उमरी प्रतिनिधी
उमरी तालुक्यातील मौजे बोरजुनी येथे जल जीवन मिशन, पाणी फिल्टर, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व इतर ग्रामपंचायत विकासकामे कागदोपत्री पूर्ण दाखवून बिले काढल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ उत्तम आनंदराव जाधव यांनी केला आहे.
या संदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नांदेड जिल्हा परिषद सीओ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की -
बोरजूनीत जल जीवन योजना अंतर्गत कामे झाल्याचे कागदोपत्री दाखविले जात आहे. मात्र प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता संबंधित कामे पूर्ण झालेली नसल्याची परिस्थिती आहे. तसेच पाणी फिल्टरचे काम, अंगणवाडीतील कामे, जिल्हा परिषद शाळेतील कामे व इतर ग्रामपंचायत विकासकामांपैकी काही कामे अपूर्ण असून काही कामे प्रत्यक्षात झालेली नसतानाही कागदोपत्री पूर्ण दाखवून बिले अदा करण्यात आली आहेत
यापूर्वी संबंधित स्तरावर तक्रार करूनही प्रत्यक्ष स्थळ पाहणी व समाधानकारक चौकशी झालेली नाही. बोरजुनी गावातील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, पाणी फिल्टरचे काम प्रत्यक्ष झाले आहे का व ते कार्यरत आहे का, याची तपासणी करावी, अंगणवाडी व जि.प. शाळेतील मंजूर कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, कागदोपत्री पूर्ण दाखविलेल्या सर्व विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती तपासावी, प्रत्येक कामाचे मंजूर अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका (MB), बिले, व्हाउचर व पेमेंटची माहिती तपासावी, प्रत्यक्ष काम न करता किंवा अपूर्ण काम करून बिले काढली असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी शासनाच्या निधीमध्ये अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करून निधी वसूल करावा, चौकशी अहवाल व केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती तक्रारदारास द्यावी.
सदर चौकशी केवळ कागदपत्रांवर न करता प्रत्यक्ष गावात येऊन स्थळ पाहणी, पंचनामा व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी उत्तम जाधव, संतोष भैरवाड, श्रीनिवास भैरवाड, परमेश्वर चंदापुरे, माधवराव पवार, बालाजी पवार, मारोती चेगुरले, बालाजी चंदापुरे, हणमंत कदम आदींनी केली आहे.
दिलेल्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यासंदर्भात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही....
...........पूर्ण........

COMMENTS