*सहकार व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई; हिशोब वह्या व खरेदी-विक्रीचे दस्तऐवज ताब्यात
*देवणी (प्रतिनिधी)* :
देवणी तालुक्यातील कथित अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभाग व पोलीस विभागाच्या पथकाने झडती व तपासणीची कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
सहकार विभागाकडे देवणी तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तक्रारदार सुधाकर केशव पांचाळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गैरअर्जदार पांडुरंग रामचंद्र पांचाळ, रा. वलांडी, ता. देवणी, जि. लातूर यांच्या विरोधात ही झडती कारवाई करण्यात आली.
वलांडी व कवठाळा परिसरातील तीन ठिकाणी तपासणी
सहकार व पोलीस विभागाच्या पथकाने संबंधित व्यक्तीच्या वलांडी व कवठाळा येथील घरांसह श्रीराम मोबाइल शॉप, वलांडी अशा एकूण तीन ठिकाणी झडती घेतली. या कारवाईदरम्यान कथित अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात पुढील चौकशीसाठी काही हिशोब वह्या तसेच खरेदी-विक्रीचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रकरणाची पुढील चौकशी संबंधित सावकारी कायद्यानुसार सुरू असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्तटेवाड व पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर नानासाहेब चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर विष्णुपोतांगळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली.
कारवाईदरम्यान पथक प्रमुख म्हणून दीपक कांबळे, श्याम जाधव व रवी गायकवाड यांनी कामकाज पाहिले. तसेच पोलीस विभाग व सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचाऱ्यांनी संरक्षण व पंच म्हणून भूमिका बजावली.
अवैध सावकारीबाबत नागरिकांना आवाहन
दरम्यान, लातूर जिल्ह्यासह देवणी तालुक्यात अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रभावी नियंत्रण व कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन सहकार विभागाने केले आहे.
अवैध सावकारी व्यवहाराची माहिती असल्यास जिल्हा निबंधक सावकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर तसेच तालुकास्तरावरील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
सदर कारवाईबाबत पुढील चौकशी सुरू असून, तपासातून समोर येणाऱ्या बाबींनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

COMMENTS