नांदेड दि. 22 -
'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्शन घडविले आहे. ह्या पुस्तकाच्या वाचनातून वाचकाला परदेश पर्यटनाचा निखळ आनंद मिळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. यशवंत चव्हाण यांनी लिहिलेल्या 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हे पुस्तक लिचब्लिक प्रकाशनाने प्रकाशनासाठी सिद्ध केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमानंद तोष्णीवाल हे होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका सौ. ठाकूर, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रवीणा मांदळे, माजी आरोग्य अधिकारी डॉ. सविता चव्हाण आणि मुख्याध्यापक माहुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, की हे पुस्तक बालसाहित्यात परदेश प्रवासवर्णनपर संपूर्ण रंंगीत आणि बोलके पुस्तक बहुधा मराठीतील एकमेव पुस्तक असावे. या पुस्तकात मनोरंजन, विज्ञान, पर्यावरण आणि परदेश प्रवासाच्या तयारीसाठी लागणारे पासपोर्ट, व्हिसा व परदेसी चलन यांची वाचकांना सोप्या भाषेत माहिती मिळते. प्रास्ताविक भाषणात डॉ. यशवंत चव्हाण यांनी श्रीलंका देशाविषयी रंजक माहिती दिली. तसेच तेथील रस्ते, स्वच्छता, नागरिकांची विनम्रता यांचा उल्लेख केला. श्रीलंकेतील चहाचे मळे, चहाचे कारखाने आणि चहाची निर्यात याबद्दल सविस्तर माहिती दिली. तेथील हिर्यांच्या खाणी, हत्तीसाठींचे दवाखाने, कासव पुनर्वसन केंद्र आदी विशेष बाबींची माहिती दिली.
या कार्यक्रमाला चिरंजीलाल दागडीया, मुख्याध्यापक माहुरे, राम शेळके, मोहनराव चव्हाण, भारत पाटील तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचे प्रकाशन इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. अबोली चव्हाण हिच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS