पुन्हा हवेत महात्मा गांधीजी* लेखक:डॉ.अजय गव्हाणे

          *विसाव्या* शतकातील महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी महात्मा गांधीजींची थोरवी सांगतांना असे म्हटले की, 'महात्मा गांधी नाव...


          *विसाव्या* शतकातील महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी महात्मा गांधीजींची थोरवी सांगतांना असे म्हटले की, 'महात्मा गांधी नावाचा माणूस या भूतलावर वावरला असेल, यावर येणाऱ्या काळातील पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत.'

          सध्या असणारी जगाची अवस्था पाहिल्यानंतर निश्चितच प्रत्येक माणसाच्या डोक्यात हा विचार आल्याशिवाय राहणार नाही. आपण जीवन जगत असलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, तांत्रिक, मानसिक, भावनिक, बौध्दिक इत्यादी विविध क्षेत्रातील समस्या पाहिल्यानंतर अंत:करणातून एकच एक आवाज येतो, 'आज महात्मा गांधीजी हवेतच. गांधीजींच्या विचाराशिवाय या देशाला नव्हे; जगाला कुणीही वाचवू शकणार नाही. महात्मा गांधी म्हणजेच सत्य, अहिंसा, सत्याग्रह, निती, सदाचार, ज्याची आजच्या युगाला ऑक्सीजनप्रमाणे गरज आहे. अन्यथा इथला माणूस, इथला प्रत्येक जीव मृत झाल्याशिवाय राहणार नाही.

*दहशतवादाला सत्य आणि अहिंसा हेच उत्तर:* 

                महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे सत्याचे प्रयोग होते. म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मचरित्राचे नावही 'माझे सत्याचे प्रयोग' असे ठेवले होते. ज्या सत्याची आज प्रत्येक मानवाला गरज आहे. या पृथ्वीचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल; तर ते फक्त सत्य

आणि अहिंसेच्या आधारावर टिकून राहू शकते.

          आज संपूर्ण जगासमोरिल सर्वात भिषण समस्या म्हणजे दहशतवाद. त्यावर उत्तर म्हणजे महात्मा गांधीजींचे विचार, जीवन आणि कृती ज्या तत्त्वांवर आधारित आहे ती अहिंसा. अहिंसेच्या संदर्भात महात्मा गांधी सांगतात , अहिंसा हे तत्व मी सर्वप्रथम सांगत नाही. या देशातील हिमालय जेवढा जुना आहे. तेवढेच अहिंसा हे तत्त्व जुने आहे.' महात्मा गांधीजींनी अहिंसा या तत्वाचा स्वीकार केला तथागत बुध्दापासून. हिंसेपासून कोणालाही काहीही प्राप्त होणार नाही यावर महात्मा गांधीजींचा दृढ विश्वास होता. महात्मा गांधीजींचे मोठेपण याच्यात आहे की त्यांनी अहिंसा, सत्य ही तत्चे सर्वप्रथम सार्वजनिक जीवनात, राजकारणात आणली.

*राजकारणाचे नितीकरण आणि सदाचरण :* 

               महात्मा गांधीजींच्या मते, राजकारण हा गुंडांचा खेळ नाही. तर सेवेचे माध्यम आहे. राजकारण आणि निती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या पाहिजेत. राजकारण हे काही प्राप्त करण्याचे साधन नाही तर राजकारण आणि सदाचार हातात हात घालून चालले पाहिजे. सद्या वाढत असलेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर यासारखा वैचारिक उपाय दुसरा कोणताही सापडणार नाही.

          महात्मा गांधींजी ज्या ज्या ठिकाणी हिंसा आहे; त्या सर्व घटकांना विरोध करतात. गांधीजींनी हिंसेचे शारिरिक, मानसिक, वाचिक असे प्रकार सांगितलेले आहेत. त्यांच्या मते, एखाद्यावर हल्ला करणे ही हिंसा आहेच, पण एखाद्याच्या भावना दुखावतील असे वक्तव्यही हिंसाच आहे. एखाद्याच्या मनावर शब्दांनी केलेला वार कधीही बरा होऊ शकत नाही. इतकेच नाही तर एखाद्याचे वाईट होण्याची इच्छा बाळगणे, तसे चिंतन करणे ही देखील हिंसाच आहे. या सर्व हिंसेचा त्याग करून अहिंसा या तत्वानी जीवन झाकाळले पाहिजे. इतका सूक्ष्म, खोलवरचा विचार गांधीजींनी मांडला आहे.

*गुन्ह्याचा द्वेष करा; गुन्हा करणाऱ्यांचा नव्हे :* 

               महात्मा गांधी हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यांच्या मते. गुन्हा नष्ट झाला पाहिजे. गुन्हा करणारा नव्हे. म्हणूनच ते म्हणतात 'गुन्ह्याचा द्वेष करा; गुन्हा करणाऱ्यांचा नव्हे', असा अतिशय मूलभूत व समस्या पूर्णपणे नाहिसा करणारा विचार गांधीजी सांगतात. त्यांच्या मते व्यक्ती गुन्हेगार परिस्थितीने बनतो व गुन्हेगाराचे हृदयपरिवर्तन होवू शकते. त्याच्या हृदयपरिवर्तनासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व आणि अंतःकरण शुध्द असावे. सत्याग्रही हा सत्यनिष्ठ, नितिमान आणि शूर असावा. गांधीजींच्या मते, दुर्बलांची अहिंसा आणि शुरांची हिंसा यापैकी एकाची निवड करावयाची असल्यास मी शुरांची हिंसा निवडेन. माझा सत्याग्रही दुर्बल, भेकड असता कामा नये. माझी अहिंसा ही शुरांची अहिंसा असेल. माझ्या मते, जो भेकड असतो; तोच हिंसक असतो.

          सध्याच्या काळात युद्धाचे, दहशतवादाचे वाढते प्रमाण, ठिकठिकाणी होणारे बॉम्बस्फोट, हत्या, अपहरण, वाढते गुन्हेगारीकरण पाहिल्यानंतर महात्मा गांधीजींच्या विचारांना कोणताही पर्याय नाही. महात्मा गांधीजींच्या विचारांचे पुनः स्वीकृतीकरण या संकटांचा समर्थपणे मुकाबला करु शकते व समस्या मुळापासुन संपवू शकते.

*खा.उ.जा.च्या चंगळवादाला साधी राहणी हेच औषधः* 

               सध्या आपण सर्वजन खा उ जा (खाजगीकरण, उदारीकरण, जागतीकीकरण) या महासंकटांच्या प्रक्रीयेत आहोत. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीत वाढ, रोजगाराच्या अपेक्षेने शहरात वाढणारे लोंढे तसेच पर्यावरणाच्या

हानीमुळे ग्लोबल वार्मीग सारखे प्रश्न निर्माण होत आहेत. जागतिकीकरणासारख्या प्रक्रीयेमुळे संपूर्ण संपत्तीचे काही जणांकडे केंद्रीकरण होत असतांना, महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रकर्षाने आठवण येते. 'या पृथ्वीवर एवढी साधन संपत्ती आहे की, इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजांची पूर्तता होवु शकेल. मात्र एकाही माणसाचा अधाशीपणा पूर्ण करणारी साधनसंपत्ती या पृथ्वीवर नाही ' जागतीकीकरणाच्या केंद्रीकरण या मुख्य वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण जगात पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. महात्मा गांधी म्हणतात, 'विकास हा झाला पाहिजे पण त्या विकासामुळे आनंदाची निर्मिती झाली पाहिजे. जो विकास आनंद निर्माण करू शकत नाही. तो व्यर्थ आहे.'

          महात्मा गांधीजींच्या विचारांचा केंद्रबिंदू माणूस आहे. माणसाला सुखी, संपन्न, आनंदी, नितीमान बनविण्यासाठी महात्मा गांधीजींचे विचार हे दिपस्तंभ आहेत. म्हणूनच ह्या बदलत्या आर्थिक, सामाजीक, राजकीय वातावरणात महात्मा गांधीजींचे विचार प्रेरक ठरतात. आजच्या या वातावरणात प्रत्येकजण लोभी झाला आहे. या लोभी वृत्तीबद्दल गांभीजी म्हणतात, 'लोभीपणा हा माणसाला कधीही आनंद, सुख, समाधान देऊ शकत नाही.' गांधीजींची साधी राहणी; उच्च विचारसरणीचे तत्व या गळेकापू स्पर्धेच्या दुष्परिणामांना संपवू शकते.

          महात्मा गांधीजींनी 'खेड्याकडे चला' हा संदेश दिलेला आहे. भारत हा खेडयांचा देश आहे. ग्रामस्वराज्य या संकल्पनेचा पुरस्कार त्यांनी केला. खेड्यामध्येच लघुउद्योग, कुटीरोद्योग, स्वयंरोजगार या माध्यमातून रोजगाराची निर्मिती झाली पाहीजे. खेड्यातील माणूस शहरांकडे ओढला जाता कामा नये. अन्यथा खेडी ओस पडतील आणि शहरी परिसर बकाल वस्त्या आणि गुन्हेगारांचे अड्डे बनतील. महात्मा गांधीजींनी मोठ्या, अवजड यंत्रांना; ज्यामुळे माणसांचे हात बेरोजगार बनतील; त्यांना विरोध केला आहे. अमर्याद यांत्रीकीकरणामुळे मानवता संपून जाईल आणि सर्व जीवनच यांत्रिक बनेल. मानवी आत्मा नावाचा घटक या वाढत्या यांत्रीकीकरण आणि शहरीकरणामुळे सापडणार नाही. इतकी दुरदृष्टी, सर्वव्यापकता आणि पिढ्यानपिढ्यांचा विचार करणारे चिंतन महात्मा गांभीजींकडे होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या जागतिकीकरणाचे आपल्या समाजाला मिळालेले दूषण आहे, हे आपण विसरता कामा नये.

*व्यसनाधिनता म्हणजे गुन्हेगारी वृत्ती :* 

               आजच्या काळात व्यसनधिनता फॅशन बनलेली आहे. व्यसनामुळे कित्येक कुटुंब देशोधडीला लागलेले आहेत. चित्रपट, दुरचित्रवाणीवरील जाहिराती, याव्दारे या व्यसनी, अंमली पदार्थाचे, द्रव्याचे सर्रास प्रदर्शन मांडल्या जात आहे. महात्मा गांधीजी या व्यसनाधिनतेवर सडकून टिका करतात. त्यांच्या मते, 'दारू पिलेला माणूस आणि गुन्हेगार यांच्यामध्ये माझ्या दृष्टीने काहीच फरक नाही.' सर्वप्रकारचे गुन्हे व्यसन करून केल्या जातात. घर सांभाळणाऱ्या, घराला घरपण देणाऱ्या मायमाऊलीला मारहाण दारूड्या पतीकडून केल्या जाते.

          महात्मा गांधीजींनी सर्व नशा, अंमली, व्यसनी द्रव्यांना, पदार्थांना सक्त विरोध केला आहे. या देशातील युवापिढीला पोखरण्याचे काम व्यसनांद्वारे होत असतांना शांती, प्रेम, सदाचाराचे संदेश देणाऱ्या गांधीजींची पदोपदी, क्षणोक्षणी आठवण येते.' माझं जीवनच माझा संदेश आहे. ' असा

अप्रतिम, सर्वोच्च संदेश देणा-या या महापुरुषाने हे सर्व विचार स्वतः जगले, म्हणूनच गांधीजींचे जीवन आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. गांधीजींच्या विचारांची पूजा त्यामुळेच सर्व जगभर केल्या जाते.

*धर्माद्वारे राजकारणामध्ये निती यावी:* 

               आपल्या देशासमोरील महत्वपूर्ण समस्या म्हणजे हिंदू-मुस्लिम आणि इतर विविध धर्मियांत उदभवणारे वाद. महात्मा गांधीजीबद्दल एका विचारवंतानी म्हटले आहे,' महात्मा गांधीजी म्हणजे संतातील राजकारणी आणि राजकारणातील संत. ' गांधीजींनी धर्माला उच्च स्थान दिले आहे. धर्म आणि राजकारणाच्या एकत्रीकरणाबदल गांधीजींचे विचार चिंतनीय आहेत. 'धर्म आणि राजकारणाची योग्य सांगड असली पाहीजे. धर्माशिवाय राजकारण म्हणजे हाडाचा सापळाच आहे.' म्हणजेच गांधीजींना हे अपेक्षीत होते की, धर्म आणि राजकारण एकत्रीत असावे, मात्र

धर्माने राजकारणाला मार्गदर्शन करावे. धर्मातील निती, सदाचार, मूल्य यांचा समावेश राजकारणात केला जावा. राजकारणाने धर्माला मार्गदर्शन करू नये. राजकारणातील असामाजिक तत्व, अनाचार धर्मामध्ये मिसळविल्या जाऊ नये. या अर्थाने गांधीजींनी धर्म आणि राजकारण एकत्रीत करण्याविषयी

समर्थन केले आहे.

          महात्मा गांधीजी धर्माकडे कर्तव्य या भावनेने पहात असल्याने त्यांनी राजकारण आणि धर्म यांना वेगळे मानले नाही. याच कारणासाठी आचार्य जावडेकर गांधीजींचे वर्णन 'राजकीय कर्मयोगी' असे करतात.

*गांधीजींच्या भारतात गांधी विचारांचे स्थान काय? :* 

               महात्मा गांधीजी म्हणजे, 'एका माणसाचे सैन्य' असा गांधीजींचा आदरपूर्वक उल्लेख केला जातो. १८५७ पासून ते १९४७ पर्यंत अनेक महापुरूषांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्यसेनानीनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. महात्मा गांधीजींनी स्वतःचे अनुभव, संपुर्ण देश फिरून आल्यानंतर या देशाबद्दल त्यांचे तयार झालेले मत, यातून निवडलेल्या मार्गाद्वारे इंग्रजांच्या महाबलाढ्य

साम्राज्य सत्तेला हादरवून सोडले. संपूर्ण जगाला मार्ग दर्शविणारा हा स्वातंत्र्यसमर, 'दे दी हमे आझादी, बिना खडग बिना ढाल', हे महात्मा गांधी नावाच्या विचाराने, कृतीने प्रत्यक्षात आणले. हा भारत देश गांधींचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. या महात्मा गांधी नावाच्या एका माणसाने दिलेल्या एका हाकेवर संपूर्ण देश रस्त्यावर उतरला. या देशात स्त्रिया सर्वप्रथम बहुसंख्येने या आंदोलनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामुळे उतरल्या. असा हा गांधीजींचा देश गांधीजींच्याच विचारांपासून दुरावत चालला आहे की काय ? महात्मा गांधीजींच्याच देशाने महात्मा गांधीना निट समजून तरी घेतले आहे की नाही? अशी चिंता निर्माण होत आहे.

          म्हणूनच आज पुन: पुन्हा महात्मा गांधीजींची आठवण येते, आवश्यकता भासते, गांधीजी पुन्हा अवतरले पाहीजे; अशी मनोमन प्रबळ इच्छा निर्माण होते.

*गांधीविचार हा विश्वकल्याणाचा मार्ग :* 

               निश्चितच संपूर्ण जगाला चळवळीचा, आंदोलनाचा संदेश देणाऱ्या, मार्ग दर्शविणाऱ्या या महापुरुषाच्या विचारांचा उदय होईल. गांधीजींच्या विश्वव्यापी विचारांमुळे रोमाँ रोला या सुप्रसिध्द फ्रेंच विचारवंताने त्यांना येशू ख्रिस्ताचा अवतार म्हटले आहे. एक समर्थ आणि संपन्न माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज आहे. कस्तुरीच्या शोधात निघालेल्या हरणासारखी आपली

अवस्था होवू नये. ही कस्तुरी, हे विचारांचे अमृत या देशाच्या मातीमातीत मिसळलेले आहे.

          फक्त आवश्यकता आहे या विचारांना समजून कृती करण्याची. हे विचार, कृती जीवनात प्रत्यक्ष अवलंबिण्याची. हा देश सर्व अर्थाने संपन्न व समृध्द आहे. म्हणूनच या देशातील युवक महात्मा गांधीजींच्या विचारांना श्वासासारखे स्वीकारतील व देशाच्या संपन्नतेत आणि समृध्दतेत वृध्दी करण्याबरोबरच जगालाही संपन्न व समृध्द बनवतील.

          जगातील प्रत्येक माणूस-न-माणूस नितीमान, सदाचारी, सुखी, आनंदी बनला पाहीजे; या महात्मा गांधीजींच्या विचारांमध्ये 'विश्वकल्याण'सामावले आहे.

            *डॉ.अजय वसंतराव गव्हाणे*

                  (राज्यशास्त्र विभागप्रमुख)

                यशवंत महाविद्यालय, नांदेड.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group