही नमूद केला आहे.
अलीकडेच 'अक्षर वाङ्मय' ह्या त्रैमासिकाने सुधीर रसाळ यांच्यावर विशेषांक काढला आहे. त्या विशेषांकाच्या पुण्यात झालेल्या प्रकाशन सोहळ्याविषयी 'गुरुगौरवाचा सुखसोहळा' ह्या लेखात लिहिले आहे. त्यापुढच्या लेखात 'अक्षर वाङ्मय'च्या विशेषांकातील लेखांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. मराठी भाषेची सतत चिंता वाहणारा लेखक, आपल्या समीक्षाविषयक संकल्पना स्वच्छ असलेला मराठीतला अपवादात्मक समीक्षक, सर्वच वाङ्मयप्रकारांवर तितक्याच अधिकारवाणीने बोलू शकणारा अभ्यासक आणि आपले टोकाचे साधेपण ढळू न देणारा वाङ्मयव्यवहारातला एक साधुपुरुष अशा शब्दांत डॉ. सुधीर रसाळ यांचा गौरव केला आहे.
वयाच्या ९२व्या वर्षी रसाळ सर कसे 'अक्षरलुब्ध' आहेत आणि या वयातही ते वेगवेगळे लेखनसंकल्प कसे सिद्धीस नेत आहेत, याचे दाखले लेखकाने दिले आहेत. त्यातील पहिला संकल्प मराठवाडा साहित्य परिषदेत केलेल्या कामांविषयीचा आणि दुसरा संकल्प विद्यापीठातल्या नोकरीविषयी लिहिण्याचा आहे. आजवर डॉ. सुधीर रसाळ यांची समीक्षेची १९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तरीसुद्धा या वयात बी. रघुनाथ आणि वा. रा. कांत यांच्यावर लिहायची त्यांची तीव्र इच्छा आहे. 'सत्यकथे'त प्रकाशित झालेल्या निवडक कथांचे संकलन आणि संपादन करण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतली आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोवर हा माणूस अखंड वाचत आणि लिहीत राहणार, असा विश्वास लेखकाने व्यक्त केला आहे.
डॉ. सुधीर रसाळ यांना जे शिक्षक लाभले, ते बहुतेक सगळे जीवनवादी होते, पण त्यांच्या जीवनवादाचा डॉ. रसाळ यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. त्यांनी स्वायत्ततावादी कलावादाचा पुरस्कार केला. आपण समीक्षेची १९ पुस्तके लिहिली असली, तरी ही पुस्तके फारसं कोणी वाचत नाही, ही रसाळ सरांची खंत आहे.
गुरुवर्यांची ग्रंथसंपदा' ह्या लेखात लेखकाने डॉ. सुधीर रसाळ यांच्या एकूण लेखनकर्तृत्वाचा एकत्रित असा सांगोपांग आढावा घेतला आहे.
१९८२ साली सुधीर रसाळ यांचे 'कविता आणि प्रतिमा' हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. हे मराठीतले अजोड आणि कवितेच्या अभ्यासकांसाठी अपरिहार्य असे पुस्तक ठरले आहे. आता हे पुस्तक अभिजात ग्रंथ म्हणून ओळखले जाते. ह्या पुस्तकाने रसाळ यांना स्वतंत्र प्रज्ञेचा समीक्षक अशी ओळख मिळवून दिली.
त्याच वर्षी त्यांचे 'काही मराठी कवी : जाणिवा आणि शैली' हे पुस्तक प्रकाशित झाले. यात डॉ. रसाळ यांनी केशवसुत, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, वसंत बापट, नारायण सुर्वे यांच्यापासून ना. धों. महानोर यांच्यापर्यंतच्या काही प्रमुख कवींच्या काव्यप्रकृतीचा शोध घेतला आहे. ह्या सगळ्यांच्या कवितेतील उणिवाही स्पष्टपणे दाखवून दिल्या आहेत.
