नांदेड दि.५,नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांची जपान येथे होणाऱ्या जागतिक एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळेस्थान निर्माण केलेले आहे.
सन २०१७ पासून त्यांची क्रीडा कारर्किर्द सुरू झाली. ९ वर्षांच्या काळात त्यांनी आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत त्या २५ सुवर्ण,४ रौप्य व ७ कास्य पदकांवर आपले नाव कोरले आहे. एकूण ३६ पदकांची त्यांनी कमाई केली. आजपर्यंत त्यांनी १० देशांमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे.
सन २०२१ मध्ये टोकिओ व २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे सौभाग्य त्यांना लाभले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवादक होण्याचा बहुमान भाग्यश्री जाधव यांना मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी- वर्ग एक या पदावर नियुक्ती दिली आहे.
जपान मधील आयची नागोया येथे १८ ते २५ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या एशियन पॅरा गेम्स या स्पर्धेसाठी पॅरालिंम्पिंक कमिटी ऑफ इंडिया कडून भाग्यश्री जाधव यांची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा दर चार वर्षांनी होतात.यापूर्वी झालेल्या स्पर्धेत भाग्यश्री जाधव यांना सहभागाची संधी मिळाली होती. त्यानंतर आता ही दुसऱ्यांदा संधी प्राप्त झाली आहे.
माझे मुख्य प्रशिक्षक सी. सत्यनारायण, सह प्रशिक्षिका श्रीमती पुष्पा मॅडम, प्रशिक्षक प्रशांत वाघ, गुरुबंधू पत्रकार प्रकाश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर व प्रसिद्ध व्यापारी शशिकांत पाटील जुन्ने बेळीकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा तसेच डॉक्टर मंडळी. माध्यम क्षेत्रातील हितचिंतक यांच्यामुळेच मला एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे.अशी प्रतिक्रिया भाग्यश्री जाधव यांनी व्यक्त केली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS