शंतनु कोडगिरे मेळावा प्रमुख तर गजानन उत्तरवार अर्थ समिती प्रमुख नरेंद्र येरावार उमरी नांदेड महाराष्ट्रातील प्रसिद्ध व ऐतिहासिक असे श्री नग...
शंतनु कोडगिरे मेळावा प्रमुख तर गजानन उत्तरवार अर्थ समिती प्रमुख
नरेंद्र येरावार उमरी नांदेड
महाराष्ट्रातील प्रसिद्ध व ऐतिहासिक असे श्री नगरेश्वर वैश्य मंदिर नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित ५३ वा उपवर - उपवधू परिचय मेळावा दि. २३ व २४ जानेवारी २०२७ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. गेली ५२ वर्षे अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आर्य वैश्य समाजासाठी एक वरदान ठरली आहे.
या मेळाव्याच्या प्रमुखपदी युवा व सक्रिय कार्यकर्ते श्री. शंतनु कोडगिरे यांची, तर अर्थ समितीच्या प्रमुखपदी श्री. गजानन उत्तरवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. दोघांच्या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
समाज जोडणारा मेळावा .....
हा मेळावा म्हणजे केवळ परिचयाचे व्यासपीठ नसून, समाजातील अनेक कुटुंबे जोडणारा एक पवित्र सेतू आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत शकडे विवाह जुळले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती अशा विविध क्षेत्रातील उपवर-उपवधूंचा येथे प्रत्यक्ष परिचय होतो. त्यामुळे पालकांना योग्य स्थळ निवडणे सोपे जाते. मध्यस्थीशिवाय थेट परिचय होत असल्याने हा मेळावा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे.
दोन दिवसीय भव्य आयोजन....
दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात उपवर-उपवधूंचा स्टेजवरून परिचय, पालकांच्या भेटीगाठी, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथूनही समाज बांधव मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहतात.
नियोजन पूर्ण....
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी श्री नगरेश्वर वैश्य मंदिर विश्वस्त मंडळाने कंबर कसली आहे. अध्यक्ष श्री. भागवत गंगमवार, उपाध्यक्ष श्री. बिपीन गादेवार, सचिव श्री. सुरेश कोडगिरे, कोषाध्यक्ष श्री. पांडुरंग येरावार, सहसचिव श्री. सतिश मुक्कावार, विश्वस्त सदानंद मेडेवार यांच्यासह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, वासवी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड चे अध्यक्ष गोविंदराव बिडवई, सुभाष अण्णा कन्नावार, दिलीप कंदकुर्ते, एकनाथराव मामडे, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, आर्य वैश्य समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक, समाज बांधव यांच्या
मार्गदर्शनाखाली सर्व समित्यांची स्थापना करण्यात येत आहे.
या वधू वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आर्य वैश्य समाजातील तळागाळातील समाज बांधवांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नवनिर्वाचित मेळावा प्रमुख शंतनू कोडगिरे, तथा अर्थ समितीचे प्रमुख गजानन उत्तरवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे.

COMMENTS