नांदेड (प्रतिनिधी) - महाविकास आघाडी अंतर्गत मराठवाडा पदवीधर विधानपरिषद निवडणूकीसाठी ही जागा काँग्रेसने आपल्याकडे घेत काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते महेश देशमुख तरोडेकर यांना उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात व खा. रवींद्र चव्हाण, खा. कल्याण काळे, खा. शिवाजी काळगे यांच्या विशेष उपस्थितीत मराठवाड्यातील सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यावतीने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस रजनीताई पाटील, मराठवाडा प्रभारी रेहान चिस्ती आणि बी. वेंकटेश यांच्याकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांनी पदभार स्विकारल्या नंतर टिळक भवन प्रदेश काँग्रेस कार्यालय मुंबई येथे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मराठवाडा प्रभारी रेहान चिस्ती आणि बी. वेंकटेश यांच्या विशेष उपस्थितीत मराठवाडा पदवीधर विधानपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात व खा. रवींद्र चव्हाण, खा. कल्याण काळे, खा. शिवाजी काळगे यांच्या विशेष उपस्थितीत मराठवाड्यातील सर्व काँग्रेस लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी, महाविकास आघाडी अंतर्गत मराठवाडा पदवीधर विधानपरिषदेची जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी आणि मराठवाडा पदवीधर विधानपरिषद निवडणुकीचे समन्वयक तथा नांदेड जिल्हा शहर काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर यांना उमेदवारी द्यावी अशी एकमुखीने मागणी केली आहे. यावेळी माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार तथा परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, शहर महानगराध्यक्ष सय्यद अक्रम, जालना जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, परभणी शहराध्यक्ष रविराज देशमुख, बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते, धाराशिव जिल्हाध्यक्ष निंबाळकर, नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, नांदेड शहराध्यक्ष अब्दुल गफार, यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुरेंद्र घोडसकर, श्रावण रॅपनवाड, श्याम दरक, नगरसेवक सत्यपाल सावंत, शेख पाशा, मुन्ना अब्बास, डॉ. बाकी आदीसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा पदवीधर विधानपरिषद निवडणूक समन्वयक म्हणून महेश देशमुख तरोडेकर यांनी मागील अनेक महिन्यांपासून संपूर्ण मराठवाडा दौरा करत पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. स्वतः उच्चशिक्षीत आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेले व काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांचा सर्वदूर परिचय आहे. नांदेडसह मराठवाड्यातील सर्वच जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी ही निवडणूक पुर्ण ताकदीने लढविण्याचा संकल्प सदर बैठकीत बोलून दाखविला आहे.

COMMENTS