नांदेड: :विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित रस्ते वापरण्याची सवय रुजविण्याच्या उद्देशाने नागर्जुना पब्लिक स्कूल, नांदेड येथे ‘बी सेफ – रस्ता सुरक्षा जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत आज, दि. २४ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी IYSO Team India व Safer India Roads चे संस्थापक व अध्यक्ष श्री. घनश्याम ओझा, श्री. अजय साखाडे (पोलीस उपनिरीक्षक), श्री. जसवाल सिंग कोठीतीर्थवाले (पोलीस उपनिरीक्षक), श्री. एच. के. सोनटक्के (पोलीस शिपाई), श्री. एस. एन. वाकोडे (पोलीस शिपाई) तसेच अनमोल ओझा व वरुण तिवाडी (IYSO Team India सदस्य) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. घनश्याम ओझा (Founder & President, IYSO Team India & Safer India Roads) यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सिग्नलचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर, हेल्मेट व सीट बेल्टचा अनिवार्य वापर तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळण्याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा विषयावरील पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य सादरीकरण आणि जनजागृती उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार व सचिव श्री. केशव गडम यांनी विद्यार्थ्यांना "स्वतः सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित राहण्याचा संदेश द्या," असे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होत असून, शाळा स्तरावर रस्ता सुरक्षा संस्कार रुजविण्यास चालना मिळत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार, सचिव श्री. केशव गडम, श्री. प्रदीप पवार, श्रीकांत गडम, सौ. कनका दुर्गा देवी गडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्रभारी प्राचार्या सौ. मिताली देशपांडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

COMMENTS