हिंगोली
हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये ५ ऑक्टोबर रोजी उशिरा संध्याकाळी एका घरात असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील फटाक्यांचे होलसेलर गोपाळ बास्टवार यांचे मारवाडी गल्लीत चौधरी कुटुंबाच्या घराला लागूनच घर आहे. या घरात मोठ्या प्रमाणावर फटाके ठेवण्यात आले होते. ५ ऑक्टोबर रोजी उशिरा संध्याकाळी अचानक या फटाक्यांना आग लागली आणि ती आसपासच्या परिसरात पसरली. फटाक्यांचे जोरदार आवाज आणि आगीच्या उंचच उंच ज्वालांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.
या आगीत अनेक व्यक्ती जखमी झाल्या असून दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींना लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल, तापडिया हॉस्पिटल, मुंडे हॉस्पिटल, टेहरे हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच हिंगोली नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्याच्या दोन गाड्यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान जोरदार स्फोट झाल्याने अग्निशामक दलाचे चार कर्मचारीही गंभीर भाजले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी बास्टवार यांच्या घरात आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, यातही अनेक जण जखमी झाले.

COMMENTS