*
---
महाराष्ट्र राज्यात ७ हजार ज्येष्ठ नागरिक संघ असून २० लाख सभासद आहेत. त्यापैकी ९१ टक्के ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळत नाही. आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक आहे. ज्येष्ठ नागरिकांना कमीत कमी ५ हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र फेसकॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी जाहीर सभेत केली.
सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली " आनंद मेळावा " संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. अण्णासाहेब टेकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे ते म्हणाले की, ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्यामध्ये प्रवास करताना ५० टक्के सवलत मिळत असून, ७५ वर्षाच्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास करण्यासाठी मोफत सवलत मिळत आहे. महिलांना ६ वर्षा पासून ७५ वर्षापर्यंत ५० टक्के सवलत मिळत आहे. एसटी महामंडळाचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी फेसकॉमच्या वतीने प्रयत्न केल्यानंतर एसटी महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या संघामध्ये जवळजवळ ७० लाख नागरिकांनी कार्ड काढली आहेत. आयुष्यमान कार्डच्या मार्फत ज्येष्ठांना ५ लाखापर्यंत सवलत मिळते. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन झाली असून, शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्या सांगण्यासाठी सायंकाळी ३ ते ५ या वेळेत अधिकाऱ्यांना भेटता येते. ज्येष्ठ नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे. आपण दुसऱ्यांना आनंद दिल्यास आपणास आनंद मिळतो. आनंदी आयुष्य जगण्यासाठी सुसंवाद करा, वाद करू नका. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,अशी मागणी डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी शेवटी आपल्या भाषणात केली. फेस्कॉमच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी फेसकॉम या संघटनेविषयी सविस्तर माहिती देऊन, फेसकॉमतर्फे होणाऱ्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला डॉ. अण्णासाहेब टेकाळे सारखे चांगले नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या नेतृत्वामुळेच ज्येष्ठ नागरिकांना अनेक सवलती मिळत आहेत.
पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक आणि सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संघाच्या वतीने एसटी स्मार्ट कार्ड, आयुष्यमान कार्ड, नवी मुंबई परिवहन बसेसचे मोफत प्रवासाचे कार्ड, आरोग्य शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविले जातात. समाजात वाचन प्रवृत्ती वाढावी म्हणून, ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने वाचक मंडळाची स्थापना आपण करीत आहोत. दिवाळीनिमित्ताने संघाच्यावतीने ८ नोव्हेंबरला सकाळी ६.३० वाजता दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्येष्ठ नागरिकांची ८ फेब्रुवारी २०२७ पासून ७ दिवस आयोध्या, प्रयाग व काशी येथे पिकनिक जाणार आहे. उन्नत उद्योगाचे मालक आणि उत्कर्ष पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत रांजणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पतसंस्थेत बचत केल्यास ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक व्याज दिले जाईल. न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ यांच्या ' झेप ' या पुस्तकाचे नुकतेच भूतान या देशात प्रकाशन झाले. या पुस्तकात डॉ. अण्णासाहेब टेकाळे, मारुती विश्वासराव, राम काजरोलकर, मारुती नाना कदम, जे. पी. देसाई यांच्या योगदानाबद्दल त्यांचा न्यूज स्टोरी चॅनेलच्या वतीने सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे निवेदन न्यूज स्टोरी टुडेच्या निर्मात्या आणि प्रकाशिका सौ. अलका भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायनाचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक भाषण संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी केले. तर संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी आभार मानले. उन्नत आणि उत्कर्ष पतसंस्थेच्या वतीने उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना स्नॅक्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी महादेव पाटील, सीमा बोराडे, राजेंद्र कदम, मंगला मानधना, जे. पी. देसाई, राजाराम घोलप, तसेच माजी पदाधिकारी राम काजरोलकर, मारुती नाना कदम, विठ्ठल गव्हाणे, विष्णुदास मुखेकर, बळवंतराव पाटील, डॉ. विजया गोसावी, सुभाष बारवाल आदी मान्यवर उपस्थित होते. सभेला ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


COMMENTS