महिला सक्षमीकरणासाठी कवळे गुरुजींच्या उपक्रमांना नारीशक्तीची जोड; सहकारातून स्वावलंबनाचा संदेश *नरेंद्र येरावार* उमरी/नांदेड : सहकार क्षे...
महिला सक्षमीकरणासाठी कवळे गुरुजींच्या उपक्रमांना नारीशक्तीची जोड; सहकारातून स्वावलंबनाचा संदेश
*नरेंद्र येरावार*
उमरी/नांदेड :
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देत महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार भारती नारीशक्ती संमेलनात नांदेड जिल्ह्यातील व्हीपीके पतसंस्थेच्या महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. व्हीपीके पतसंस्थेचे चेअरमन तथा शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कर्मचाऱ्यांना या संमेलनासाठी पाठविण्यात आले.
मारोतराव कवळे गुरुजी यांनी गेल्या सुमारे २० वर्षांपासून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. नांदेड जिल्ह्यात व्हीपीके पतसंस्थेच्या २९ शाखांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे निर्माण करताना सुमारे १२०० महिला बचत गटांना जोडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत.
भाग्यलक्ष्मी कर्ज योजनेतून महिलांना जोड व्यवसायाची संधी
शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी कुटुंबातील महिलांनी जोड व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन निर्माण करावे, या उद्देशाने व्हीपीके पतसंस्थेच्या माध्यमातून भाग्यलक्ष्मी कर्ज योजनेचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमाअंतर्गत महिलांनी आपल्या पतीसमवेत कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन तेथील प्रशिक्षण केंद्रात दोन दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे आणि प्रशिक्षणानंतर त्यांच्या व्यवसायासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे
उमरी तालुक्यातील अनेक महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून छोटे-मोठे लघुउद्योग व व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या या वाटचालीचे कौतुक करताना यापुढील काळातही महिलांनी पुढाकार घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन कवळे गुरुजी यांनी केले.
नारीशक्ती संमेलनातून सेवाभावाची प्रेरणा घेण्याचे आवाहन
शिर्डी येथील सहकार भारती नारीशक्ती संमेलनात विविध क्षेत्रांतील महिलांना मार्गदर्शन व विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळत असल्याने व्हीपीके पतसंस्थेतील महिला कर्मचाऱ्यांनी या संमेलनातून मिळणारे विचार आणि मार्गदर्शन आत्मसात करून आपल्या कार्यक्षेत्रात त्याचा उपयोग करावा, अशी अपेक्षा कवळे गुरुजी यांनी व्यक्त केली.
“संमेलनातून मिळणारे ज्ञान आणि अनुभव घेऊन आपल्या परिसरातील गोरगरीब, गरजू महिलांच्या सेवेसाठी काम करा. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य द्या,” असा संदेश त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना दिला.
शिर्डीतील प्रदर्शनात व्हीपीके उद्योग समूहाच्या उत्पादनांचे प्रदर्शन
शिर्डी येथे आयोजित संमेलनाच्या निमित्ताने व्हीपीके उद्योग समूहाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली पावडर, खांडसरी साखर तसेच साईकृपा दूध डेअरीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांचा स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलच्या माध्यमातून व्हीपीके उद्योग समूहाच्या विविध उपक्रमांची आणि उत्पादनांची माहिती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली
या स्टॉलला महिला व बाल विकास तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी व्हीपीके उद्योग समूहाच्या कार्याचे कौतुक केले.
मेघना बोर्डीकर यांनी यापूर्वीही कवळे गुरुजी यांच्या कारखान्याला दोन वेळा भेट दिल्याचे सांगत ग्रामीण भागात उद्योग व रोजगारनिर्मितीसाठी सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले. शिर्डी येथील स्टॉलला भेट देण्याचा योग आल्याचे सांगून भविष्यात व्हीपीके उद्योग समूहाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन त्यांना चांगला बाजारभाव मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महिला कर्मचाऱ्यांचे कवळे गुरुजींकडून अभिनंदन
शिर्डी येथील सहकार भारती नारीशक्ती संमेलनात सहभागी झालेल्या व्हीपीके पतसंस्थेच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचे मारोतराव कवळे गुरुजी यांनी विशेष अभिनंदन केले. महिलांनी संमेलनातून मिळालेले मार्गदर्शन आपल्या कामाच्या माध्यमातून समाजातील गरजू महिलांपर्यंत पोहोचवावे आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सहकार, महिला बचत गट, लघुउद्योग आणि आर्थिक सहाय्य या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा व्हीपीके पतसंस्थेचा प्रयत्न असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले....

COMMENTS