विशेष प्रतिनिधी, नांदेड
नांदेड: mudhkhed तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक वळण मिळाले आहे. हा केवळ अपघात नसून, एका जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या दोन निष्पाप मुलांसह नदीत कार घालून सामूहिक आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येपूर्वी या शिक्षकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेली सुसाईड नोट आता समोर आली असून, यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
व्हाट्सएप मेसेजमधील धक्कादायक खुलासा
हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मानेगाव (भानेगाव) येथे कार्यरत असलेल्या या शिक्षकाने आत्महत्येपूर्वी 'माझी शाळा भानेगाव' या अधिकृत व्हाट्सएप ग्रुपवर एक हृदयद्रावक संदेश पोस्ट केला होता.
त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे:
"मित्रांनो मला माफ करा. मी माझ्या मुलांना संपवून स्वतः आत्महत्या करत आहे. कारण मला २०२३ ते २०२५ या कालावधीमध्ये वेगवेगळ्या चौकशा करून, वेगवेगळ्या गोष्टींच्या तक्रारी करून हदगावचे गटशिक्षणाधिकारी फोले किशन, विस्ताराधिकारी बाच्चे सूर्यकांत, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि माझा सहकारी दत्ता विश्वंभर पवळे यांनी माझ्या बाबतीतल्या अनेक गोष्टी (कौटुंबिक व वैयक्तिक) आणून माझा अपमान केला व माझी बदनामी केली. समाजात माझी बदनामी केल्यामुळेच मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. मी व माझ्या मुलांसकट आत्महत्या करत आहे."
नेमकी घटना काय घडली?
लोहा तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून जात असताना एका भरधाव कारने पुलाचे लोखंडी कठडे तोडून थेट नदीच्या पात्रात उडी घेतली. पाण्याचा प्रवाह चांगलाच असल्याने सुरुवातीला हा चालकाचा ताबा सुटल्याने झालेला अपघात असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, शिक्षकाचा सुसाईड मेसेज व्हायरल झाल्यानंतर हा नियोजित आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.
मदत आणि बचाव कार्य
- स्थानिकांची तत्परता: कार नदीत कोसळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी व मच्छिमारांनी पोलिसांना माहिती देत स्वतःहून मदतकार्य सुरू केले.
- शोधमोहीम सुरू: माहिती मिळताच पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले असून नदीच्या पात्रातून क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शिक्षक व त्यांच्या दोन्ही मुलांचा शोध घेतला जात आहे.
शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ
या धक्कादायक प्रकारामुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित जाचाला कंटाळून एका शिक्षकाने आपल्या पोटच्या दोन लहान मुलांसह जीवनयात्रा संपवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या व्हायरल सुसाईड नोटची दखल घेतली असून, आरोपी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुढील तपास सुरू केला आहे.


COMMENTS