त्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्षांनंतर, म्हणजे २०१० साली त्यांचे 'वाङ्मयीन संस्कृती' हे पुस्तक प्रकाशित झाले. ह्या पुस्तकात त्यांनी संस्कृती आणि वाङ्मयनिर्मिती यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला आहे. त्याच वर्षी त्यांचे 'ना. घ. देशपांडे यांची कविता' हे पुस्तक प्रकाशित झाले. ह्या पुस्तकात त्यांनी नाघंची कविता ही या मातीतली खरी कविता आहे, असे म्हटले आहे.
२०१५ साली त्यांचे 'मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंत:स्वरूप', 'मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण' आणि 'मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्म वाङ्मय' हे तीन ग्रंथ आले. हे तीन ग्रंथ म्हणजे रसाळ यांच्या अदम्य जिद्दीचे उदाहरण आहे, असे लेखकाने म्हटले आहे. २०२२मध्ये रसाळ यांची विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर दोन पुस्तके प्रकाशित झाली. 'कवितायन' ह्या पुस्तकात विंदांच्या कवितेचे आकलन मांडले आहे. 'विंदांचे गद्यरूप' ह्या ग्रंथात विंदांचे गद्यलेखन आणि समीक्षालेखनाचा परामर्श घेतला आहे. याच ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
'समीक्षक भालचंद्र नेमाडे' ह्या ग्रंथात नेमाडे यांच्या समीक्षालेखनाविषयीचे आपले मतभेद व्यक्त करण्यासाठी त्यांच्या समीक्षेची समीक्षा केली आहे. 'पार्थिवपूजक पु. शि. रेगे' ह्या ग्रंथात रेगे यांच्या कवितांचे मर्म उकलून दाखविले आहे. रेगे यांच्या कवितेत जीवनाचे समग्र आकलन प्रकट होत नाही, असे रसाळ यांना वाटते.

'कविता निरूपणे' आणि 'काव्यालोचना' ह्या दोन ग्रंथांत रसाळ यांनी १९६२ ते २०१७ ह्या साठ वर्षांत वेळोवेळी सुट्या कवितांवर लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. ह्या पुस्तकात रसाळ यांनी प्रत्येक कवीची आणि कवितेची चिकित्सा काटेकोर आणि तर्ककठोर निकषांवर केली आहे.
समीक्षा आणि समीक्षक' ह्या ग्रंथात रसाळ यांनी गंगाधर गाडगीळ, नरहर कुरुंदकर, माधव आचवल, गो. मा. पवार आणि दिलीप चित्रे यांच्या समीक्षेची समीक्षा केली आहे.
एक नाटककार आणि काही नाटके' ह्या ग्रंथात काही नाटकांचा आणि महेश एलकुंचवार या नाटककाराचा समग्र आणि दीर्घ आढावा घेतला आहे. सुधीर रसाळ यांनी अतिशय निष्ठेने केवळ आणि केवळ समीक्षालेखनच केले आहे.
याशिवाय त्यांनी 'लोभस : एक गाव काही माणसं' आणि 'माणसं जिव्हाळ्याची' ही दोन ललित लेखनाची पुस्तके लिहिली आहेत. डॉ. सुधीर रसाळ हे जितकी तर्ककठोर समीक्षा लिहितात, तितक्याच लोभसपणे ते ललित लेखनही करू शकतात, हे ह्या दोन पुस्तकांवरून सिद्ध झाले आहे.
डॉ. सुधीर रसाळ यांनी अलीकडेच काही नियतकालिकांमधून अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, तुलसी परब, सतीश काळसेकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, चंद्रकांत पाटील ह्या महत्त्वाच्या कवींवर दीर्घ लेख लिहिले होते. त्या लेखांचे 'नव्या वाटा शोधणारे कवी' हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
रसाळ सरांनी बनगरवाडी, कोसला, रणांगण, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, गोतावळा, पाचोळा, रौंदाळा ह्या कादंब-यांचा अभ्यास करून 'सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी' हा ग्रंथ सिद्ध केला आहे.
२०२५मध्ये रसाळ सरांचे 'श्याम मनोहर यांची नाटके' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मराठी भाषा हा रसाळ सरांच्या निदिध्यासाचा विषय राहिला आहे. ह्या ध्यासातूनच २०२६मध्ये सरांचा 'मराठी भाषेचे वर्तमान स्वरूप' हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. ह्या ग्रंथात सरांनी मराठी भाषेसमोरील आव्हाने आणि त्यावरचे उपाय सुचवले आहेत. डॉ. रसाळ सरांनी आयुष्यभर आपल्या लेखनातून मराठी भाषा, मराठी वाङ्मय, विविध वाङ्मयप्रकार, वाङ्मयीन संस्कृती, मराठी समीक्षा इ. विषयांचा साकल्याने विचार करून विपुल लेखन केले आहे. वयाच्या ९२व्या वर्षीही त्यांचे वाचन आणि लेखन अखंडपणे चालूच आहे.

लेखक प्रा. इंद्रजित भालेराव यांनी डॉ. सुधीर रसाळ यांच्या समीक्षालेखनाचा अभ्यास करून काही निरीक्षणे नोंदवली आहेत. ती अशी :
रसाळ सर भाराभर आणि भराभर लेखन न करता मोजकेच पण गुणवत्तापूर्ण लेखन करतात. कोणत्याही कवीचे किंवा त्याच्या कवितेचे विश्लेषण करताना त्याच्या काळाच्या आणि एकूण साहित्याच्या परिप्रेक्ष्यातच ते करतात. ज्यांच्यावर लिहायचे आहे, त्या लेखक-कवीचा दीर्घकाळ अभ्यास करतात. कोणत्याही कवीचे मूल्यमापन करताना त्याच्या मोठेपणाचे दडपण आपल्यावर येऊ देत नाहीत. म्हणूनच ते त्या कवीची बलस्थाने आणि शबलस्थानेही दाखवू शकतात. त्या लेखक-कवींच्या अलक्षित पैलूंकडे लक्ष वेधतात.
म्हणूनच रसाळ सरांची समीक्षा वाचल्यावर वाचकाला तो लेखक-कवी सहज कळून येतो.
डॉ. सुधीर रसाळ यांनी इतरांच्या सहकार्याने, आपले गुरू, थोर समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांच्या सन्मानार्थ 'साहित्य : अध्यापन आणि प्रकार' हा गौरवग्रंथ संपादित केला होता. तो ह्या क्षेत्रातला मानदंड मानला जातो, पण रसाळ सरांच्या विद्यार्थ्यांनी सरांच्या सन्मानार्थ असा काही गौरवग्रंथ प्रकाशित केला नाही, ही खंत इंद्रजित भालेराव यांना सलत होती. त्याची भरपाई म्हणून लेखकाने 'ऊब ही महीतली' हा ग्रंथ सिद्ध केला आहे. समीक्षकाविषयीचा ग्रंथ म्हटल्यावर तो रूक्ष आणि बोजड होण्याची शक्यता होती, पण लेखकाने लालित्यपूर्ण शैलीत लिहिल्यामुळे तो अतिशय वाचनीय झाला आहे. ह्या पुस्तकातून डॉ. सुधीर रसाळ यांचे व्यक्तिमत्त्व आणि लेखनकर्तृत्व समजून घ्यायला मदत होते. अतिशय श्रद्धा-भक्तीने लिहिल्यामुळे ह्या लेखनाला 'गुरुचरित्रा'चे रूप आले आहे. हे पुस्तक वाचल्यावर प्रत्येक शिक्षकाला-प्राध्यापकाला वाटेल, इंद्रजित भालेराव यांच्यासारखा एक तरी विद्यार्थी आपल्याला लाभला पाहिजे.

  • 'ऊब ही महीतली' (चरित्रात्मक लेखन)
    लेखक : प्रा. इंद्रजित भालेराव
    प्रकाशक : आदित्य प्रकाशन, छ. संभाजीजीनगर
    मुखपृष्ठ व आतील रेखाटने : सरदार जाधव
    पृष्ठे : १६४ किंमत रु. २५०
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group