नांदेड : नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव तथा अर्जापूर, येथील पानसरे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. महेश वाकरडकर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. नुकतीच नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अरुण लखानी, सचिव श्री. सिद्धार्थ पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. शिरीष बोराळकर आणि कार्यकारिणी सदस्यांच्या सहमतीने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
डॉ. महेश वाकरडकर मागील अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. नांदेड शहर व जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत असताना, शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मागील २२ वर्षांपासून नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे स्पर्धा सचिव म्हणून ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या कार्यासाठी नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. पी. सावंत यांचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
याशिवाय, मागील १४ वर्षांपासून ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. खेळाडूंना प्रशिक्षण देणे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि नांदेड जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाचा प्रसार करणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने त्यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड केली आहे.
या निवडीबद्दल नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. पी. सावंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, पानसरे महाविद्यालयाचे संस्थेचे सचिव श्री. सुभाष गायकवाड आणि प्राचार्य डॉ. बेलखेडे सर तसेच नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भैरवनाथ नाईकवाडी यांनीही डॉ. महेश वाकरडकर यांना शुभेच्छा दिल्या. नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सर्व कार्यकर्ण पानसरे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच नांदेडमधील वरिष्ठ बॅडमिंटन खेळाडूंनी त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाला आणि नवोदित खेळाडूंना निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.

COMMENTS