स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत विद्यापीठ परिसरात स्वच्छता मोहीम*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, उपकुलसचिव रामदास पेद्देवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, प्रा. नंदकुमार बोधगिरे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत विद्यापीठ परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. विद्यापीठ परिसर, वसतिगृहे, परिसरातील विविध ठिकाणे तसेच दत्तक गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवून समाजामध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यापीठ परिसराची स्वच्छता केली. महात्मा गांधी यांच्या स्वच्छता, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्यात आले.


COMMENTS